पंढरीची वाट बिकट ; चंद्रभागेवरील जुन्या दगडी पुलाची दुरावस्था ठिकठिकाणी पडले खड्डे
अवघ्या महाराष्ट्राला पंढरीच्या वारीची आस लागली असताना पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत शंभर वर्ष जुन्या ऐतिहासिक जुन्या दगडी पुलाची दुरावस्था झाली आहे. प्रशासन चालढकल करत असून अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न वारी तोंडावर निर्माण झाला आहे, प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा रिपोर्ट...
X
सोलापूर : पंढरपूरच्या विठ्ठलाची आषाढी वारी काही दिवसावर येवून ठेपली असून त्यामुळे पंढरपूरला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे वेगाने व्हावीत,यासाठी युद्ध पातळीवर शासन,प्रशासन हालचाली करताना दिसत आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासन यांच्यामध्ये सातत्याने बैठका सुरू आहेत. आषाढी वारी ही सर्वात मोठी वारी समजली जाते. या वारीत महाराष्ट्राच्या विविध भागातून पंढरपुरात पालख्या दाखल होत असतात. यामध्ये पुणे जिल्ह्यातून येणाऱ्या पालख्याचा मुख्य:त समावेश असतो. या पालख्या पुण्यातून येत असताना ठिकठिकाणी मुक्काम करत येतात. यामध्ये वारकऱ्यांना शासन आणि प्रशासन विविध प्रकारच्या सुविधा देत असते. विविध ठिकाणी या पालख्यांचे रिंगण सोहळे होतात. यामध्ये लाखो वारकरी सहभागी झालेले असतात. जळगावातून पंढरपूरच्या दिशने काही पालख्यांचे प्रस्थान झाले आहे. तर काही पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होण्याच्या मार्गावर आहेत. पुण्यावरून पंढरपूरकडे येणाऱ्या पालखी मार्गाची अपूर्ण राहिलेली कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात ही कामे पूर्ण होतील,असे सांगितले जात आहे. पंढरपूरला येणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे पूर्ण केले जात असताना पंढरपूरच्या चंद्रभागा नदीत असलेल्या शंभर वर्षे जुन्या दगडी पुलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे वारीच्या काळात दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जुना दगडी पुल वाहतुकीसाठी बंद असतानाही या पुलावरून वाहने वाहत असून या पुलावर खड्डे पडले आहेत. पुलाचे संरक्षक कठडे तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनधारकाना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. या पुलाची ठिकठिकाणी पडझड झाली असल्याने आषाढी वारीच्या काळात मोठी दुर्घटना घडल्यास याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न महर्षी वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केला असून प्रशासनाला वारंवार अर्ज,विनंत्या करूनही प्रशासन टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याचे त्यांनी सांगतले. त्यामुळे ऐन वारीच्या काळात आंदोलन करण्याचा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे. येणाऱ्या काळात शासन,प्रशासन काय भूमिका घेते याकडे वारकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ऐतीहासिक पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी
पंढरपूरच्या चंद्रभागा नदीतील जुना दगडी पुल 100 ते 150 वर्षापूर्वीचा असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी दिली. या पुला विषयी बोलताना त्यांनी सांगितले की,हा एेतिहासिक पुल असून हजारो वारकऱ्यांना पंढरपूरशी जोडणारा हा पुल आहे. पण प्रशासनाचे या पुलाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता या पुलाच्या खड्यातून फेसबुक लाईव्ह केले. त्यानंतर खड्यात होळी करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला,पण प्रशासन मात्र लक्ष देण्यास तयार नाही. गुढपाडव्याच्या सणाला याच खड्यात गुडी उभारून सण साजरा केला. तरीही प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यानंतर वारकऱ्यांच्या हस्ते या पुलाच्या दुरावस्थेला साडी चोळीचा आहेर करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुलाची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. पण प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या पूलाकडे डोळेझाक करत असून वारीच्या काळात हा पुल महत्वाची भूमिका बजावतो. नदीच्या पलीकडे वारीच्या काळात 65 एकर पटागणात एस्टी स्टँड केले जाते. तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याच परिसरात सुमारे 500 मठ असून या मठात राहणारे भाविक पंढरपुरात येत असताना या पुलाचा उपयोग करत असतात. त्यामुळे हा पुल वारकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. याच कारणाने त्याची दुरुस्ती करण्यात यावी. असे महर्षी वाल्मिकी संघाला वाटत आहे.
पूलावरच्या खड्ड्यात अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार ?
या जुन्या पुलावरून दररोज अनेक भाविक ये-जा करत असतात. दुर्दैवाने वारीच्या काळात या पुलावरील खड्ड्यात एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांचे म्हणणे आहे की, प्रशासन फक्त कागदावरच योजना राबवत आहे. या पुलाच्या दुरुस्तीसाठी चांगला अधिकारी द्यावा. या पुलाबरोबरच पंढरपुरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासनाला या पुलाच्या दुरुस्तीसाठी सांगूनही उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून वारीच्या काळात एखाद्या निष्पाप भाविकांचा बळी जाण्याची शक्यता असून त्याची सर्व जबाबदारी शासन प्रशासनावर आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती लवकर करण्यात यावी. असे नागरिकांना वाटत आहे.
आषाढी वारीला पंढरपुरात 20 ते 25 लाख भाविक होतात दाखल
आषाढी वारी ही इतर वाऱ्यापेक्षा मोठी असते. या वारीत 20 ते 25 लाख भाविक पंढरपुरात दाखल होतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षापासून वारी बंद होती. त्यामुळे आषाढी वारी ही एेतिहासिक होणार आहे. वारीच्या काळात या जुन्या दगडी पुलावरून लाखो भाविक ये-जा करतात. या पुलावरील खड्ड्यात एखादी वयोवृध्द महिला, अथवा पुरुष पडून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे. याच पुलाच्या शेजारी चीटकून जुने शिवतीर्थ आहे. या ठिकाणी स्वातंत्र्य पूर्व काळात अनेक नेत्यांच्या सभा झाल्या होत्या. येथून त्यांनी इंग्रजाविरुध्द रान पेटवले होते. या एेतीहासिक शिवतीर्थाची ही मोडतोड झाली असून त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे गणेश अंकुशराव यांनी सांगितले.
पूलावरचे कठडे झाले गायब
पुलावर सुरक्षेच्या दृष्टीने उभारलेले संरक्षक कठडे गायब झाले आहेत,तर पाण्याच्या वेगाने पुलाचा काही भाग वाहून गेला आहे. या खड्ड्यातून येत असताना वाहनधारकाना मोठी कसरत करावी लागत आहे. पुलाला कठडे नसल्याने वाहने नदीत कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एखादा मोठा अपघात घडल्यांनतरच शासन,प्रशासन जागे होणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. पंढरपूर मध्ये दररोज हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात अशी अपेक्षा भाविकांची असते. पण त्यांना खड्डेमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे. याकडे शासन,प्रशासनाने लक्ष देवून आषाढी वारीच्या तोंडावर जुन्या दगडी पुलावरील खड्डे बुजवण्याचे मागणी नागरिकांत जोर धरू लागली आहे.
जुना दगडी पूल कालबाह्य झाला असल्याने वाहतुकीसाठी बंद - सार्वजनिक बांधकाम विभाग
नवीन फुल शासनाने बांधला असल्याने दगडी पुलावरची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. दगडी पूल फारच जुना असल्याने तो कालबाह्य झाला आहे. त्यामुळे त्याच्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसे पत्र ही जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. अशी माहिती पंढरपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गावडे यांनी दिली.