राष्ट्रपती राजवट लागली पण पत्रकारांचा गोंधळ थांबेना !!
X
आपण ऐकतो अर्ध. समजून घेतो पावभर, विचार करतो शून्य आणि वाढवून सांगतो दुप्पट, ही प्रतिक्रिया आहे... पत्रकार साहिल जोशी यांची. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही एकूण राजकारणाबद्दल अंदाज बांधण्याची मीडियाची घिसाडघाई थांबलेली नाही, त्यावर साहिल जोशी यांनी नेमकं भाष्य केलंय. विशेषत: दिल्लीतील माध्यमांच्या उलटसुलट बातम्यांच्या पार्श्वभूमीवर साहिल जोशी यांचं ट्वीट पुरेसं बोलकं आहे.
शिवसेना नेते उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांची भेट झाल्याच्या व सत्तेचा फॉर्म्युला काय काय ठरला, याच्या चर्वितचर्वण बातम्यांचा भडिमार वृत्तवाहिन्यांनी केला, पण शिवसेनेने त्याचा स्पष्ट इन्कार केला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. पण अद्याप अहमद पटेल आणि उद्धव ठाकरे यांची कोणतीही भेट झालेली नाही, असं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलंय. सत्ता स्थापनेबाबत कॉंग्रेस पक्षाच्या बैठका सुरू असून इलेक्ट्रॉनिक माध्यमात ज्या बातम्या येताहेत, त्या निराधार असल्याचं ट्वीट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही केलंय.
माध्यमांच्या गोंधळावर ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनीही टीका केलीय. दिल्लीतील माध्यमांची शिवसेनेबद्दलची समज खूप ढोबळ आहे. गेल्या काही वर्षांत शिवसेना खूप बदललीय. ती पूर्वीची बाळ ठाकरेंची शिवसेना राहिलेली नाही. हिंदुत्ववादी पक्ष असला तरी शिवसेना भाजपापेक्षा वेगळी आहे. मध्यमवर्गीय मराठी वर्गात शिवसेनेची पाळंमुळं खोल रुजलेली आहेत, असं ट्वीट वागळे यांनी केलंय