गावखेड्यातील चित्रकाराची सातासमुद्रापार झेप
ग्रामिण भागातील जगणं कागदावर मांडणे प्रत्येकाला शक्य नसते. मात्र हेच जगणं एका युवकाने कागदावर उतरवून जगभर पोहचवलं आहे. पण या चित्रकाराचा संघर्ष कसा होता? त्याने आपली चित्र जगभर कशी पोहचवली. याचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी वेध घेतला आहे.
X
निसर्गाने प्रत्येक व्यक्तीत उपजतच कलागुण विकसित केलेले असतात. या कलागुणांना योग्यवेळी योग्य प्रकारे वाव मिळाला तर तो त्या कलेत यशस्वी होतो. अशाच प्रकारे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील दारफळ सीना या गावातील शेतकरी कुटूंबातील रत्नदीप बारबोले यांनी काढलेली चित्रं जगभर पोहचली आहेत.
रत्नदीप बारबोले यांचे वडील शेतकरी. त्यामुळे रत्नदीपने नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा. त्यामुळे सुरुवातीला रत्नदीपने नोकरी शोधली. पण नोकरी मिळाली नाही. त्यामुळे लहानपणीचा चित्र काढण्याचा छंद रत्नदीपने जोपासण्यास सुरुवात केली. पुढे रत्नदीपने चित्रकलेत चांगला जम बसवला. त्यातूनच त्याने काढलेली चित्रं विविध ठिकाणी प्रदर्शनास पाठवण्यास सुरुवात केली. यामध्ये कलकत्ता येथे रत्नदीपचे पहिले चित्र विकण्यात आले. त्यानंतर रत्नदीपने सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केल्याचे सांगितले. तसेच सोशल मीडियामुळे त्याच्या चित्रांना इंग्लड, रशिया, अमेरिका या देशांमधून मागणी आहे. तसेच अमेरिकेतील न्युजर्सी येथून रत्नदीपला छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र बनवण्याची ऑर्डर आली होती. ती ऑर्डर नुकतीच पुर्ण केल्याची माहिती रत्नदीप देतो.
प्राथमिक शिक्षण झाले गावात माढा तालुक्यातील दारफळ सीना गाव सीना नदीच्या काठी वसलेले तीन ते चार हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. गावच्या कडेने सीना नदी वाहत असून तिला बारमाही पाणी असते. त्यामुळे या गावच्या परिसरात बागायती शेतीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येते. या गावातील लोक शेती आणि मजूरी करतात. या गावात राहुन रत्नदीप चित्र काढण्याचे काम करतो.
रत्नदीपचे आई - वडील शेतकरी करीत असून त्याच्या कुटुंबात कोणीही यापूर्वी चित्रकार नव्हता. त्याला या क्षेत्राची ओळख त्याचे शालेय शिक्षक यांनी करून दिली. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. तर माध्यमिक शिक्षण नवभारत हायस्कूल येथे झाले. त्याच बरोबर चित्रकलेच्या क्षेत्रातील एटीडी नावाचा दोन वर्षाचा कोर्स देखील रत्नदीपने पूर्ण केला आहे. त्यामुळेच त्याला चित्रे काढण्याची कला आणखी चांगल्या पध्दतीने विकसित करता आली. त्याचे बालपण आणि शिक्षण गावात झाल्याने त्याच्या पेंटिंगमध्ये शहरी जीवनापेक्षा ग्रामीण भागातील जीवन मोठ्या प्रमाणात दिसून येते.
रत्नदीपची चित्रं जगभर पोहचत आहेत. मात्र कोरोनाच्या काळात या कलेवरही संकट कोसळलं. लोक चित्र खरेदी करत नव्हते. मात्र या काळात मित्रांनी साथ दिल्याचे रत्नदीप सांगतो. तसेच युवकांनी सोशल मीडियाचा चांगल्या पध्दतीने वापर करावा, असं मत रत्नदीप व्यक्त करतो.