उन्हाचा फटका मोरांना, मयूर अभयारण्यातील पाणवठे कोरडेठाक....
X
राज्यात उन्हाची काहीली दिवसेंदिवस वाढत चालली आहे. माणसांसह प्राण्यांनाही आता उन्हाचे चटके चांगलेच जाणनू लागले आहेत. बीड जिल्ह्याचा पारा 41 अंशांपेक्षा गेलाय. उष्णतेने जिल्ह्यात कहर केला असून माणसांना बाहेर फिरणे मुश्कील झालंय. यातच वनविभागाने पक्षांसह प्राण्यांसाठी अभयारण्यात केलेले पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. यामुळे मोरांसह पक्षांना आणि प्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगावचे मयूर अभयारण्य हे देशात मोरांसाठी प्रसिद्ध अभयारण्य आहे. या मयूर अभयारण्यात ८ हजारांपेक्षा जास्त मोरं वास्तव्य करतात. मोरांसह इतर जवळपास हजारो वेगवेगळ्या जातीचे पक्षी देखील इथे राहतात. त्याचबरोबर हरीण, काळवीट, नीलगाय, रानडुक्कर,खोकड यासह अन्य प्राणी देखील वास्तव्य करतात.
हे मयूर अभयारण्य नायगाव परिसरात जवळपास 29.90 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेले आहे. यामध्ये प्राण्यांसाठी जवळपास 28 पाणवठे बनवण्यात आले आहेत. मात्र उन्हाळ्याच्या आणि उष्णतेच्या दिवसांमध्ये हे पाणवठे कोरडे ठाक पडले असून वनविभागाकडून मोरांसह वन्य प्राण्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वन विभागातील बेजबाबदार अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता पक्षीप्रेमीं, प्राणीमित्र आणि वन्यप्रेमींमधून होत आहे.
याबद्दल वनरक्षक दादासाहेब तेजराव यांना आम्ही विचारले तेव्हा, वन्यजीव परिक्षेत्र नायगावमध्ये परिक्षेत्रात एकूण 28 पाणवठे आहेत. पावसाळ्यानंतर फेब्रुवारीच्या दरम्यान टँकरद्वारे पाणवठ्यामध्ये पाणी टाकले जाते, दर आठ ते दहा दिवसाला पाणवठ्याची परिस्थिती पाहून पाणी पुन्हा टाकले जाते, तसेच पाणवठ्याच्या बाजूला किंवा आडबाजूला खाद्य प्राण्यांसाठी खाद्याची सोय देखील केली जाते, असेही त्यांनी सांगितले.
पशु-पक्ष्यांची गणना ही कोव्हिडच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांच्या काळामध्ये झालेली नाही. प्रत्येक वर्षी बुद्ध पौर्णिमेला ही पशुगणना केली जाते, पण यावर्षीची पशुगणना करण्याबाबत अजून कोणत्याही सूचना आल्या नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन वर्षापूर्वी जी पशुगणना झाली होती त्यामध्ये मोरांची संख्याही आठ हजाराच्या आसपास होती, त्यामध्ये त्या दोन वर्षाच्या कालावधीत किमान एक हजार मोरांची संख्या वाढली असण्याची शक्यता इथले अधिकारी व्यक्त करत आहेत.