केरळात रोगराईचे थैमान, घेतले ५० बळी
X
केरळमध्ये महाप्रलयाचे थैमान शांत झाले असले तरी, राज्यावर आता आजाराचं संकट आहे. केरळमध्ये आतापर्यंत ५० जणांचा पाण्यामुळे होणाऱ्या दूषित रोगांमुळे मृत्यू झाला आहे. दूषित पाण्यामुळे केरळमध्ये लेप्टोस्पायरोसिसची साथ पसरली आहे. यामुळे ६ जण दगावले आहेत. तर ३४ जणांच्या मृत्यूचं कारणही लेप्टोस्पायरोसिसच असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच ९ जणांचा तापाने तर एक जणाचा डेंग्युमुळे मृत्युमुखी झाला आहे.
लेप्टोस्पायरोसिस रुग्णात वाढ...
लेप्टोस्पायरोसिसग्रस्त रुग्णांच्या संख्येत महाप्रलयानंतर दिवसेंदिवस वाढतच आहे. केरळच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून आतापर्यंत एकूण १५९ जणांना लेप्टोस्पायरोसिसने ग्रासले आहे. आतापर्यंत पुरामुळे १०४ लोकांना डेंग्यू आणि ५० हून अधिक जणांना मलेरिया झाला आहे.
दरम्यान, केरळमध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून आतापर्यंत ३६५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक विस्थापित झाले आहे.