Ground Report : मुंबईतील भीषण वास्तव, शौचालय नसल्याने उघड्यावर जाण्याची वेळ
X
महिलांच्या सन्मानासाठी केंद्र सरकार ग्रामीण व शहरी भागात "जहाँ सोच वहाँ शौचालय" या जाहिरातीद्वारे व्यापक मोहीम राबवते. एकीकडे देशातील कोट्यवधी घरांना शौचालयाची व्यवस्था केल्याचे दावे केंद्रातील सरकार करत आहे. तर दुसरीकडे मुंबईत सत्तेत असलेली शिवसेना दिलेले शब्द पाळल्याचा दावा करत मतांचा जोगवा मागत आहे. पण याच मुंबईतील एक भीषण वास्तव आम्ही कुम्हाला दाखवत आहोत. मुंबईतील अनेक भागांमध्ये आजही सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था नाहीये, त्यामुळे त्या भागातील महिला आणि पुरूषांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीतील हे चित्र भयानक आहे. घाटकोपर मधील पार्कसाईट येथील राहुल नगर, शिवशक्ती सोसायटी, समर्थ सोसायटी, पंचशील सोसायटी या सर्व विभागातील महिला आणि पुरुषांना उघड्यावर शौचाला जावे लागत आहे. इथल्या आसपासच्या उघड्या मैदानावर हे विधी आटोपले जात असल्याने इथल्या लोकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.
उघड्यावर शौचाला जाणाऱ्या महिलांची सर्वाधिक कुचंबणा होत असते. पहाटे अंधारात आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतर शौचाला जावे लागते. शिवाय रात्री-अपरात्री उघड्यावर शौचाला जाणे धोकादायक देखील आहे. यामुळे महिलांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो आहे.