कुर्बानी नाही तर रक्तदान; बकरी ईदनिमित्त तब्बल 21 वर्षे रक्तदान
बकरी ईदच्या दिवशी होणाऱ्या कुर्बानीला फाटा देत नासिर वल्लाद या इंजिनिअरचे विधायक व पुरोगामी पाऊल उचलत सलग २१ वर्ष रक्तदानाचा उपक्रम हाती घेतला आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट...
X
समाजात काही थोडे लोक आपल्या विचारांना कृतीची जोड देतात. आणि कृतीतून प्रबोधन घडवितात. माणगाव तालुक्यातील नासिर वल्लाद हे इंजिनियर त्यातीलच एक आहेत. मागील 21 वर्षे बकरी ईद निमित्त त्यांनी रक्तदान केले आहे. अगदी कोरोनाकाळात सुद्धा बकरी ईद च्या दिवशी त्यांनी रक्तदान केले.
नासिर यांच्या घरात बकरी ईदनिमित्त कुर्बानी दिली जात नाही. ईद निमित्त सर्व धर्मीय बांधव त्यांच्या घरी येतात आणि शुभेच्छा देतात. पुरोगामीत्व सिद्ध करणारे अनेक उदाहरणे नासिर यांनी दाखवून दिली आहे.
लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी आणि विशेष म्हणजे एक मुलगी असूनही त्यांनी स्वतःची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतली आहे. नासिर हे अपघात ग्रस्तांच्या मदतीला देखील नेहमी धावून येतात. बकरी ईद व्यतिरिक्त ही त्यांनी अनेकदा रक्तदान केले आहे.
प्रत्येक समाज सुधारायला पाहिजे. समाजातील कालबाह्य रूढी परंपरा सोडून दिल्या पाहिजेत असे नासिर यांचे मत आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या पत्नीला व मुलीला कधीही हिजाब घालू दिला नाही. अशा प्रकारे नासिर वल्लाद यांनी एक विधायक व पुरोगामी पाऊल उचलून आदर्श घालून दिला आहे.
नासिर वल्लाद हे 49 वर्षांचे आहेत. मागील वर्षी त्यांना थायरॉईडच्या आजाराने ग्रासले. तसेच इतरही शारीरिक व्याधींमुळे त्यांना रक्तदान करणे शक्य होत नाही. मात्र तब्बल 21 वर्षे त्यांनी बकरी ईदच्या निमित्ताने दिलेला हा कृतीयुक्त विधायक संदेश अनेकांना प्रेरणादायी ठरत आहे. शिवाय समाज प्रबोधनाचे त्यांचे काम अखंडपणे सुरुच आहे.
रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचविल्याचे समाधान मिळते. लोकांनी जनावरांचे बलिदान देण्यापेक्षा समाजासाठी काही उपयुक्त ठरेल असे उपक्रम करायला पाहिजेत. सर्व धर्म हे चांगलेच आहेत. त्यामधील रूढी व परंपरा फक्त चिकित्सकपणे स्वीकारल्या पाहिजेत, असे इंजिनिअर, समाज प्रबोधक नासिर वल्लाद यांनी सांगितले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व मुस्लीम सत्यशोधक मंडळ बकरी ईद निमित्त मागील 10 वर्षांपासून रक्तदानाचे राज्यव्यापी अभियान राबवत आहे. जात धर्मापलिकडे जावून मानवतेचा संदेश देण्यासाठी तसेच त्याग, सेवा, सद्भावना या माध्यमातून परिवर्तन घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे. नासिरभाई यांनी 21 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न बकरी ईदच्या कुर्बानीला काल सुसंगत व विधायक पर्याय ठरेल असा विश्वास वाटतो, असे अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर यांनी सांगितले.