MVAcrises : राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
राज्यातील सत्तासंघर्ष टिपेला पोहोचला असताना शेतकरी विद्यार्थी आणि सर्वसामान्य तरुण मात्र समस्यांनी पिचला जात आहे. प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट
X
राज्यात झालेल्या राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना सर्वसामान्य जनतेतून उमटू लागल्या आहेत. सध्या राज्यात पाऊस लांबणीवर जात असल्याने खरिपाच्या पेरण्या रखडत चाललेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन,मोर्चे करून शेती मालाला हमी भाव देण्यात यावी,अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून केली जात आहे,पण ती मान्य होत नसल्याने शेतकरी वर्गातून नाराजीचा सूर ऐकायला येत आहे. हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी संघटना सातत्याने आक्रमक असतात. सध्या पाऊसाने दडी मारल्याने उडीद,सोयाबीन,मटकी, हुलगा या पिकांच्या पेरण्या खोळबल्या आहेत. त्यामुळे खरीपाचा हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. खरीपाचा हंगाम वाया गेल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागणार आहे. राज्यात नुकत्याच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल लागला असून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बेरोजगारी,महागाई दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेतून रोष व्यक करण्यात येत असताना राज्यात सत्ता संघर्ष सुरू झाल्याने नागरिकांतून या राजकीय गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
स्वार्थासाठी फुटाफुटीचे राजकारण
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी हणमंत कोल्हाळ यांनी सांगतले की,प्रत्येक राजकारणी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या सत्ता संघर्षात सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत चालले आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले असून मागासवर्गीय लोकांचे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. राजकीय पक्ष आपा-आपसामध्ये भांडू लागले आहेत. आपण दोघे भाऊ आणि सगळी इस्टेट मिळून खाऊ अशा पद्धतीने सर्वजण सगळा देश लुटायला बसले आहेत. सध्या जी राजकीय परस्थिती निर्माण झाली आहे त्याबाबत महाविकास आघाडीने युती करायला नको होती. पण युती केल्या नंतर सरकार पाच वर्षे टिकवणे आवश्यक होते. याच्या अगोदरचे सेना आणि भाजपचे सरकार पाच वर्षे चांगल्या प्रकारे टिकले होते. त्यावेळी त्या सरकारने चांगल्या प्रकारे काम केले. त्यांनी जनतेचे हित साधण्याचा प्रयत्न केला. परंतु आताच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे काहीच निर्णय घेतले नाहीत. दोन वर्षापासून अतिरिक्त उसाची परस्थिती गंभीर झाली आहे. कांद्याची शेती असू अथवा द्राक्षांचे झालेले नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
राजकारण्यांना सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाचे सोयरसुतक नाही
सत्ता संघर्षामुळे राजकारण्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांचे सोयरसुतक राहिले नाही. आता मतदारांनी विचार करायला पाहिजे की,कोणते सरकार जनतेला चांगल्याप्रकारे सेवा देवू शकते किंवा देश चांगल्या प्रकारे चालवू शकते याची शास्वती पाहून आपले मत द्यायला पाहिजे. सगळेच राजकारणी स्वतःचे हित पहात आहेत. पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांना नैसर्गिक दृष्टिकोनातून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकारचे कोठेतरी योगदान पाहिजे. यावेळेस अतिरिक्त उसाच्या प्रश्नांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. दिवसेंदिवस बेरोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे हा सत्ता संघर्ष राज्याला परवडणारा नाही,असे शेतकरी हणमंत कोल्हाळ यांना वाटते.