गणवेश निधी अभावी विद्यार्थी गणवेशापासुन वंचित, बहुजन विद्यार्थी संघटना आक्रमक
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून रायगड जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षण विभागामार्फत शालेय गणवेश निधी शालेय व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यावर वर्ग न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नसल्याने बहुजन विद्यार्थी संघटना रायगड आक्रमक झाली आहे.
X
संघटनेच्या वतीने रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी ज्योती शिंदे पवार यांना तक्रारी निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसात शालेय व्यवस्थापन समिती कडे सर्व निधी वर्ग झाला नाही तर येत्या दोन दिवसात बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात राज्य अध्यक्ष अनिल वाणी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष गायकवाड यांनी दिला आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून सदर निधी प्राप्त होतो. हा निधी दि.15/11/2021 रोजी शिक्षण विभाग प्राथमिक विभाग यांना प्राप्त झाला होता. रायगड जिल्ह्यात एकूण 2680 शाळा असून लाभार्थी विद्यार्थी संख्या 77005 इतकी आहे, प्रति विद्यार्थी गणवेश संच 300 रुपये प्रमाणे एकूण निधी रक्कम 2 कोटी 31 लाख 1500 प्राथमिक शिक्षण विभागाकडून गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे वितरित करण्यात आला असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. दि.08 फेब्रुवारी 2022 रोजी सदर निधीचे वितरण करण्यात आले. पब्लिक फंड मॉनिटरिंग सिस्टीम मध्ये सर्व बँक खाते नव्याने उघडून जुने खाते बंद केली होती. वरिष्ठ कार्यालयाकडून सदरची खाते 0 असावेत या सूचना प्राप्त झाले होत्या. त्यामुळे सदर रक्कम शाळा समितीच्या बँक खात्यात जमा करण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाली होती. असे स्पष्टीकरण प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आले.
यावेळी अनिल वाणी म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झालेले असताना रायगड जिल्ह्यात अद्याप अनेक शाळेत गणवेश वाटप झालेले नाही. प्रति विद्यार्थी एका गणेश संचाकरिता रुपये 300 प्रमाणे निधी प्राप्त झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात निधी वर्ग केला नाही, त्यामुळे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत. दरम्यान कोणत्याही परिस्थितीत गणवेश वितरणामध्ये विलंब होणार नाही व गणेशपात्र लाभार्थी सदर लाभापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापन समिती ,शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी , महानगरपालिका प्रशासन अधिकारी यांनी घेणे आवश्यक असताना गणवेश वाटपात विलंब का झाला? याची सखोल चौकशी व्हावी , तसेच येत्या दोन दिवसात शालेय व्यवस्थापन समितीकडे सदर निधी वर्ग न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वाणी यांनी दिला. यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करीत शिक्षण विभाग दणाणून सोडला.
यावेळी बहुजन विद्यार्थी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल वाणी, रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गायकवाड, रायगड जिल्हा उपाध्यक्ष निशांत पवार, पेण तालुका अध्यक्ष नागेश सुर्वे, पनवेल तालुका अध्यक्ष प्रशिक बिनेदार, सुधागड तालुका अध्यक्ष ऍड सुशिल गायकवाड, खालापूर तालुका अध्यक्ष आकाश केदारी,रोहा तालुका अध्यक्ष गणेश कांबळे, कर्जत शहर अध्यक्ष सुजल गायकवाड, रायगड जिल्हा संघटक जतीन मोरे, आदींसह बहुजन विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बहुजन विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून तक्रारी निवेदन प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांच्या गणवेशाकरिता शासनाकडून प्राप्त झालेला निधी जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तालुका स्थरावर निधी वितरित करण्यात आला आहे. गणवेश खरेदी करणे हा शालेय व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे, मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना गणवेश का मिळाले नाहीत याचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडून मागवून योग्य ती पुढील कार्यवाही केली जाईल असे ज्योत्स्ना शिंदे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, जिल्हा परिषद रायगड यांनी सांगितले.