#Restore_MaxMaharashtra : मॅक्स महाराष्ट्रला देशभरातून पाठिंबा, Youtube विरुद्ध नाराजी
X
सामान्यांचे मुख्य प्रश्न, दलित, शोषित आणि वंचितांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचवणारे सशक्त माध्यम म्हणून Max Maharashtra ची ओळख आहे. पण मॅक्स महाराष्ट्रचे Youtube Channel युट्युबने अचानक बंद केले आहे. युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्याचे कारण देत ५ लाखांच्या जवळपास सबस्क्राईबर असलेले चॅनेल अचानक बंद करण्यात आले आहे. मॅक्स महाराष्ट्राचे संस्थापक संपादक रवींद्र आंबेकर यांनी याबाबत सोशल मीडियामधून आपली भूमिका मांडली.
यानंतर युट्यूबने मॅक्स महाराष्ट्रसारख्या स्वतंत्र माध्यमावर केलेल्या कारवाईबाबत आता राष्ट्रीय पातळीवरील पत्रकारांनी नाराजी व्यक्त करत युट्यूबने कारवाई मागे घ्यावी असे आवाहन केले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी ट्विट करुन आपली भूमिका मांडली आहे, "@MaxMaharashtra
हे महाराष्ट्रातील घडामोडींबाबत उत्तम माहिती देणारे माध्यम आहे" असे म्हणत त्यांनी युट्यूबला टॅग केले आहे.
दलित मुलांना काही जणांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ मॅक्स महाराष्ट्रने जवळपास ३ वर्षांपूर्वी प्रसिद्ध करत समाजातील भीषण वास्तव मांडले होते. दलित आणि वंचितांवर कशाप्रकारे प्रस्थापित लोक अन्याय करतात हे भीषण वास्तव मॅक्स महाराष्ट्रने सातत्याने मांडले आहे. पण हे वास्तव मांडणाऱ्या मॅक्स महाराष्ट्रवरील कारवाईचा निषेध करत ज्येष्ठ पत्रकार आशुतोष यांनी दलित मुलांवरील अत्याचार दाखवणे हा काही गुन्हा नाही, असे मत व्यक्त करत युट्यूबने मॅक्स महाराष्ट्रचे चॅनेल पुन्हा सुरू करावे असे आवाहन केले आहे.
NDTVचे ब्युरो चीफ सोहीत मिश्रा यांनीही युट्यूबच्या कारवाईचा निषेध करत चॅनल पुन्हा करण्याचे आवाहन केले आहे.
सर्वच स्तरातून मॅक्स महाराष्ट्रला पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे सामान्यांचे प्रश्न, दलित, वंचित शोषितांचे प्रश्न मांडण्याचे कर्तव्य मॅक्स महाराष्ट्र निष्ठेने पार पाडत राहणार आहे.