गरिबीत मरीआईवाले मुले कब्बडीला देत आहेत ऊर्जितावस्था
आजच्या युगात तर पारंपरिक खेळ लुप्त होत असताना अशा परिस्थितीत ग्रामीण भागात पारंपरिक खेळ काहीशा प्रमाणत टिकून आहेत. कब्बडी खेळ हा मातीतील खेळ असून तो दुर्मिळ झाला असताना सोलापूर जिल्ह्यात मरीआईवाले समाजाची मुले या खेळाला ऊर्जितावस्था देत आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट
X
माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मानव प्रचंड वेगवान झाला आहे. घड्याळाच्या काट्यावर त्याचे जीवन सुरू आहे. उजडलेला दिवस कामाच्या व्यापात कधी मावळतो याचे देखील भान सध्याच्या पिढीला नाही. काहीजण तर रात्रभर काम करून दिवसा पार्ट टाईम जॉब करत आहेत. एकूणच या युगातला मानव नैसर्गिक जगणे हरवून बसला आहे. त्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला ही वेळ नाही. आजच्या युगातील तरुण कामाच्या व्यापातून राहिलेला वेळ मोबाइलच्या सानिध्यात घालवत आहे. या पिढीत प्रचंड प्रमाणात टेन्शन असल्याने अनेकांना नैराश्य आले असून हसणे,खेळणे,बागडणे या पासून ही पिढी कोसो दूर गेली आहे. सातत्याने मोबाईल आणि लॅपटॉप च्या स्क्रीन समोर ही पिढी बसून आहे. आताची पिढी पारंपरिक खेळापासून सुद्धा कोसो दूर गेलीय. येणाऱ्या पुढच्या पिढीला कब्बडी,आट्यापाट्या,कुस्ती यासारखे मातीतील खेळ फक्त पुस्तकातच वाचायला मिळतील,असे वाटत असून आजच्या युगात तर पारंपरिक खेळ लुप्त झाले आहेत. अशाही परिस्थितीत ग्रामीण भागात पारंपरिक खेळ काहीशा प्रमाणत टिकून आहेत. कब्बडी खेळ हा मातीतील खेळ असून तो दुर्मिळ झाला असताना सोलापूर जिल्ह्यात मरीआईवाले समाजाची मुले या खेळाला ऊर्जितावस्था देत आहेत.
मरीआईवाले समाज शोषित,वंचित अठरा विश्व दारिद्र्याने ग्रासलेला आहे. गावोगावी भिक मागून खाणे हा या समाजाचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन असून या समाजातील आताची पिढी शिक्षण घेवू लागली आहे. शिकलेल्या मुलांना आपल्या समाजातील उच्च शिक्षित खेळाडूचे मार्गदर्शन मिळावे,या हेतूने मोहोळ तालुक्यातील पेनुर या गावात दिग्दर्शक रशीद निंबाळकर या तरुणाने कब्बडीचे सामने भरवले आहेत. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील मरीआईवाले समाजाची मुले सहभागी झाली असून या समाजातील मुलानी हा पारंपरिक खेळ टिकवून ठेवला असल्याने त्यांचे विशेष असे कौतुक होत आहे.
मरीआईवाले समाजातील मुले गरिबीतून जपत आहेत पारंपरिक खेळ
मरीआईवाले समाजातील लोक महाराष्ट्रभर विखुरला आहे. हा समाज डोक्यावर देवीचा गाडा घेवून फिरतो. हा गाडा महिलेच्या डोक्यावर असतो. तर पुरुषाच्या हातात चाबूक आणि ढोलकी असते. कधी - कधी महिलेच्या डोक्यावर देवीचा गाडा असतो. त्याचबरोबर ती ढोलकी सुद्धा वाजवते. काहीवेळेस या महिला भीक मागायला जात असताना लहान मुले आपल्या पाठीला बांधतात. देवीचा गाडा घेवून या समाजातील महिला आणि पुरुष महाराष्ट्राच्या विविध भागात जातात. अशा वेळी या समाजातील लोक आपल्या मुलांना शासकीय हॉस्टेल आणि शाळेत सोडून जातात. पण या समाजाची व्यवस्थेने दखल घेतली नसल्याने गेल्या हजारो वर्षापासून हा समाज शोषित,वंचित,पिढीत जीवन जगत आहे. आता कुठे सध्याची पिढी शिक्षण घेत आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात जागृती होण्यास प्रारंभ झाला असून हा समाज एका ठिकाणी स्थायिक होण्याच्या मार्गावर आहे. अनेक पिढ्या दारिद्र्यात गेल्या असतानाही आजही या समाजातील मुले येणाऱ्या संकटाना तोंड देवून त्यावर मात करत शिक्षण घेत आहेत. मरीआई वाले समाजातील मुले लहानाची मोठी होत असताना त्यांना कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नसतात. त्यांना पारंपरिक खेळ खेळण्याशिवाय पर्याय ही नसतो. याच कारणाने आजही मातीतील कुस्ती,आट्यापाट्या,कब्बडी यासारखे दुर्मिळ झालेले खेळ पाहायला मिळतात.
मरीआईवाले समाजातील मुले मोठ्या चपळाईने कब्बडी,कुस्ती खेळतात
मरीआईवाले समाजातील मुलांच्या अंगात प्रचंड प्रमाणात चपळाई असून पारंपरिक खेळ खेळताना ती दिसून येते. या समाजातील मुलांत गुणवत्तेची कमी नाही,परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना आपली गुणवत्ता दाबून ठेवावी लागते. त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा,यासाठी कब्बडी,कुस्ती,आट्यापाट्या या खेळांचे आयोजन प्रत्येक वर्षी करण्यात येते. या मुलांत पळण्याचा सराव जास्त प्रमाणात असून ते सुसाट पळतात. एकूणच या समाजातील मुलांकडे आधुनिक सोयी सुविधांचा अभाव असतानाही त्यांच्या वाट्याला आलेले जीवन मोठ्या आनंदाने जगताना दिसत असून या समाजातील महिला आणि पुरुष गावोगावी भीक मागून खातात. भीक मागायला जात असताना त्यांच्या सोबत त्यांची मुले देखील असतात. त्यामुळेच या समाजातील मुलांचा आपोआप व्यायाम होवून ती धस्टपुष्ट असल्याचे दिसून येतात.
दिग्दर्शक रशीद निंबाळकर मरीआई वाले समाजातील मुलांना करतोय मार्गदर्शन
मरीआई वाले समाजातील रशीद उस्मान निंबाळकर या युवकाने दिग्दर्शित केलेल्या ' इर्गाल ' सिनेमाने नुकत्याच पार पडलेल्या बाराव्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीवलमध्ये पुरस्कार प्राप्त केला आहे. या समाजातील मुले शिक्षणाच्या माध्यमातून पुढे येत आहेत. दिग्दर्शक रशीद निंबाळकर या मुलांना एकत्रित आणून त्यांना याच समाजातील विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या युवकाकडून मार्गदर्शन करण्याचे काम केले जात आहे. रशीद एक चांगला कुस्तीपटू आहे. त्यामुळेच तो इतर मुलांना कुस्तीचे धडे देत असून या समाजात मातीतील कुस्ती खेळणारे अनेक पैलवान तयार झाले आहेत. राहायला झोपडी आणि सोबत सर्वच गोष्टीत दारिद्र्य असतानाही समाजातील लोकांनी मातीतील पारंपरिक खेळ जपले असून बलदंड शरीर असणारे अनेक पैलवान या समाजात आहेत.
रशीद करतोय प्रत्येक वर्षी कुस्ती आणि कब्बडी सामन्यांचे आयोजन
एकीकडे जग प्रचंड प्रगती करत असताना या समाजातील मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठा संघर्ष करत आहेत. परिस्थिती नसल्याने रडत बसत नाहीत. संघर्ष करून अनेक युवकांनी राज्यस्तरावर कुस्ती आणि कब्बडी खेळात प्राविण्य मिळवले आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा या समाजातील इतर मुलांना व्हावा,यासाठी पारंपरिक खेळांचे सामने भरवले जात आहेत. पेनूर गावात गेल्या वर्षापासून कुस्ती आणि कब्बडीचे सामने भरवले जातात. मुलांना प्रोत्साहन मिळावे,यासाठी बक्षीस ही ठेवले जाते. याही वर्षी कुस्तीचे मैदान भरले होते. कुस्ती चालू असतानाच अचानक पावसाने सुरुवात केल्याने पडत्या पावसात ही कुस्तीचे सामने घेण्यात आले. कुस्तीचे सामने संपल्यानंतर लगेच बक्षिसांचे वितरण करण्यात आले होते. एकूणच या समाजातील मुले पारंपरिक खेळ जपताना दिसत आहेत
मरीआई वाले समाजातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा स्पर्धा भरविण्या मागचा उद्देश
या समाजातील युवक एकत्र यावेत. त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा,यासाठी पारंपारिक खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. या खेळाच्या माध्यमातून समाजातील सध्याच्या स्थितीवर चर्चा व्हावी हा उद्देश देखील यामागचा असल्याचे दिसून येते. शिक्षण घेत असताना या समाजातील मुलांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असून लोक वर्षानुवर्षे भीक मागून खात असल्याने ते एका ठिकाणी स्थायिक नव्हते. त्यामुळेच त्यांच्या जन्म आणि मृत्यूची कोठेच नोंद नाही. आताची पिढी शिक्षण घेवू लागली आहे. शिक्षण घेत असताना त्यांना जातीच्या दाखल्यासाठी,जात पडताळणीसाठी विविध अडचणींचा सामना करावा लागतोय. वारसा हक्काने आलेली घर जागा अथवा जमिनी नाहीत. हा समाज मुख्यत्वेकरून सरकारी जमिनीवर राहत आहे. कागद पत्रे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ देखील त्यांना घेता येत नाही. या पारंपारिक खेळांचे सामने भरवण्या मागचा उद्देश समाजातील तरुण युवक एकत्र येवून त्यांनी समाजाच्या प्रश्नावर चर्चा करावी असा असल्याचे, सामने आयोजित करणाऱ्या अग्निपंख संस्थेच्या आयोजकांनी सांगितले.
कब्बडीच्या सामन्यासाठी जिल्ह्याच्या बाहेरूनही आले संघ
कब्बडीची स्पर्धा ही मरीआईवाले समाजातील मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला,टेंभुर्णी,अक्कलकोट,मोहोळ,बार्शी,करमाळा,माळशिरस या तालुक्यातील मुले सहभागी झाले आहेत. त्याचबरोबर कर्नाटकातील विजापूर येथून ही या स्पर्धेत मुले सहभागी झाली आहेत. या स्पर्धा भरवण्या मागचा उद्देश या समाजातील उच्च शिक्षित तरुणांच्या ज्ञानाचा फायदा या समाजातील युवकांना व्हावा,असा आहे.