प्रदूषणाचा विळखा, मॉर्निंग वॉक धोकादायक ठरु शकतो?
लॉकडाऊननंतर प्रदुषणाची समस्या आणखी गंभीर होऊ लागली आहे. याचाच प्रत्यय पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या वातावरण फाऊंडेशनने नवी मुंबईत केलेल्या अभ्यासातून दिसून आला आहे.
X
तुम्ही जर खारघर-तळोजा-पनवेल पट्ट्यातील रहिवासी असाल तर तुमचे मॉर्निंग वॉक तुम्हाला फायदेशीर ठरण्याऐवजी नुकसान करणारे ठरू शकतात, असं निरीक्षण वातावरण या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने सुमारे महिनाभर हवेच्या गुणवत्तेचा आढावा घेतल्यानंतर नोंदवलं आहे. या अभ्यासानुसार खारघर-तळोजा-पनवेल सकाळी सहा ते आठ या वेळेत पीएम २.५ (पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट) कणांची पातळी खूप जास्त नोंदली गेली आहे. आरोग्य क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार पार्टिक्युलेट मॅटर पोल्युटंट्स, विशेषतः पीएम २.५ खूप सूक्ष्म असतात आणि सहज फुप्फुसांत प्रवेश मिळवून श्वसनाशी संबंधित आजारांना कारण ठरतात. पीएम. २.५ ची उच्च पातळी कमी दृश्यमानता आणि धुरकं याचंही कारण ठरते.
कोणत्या भागात करण्यात आला अभ्यास?
या अभ्यासाकरीता 'वातावरण'ने आसपासच्या भागातली पार्टिक्युलेट मॅटरची घनता मोजणारे स्वस्तातले रिअल टाईम एअर क्वालिटी मॉनिटर्स १) एमआयडीसी तळोजा, २) सेक्टर १३ पनवेल, ३) सेक्टर ३६ खारघर, ४) नावडे, तळोजा आणि ५) सेक्टर ७ खारघर. याठिकाणी बसवले होते. पीएम २.५ च्या घनतेची आकडेवारी १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या काळात गोळा करून तिचं विश्लेषण करण्यात आलं.
या अभ्यासामागचं महत्त्वाचं कारण केवळ खारघर-पनवेल-तळोजा भागातील रहिवाशी श्वास घेत असलेल्या हवेची गुणवत्ता तपासणं एवढंच नाही तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचं त्या-त्या वेळच्या हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा बसविण्यातलं अपयश अधोरेखित करणंही आहे, असे वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभट सांगितले.
अभ्यासातून समोर आलेली माहिती
अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार पीएम २.५ ची सर्वाधिक पातळी १४१.१ मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर (पाच उपकरणांच्या आकडेवारीची सरासरी) सकाळी सात वाजता नोंदली गेली. जरी पीएम २.५ ची सर्वाधिक पातळी सकाळच्या काही तासांत नोंदली गेली असली तरी दिवसातील १७ तास इथले रहिवासी प्रदूषित हवेत श्वास घेत होते. या पाचही ठिकाणच्या आकडेवारीचं विश्लेषण करणाऱ्या फराह ठाकूर म्हणाल्या की, या ३१ दिवसांत पनवेल परिसरात पीएम २.५ ची पातळी सरासरी १०१.१२ इतकी होती, जी भारतीय मानकांच्या (६० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत १.७ पटींनी तर डब्ल्यूएचओ मानकांच्या (२५ मायक्राेग्रॅम प्रतिघनमीटर) तुलनेत चार पटींनी जास्त आहे.
सर्व पाचही ठिकाणांपैकी तळोजा एमआयडीसी परिसरात पीएम २.५ ची पातळी सर्वांत जास्त आढळली. पीएम २.५ ची ३१ दिवसांची सरासरी पातळी येथे १३९.२७ प्रतिघनमीटर इतकी नोंदली गेली, जी भारतीय मानकांच्या तुलनेत २.३ पटींनी तर डब्ल्यूएचओ मानकांच्या तुलनेत ५.५ पटींनी जास्त आहे, असं त्या म्हणाल्या. या अभ्यासाचा अहवाल पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधींना आणि आमदार प्रशांत ठाकूर तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला जाणार आहे.