Home > मॅक्स रिपोर्ट > हंडाभर पाण्यासाठी ३ किमी पायपीट

हंडाभर पाण्यासाठी ३ किमी पायपीट

जानेवारी महिना संपत आला की पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर आदिवासी बांधवांचे चेहरे चिंतीत झालेले दिसतात...त्यांच्या चेहऱ्यावरची चिंता नेमकी कशामुळे आहे, त्यांच्या दरवर्षीच्या या त्रासाला कोण जबाबदार आहे हे दाखवणारा आमचे प्रतिनिधी रवींद्र साळवे यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

हंडाभर पाण्यासाठी ३ किमी पायपीट
X

पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुका आजही विकासाचे स्वप्न उराशी बाळगून वाट पाहतोय... पण अजून तरी या तालुक्यातील नागरिकांच्या नशीबी उपेक्षाच आलेली दिसते आहे. दरवर्षी अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी मोठ मोठ्या आकड्याची तरदूत केली जाते. परंतु खऱ्या अर्थाने येथील आदिवासींचा विकास होताना दिसत नाही. अनेक योजना कागदावर राबवल्या जातात. यामुळे आदिवासींचा विकास हा फक्त प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या तोंडून ऐकायला मिळतोय.

नळपाणी योजनांची प्रतिक्षा

गेल्या अनेक वर्षात मोखाडा तालुक्यात नळपाणी पुरवठा योजनांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला. परंतु नावापुरता राबवलेल्या योजनांमुळे आदिवासींच्या पाचवीला पुजलेली पाणीटंचाईची समस्या अद्याप सुटलेली नाही.

तालुक्याच्या मुख्यालयाला लागून 5 किमी अंतरावर असलेले 313 आदिवासी लोकवस्तीचे चास हे गाव...या ठिकाणी फेब्रुवारी महिना उजाडताच भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून 3 किमीचा डोंगर पार करून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.


या गावात पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचा आरंभ करण्यात आला, खड्डाही खोदला गेला. पण पुढचे कामकाज सुरू करण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. पावसाळ्यात या खड्ड्यात पाणी भरल्याने अपघाताची भीती असते. तसेच दोन वर्षांपासून हे काम रखडले असल्याने ह्यावर्षी देखील येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार नसल्याची चिन्ह आहेत.

यामुळे पुढील काळात पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला गावकऱ्यांच्या रोषाला चांगलेच सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसेच तालुक्यातील नाशेरा, वाकडपाडा , काष्टी, उधळे ,सायदे, मारुतीचीवाडी, कारेगाव ,चास, गोमघर, बेरिस्ते, सावर्डे, येथील ठिकाणच्या नळपाणी पुरवठा योजना तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात, या मागणीसाठी मोखाडा पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य प्रदीप वाघ यांनी मोखाडा पंचायत समिती समोर 3-9-2020 रोजी उपोषण केले होते.

यावेळी ह्या अपूर्ण असलेल्या नळपाणी पुरवठा योजना डिसेंबरपर्यंत पूर्ण केल्या जाणार असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. परंतु हे आश्वासन प्रशासनाने पाळले नाही. अनेक नळपाणी पुरवठा योजनांच्या कामाला पुन्हा सुरुवातच करण्यात आली नाही. असा आरोप वाघ यांनी केला असून यामुळे पुन्हा ग्रामस्थांसोबत आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा प्रदीप वाघ यांनी दिला आहे.

आदिवासी बांधवांसाठीच्या या नळ पाणी योजनेतले शुक्राचार्य कोण? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची गरज आहे.

नळपाणी पुरवठा योजनेवर करोडोचा खर्च योजना मात्र लालफित...?

मागील आठ वर्षात शासनाने नळपाणी पुरवठा योजनेसाठी करोडोचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र, नागरिकांना किती पाणी मिळाले? कोणत्या गावात योजना पूर्ण झाल्या कोणत्या गावात अपूर्ण झाल्या आहेत. त्याचा सविस्तर तपशील?

(सदर योजनांची माहिती पाणीपुरवठा विभागाने लेखी दिली आहे)

1) नाशेरा- येथील नळपाणी पुरवठा योजना सन 2011 -12 मध्ये मंजूर झाली. ह्या योजनेला 40 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला. व त्याचा कार्यादेश 10-1-2013 मध्ये देण्यात आला व या कामाची मुदत 24 महिने होती. परंतु किरकोळ काम बाकी असल्याने तिचे हस्तांतरण अजून बाकी आहे.

2) वाकडपाडा- येथील योजनेला सन 2011- 12 मध्ये मंजुरी मिळाली व ह्या योजनेला 40 लाखाचा निधी देण्यात आला व याचा कार्यादेश दिनांक 14-12-2012 मध्ये देण्यात आला. या कामाची मुदत 24 महिने होती. व हे काम पूर्ण झाले असून दिनांक 31-10- 2020 ही योजना ग्रामपंचायततीकडे वर्ग करण्यात येईल. असे प्रशासनाने पंचायत समितीचे सदस्य प्रदीप वाघ यांनी केलेल्या उपोषण दरम्यान लेखी आश्वासना म्हटले होते. परंतु 4 महिन्याचा कालावधी उलटूनही ही योजना पाणी पुरवठा विभागाने हस्तांतरित केलेली नाही.

3) काष्टी- थील योजनेला सन 2011- 12 मध्ये मंजुरी मिळाली व ह्या योजनेला 15 लाखाचा निधी देण्यात आला. व याचा कार्यादेश दिनांक 15 -1-2013 मध्ये देण्यात आला. या कामाची मुदत 24 महिने होती. या योजनेतील मिटरचे काम पूर्ण झाले असून पाणी चाचणीचे काम बाकी आहे. ठेकेदार यांच्याकडून लवकरच योजना ग्रापंचायतीस हस्तांतरीत करण्यात येईल. असे 4 महिन्यापूर्वी पाणीपुरवठा विभागाने सांगितले होते. परंतु कोणतेच काम करण्यात आलेले नाही.

4) उधळे- येथील योजनेला सन 2012- 13 मध्ये मंजुरी मिळाली व ह्या योजनेला 30 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला व ह्याचा कार्यादेश दिनांक 14-12-2012 मध्ये देण्यात आला व ह्या कामाची मुदत 24 महिने होती व ही योजना सन 2020 मध्ये पूर्ण करण्यात आली असून ग्रामपंचायत कडे हस्तांतरित करण्यात आली आहे.

5) सायदे मारुतीवाडी- येथील योजनेला सन 2012-13 मध्ये मंजुरी मिळाली ह्या योजना 15 लाखाचा निधी देण्यात आळवे ह्याचा कार्यादेश दिनांक 20-12-2013 मध्ये देण्यात आला व या कामाची मुदत 24 महिने होती व ही योजना 2020 मध्ये पूर्ण करण्यात काली असून योजना ग्रापंचायतीला हस्तांतरित करण्यात आली आहे.

6) कारेगाव- येथील नळपाणी पुरवठा योजनेला 2015- 16 मध्ये मंजुरी मिळाली व हया कामाची मुदत 24 महिने होती. परंतु जलशुद्धीकरण केंद्राची जागा बदलेली आहे. त्यामुळे सुधारित अंदाजपत्रक

नुसारा 2 ते 3 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे काम मार्च 2021 पर्यंत पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. असे 4 महिन्यापूर्वी सांगण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत ह्या कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.

7) चास - येथील योजनेला सन 2018- 19 मध्ये मंजूरी मिळाली व ह्या योजनेला 53 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. ह्याचा कार्यादेश दिनांक 8-3- 2019 मध्ये देण्यात आला. कामाची मुदत 6 महिने होती. सदरचे काम डिसेंबर 2020 पर्यत पूर्ण करण्यात येईल. असे सांगण्यात आले होते. परंतु काम बंदच होते. परंतु मॅक्समहाराष्ट्र ने बातमी प्रसिद्ध केल्यानंतर हे काम सुरू करण्यात आले आहे

8) गोमघर - येथील योजनेला सन 2018- 19 मध्ये मंजुरी देण्यात आली व ह्या योजनेला 70 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कामाचा कार्यादेश 16-5-2019 मध्ये देण्यात आला व या कामाची मुदत 12 महिने होती व हे काम डिसेंबर 2020 पर्यत पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल. असं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता हे काम आता दोन दिवसांपूर्वी सुरू केले आहे

9) बेरिस्ते - येथील योजना सन 2016- 17 मध्ये मजुरी मिळाली व ह्या योजनेला 65 लाखाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला व ह्याचा कार्यादेश दिनांक 21-1- 2017मध्ये देण्यात आला कामाची मुदत 6 महिने होती. हे काम अर्धवट स्थितीत असून डिसेंबर 2020 पर्यत पूर्ण करण्यात येईल. परंतु अजूनही उर्वरित कामाला सुरवात करण्यात आलेली नाही.

10) सावर्डे - येथील योजना सन 2016- 17 मध्ये मंजुरी मिळाली व ह्या योजनेसाठी 75 लाखाचा निधी देण्यात आला. ह्याचा कार्यादेश दिनांक 9-4-2018 मध्ये देण्यात आला. कामाची मुदत 12 महिने होती व हे काम अर्धवट असून मार्च 2021 पर्यत हे काम पूर्ण करून पाणी पुरवठा करण्यात येईल. असे पाणी पुरवठा विभागाने सांगितले होते. परंतु अद्याप कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही.


(सदर योजनेच्या सद्यस्थिती काय आहे? हे मॅक्समहाराष्ट्रच्या रिपोर्टरना ग्राउंड झिरोवर जाऊन पाहिलं आहे.)

दरम्यान या प्रलंबित योजनासंदर्भात आम्ही माधूरी वाडिले यांच्याशी बातचित केली असता... त्यांनी काही ठिकाणचे काम पूर्ण करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणची काम लवकरच सुरु करु असं मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.


मात्र, गेल्या आठ वर्षात एवढा पैसा खर्च करुनही फक्त सायदे मारुतीचीवाडी, व उधळे, येथील दोनच योजना पूर्ण झाल्या आहेत. अजुनही वाकडपाडा येथील योजनेचे हस्तांतर बाकी आहे. तर नाशेरा, काष्टी, कारेगाव, गोमघर, बेरिस्ते, सावर्डे,चास अशा एकूण 7 ठिकाणच्या योजना अपूर्ण आहेत. या योजनांना शासनाने मोठ्या प्रमाणत निधी उपलब्ध करून दिला. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे वर्षानुवर्षे ह्या योजना खितपत पडल्या आहेत. त्यामुळं आजही अनेक गावांतील महिलेच्या डोक्यावरचा हंडा खाली तरलेला नाही.



Updated : 31 Jan 2021 6:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top