रायगड: वाळीत कुटुंबांच्या वेदना कधी संपणार? कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा
X
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर येथे एका कोळी समाजातील कुटुंबावर जाती अंतर्गत सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेली सात महिने कोळी समाजातील एका कुटुंबाला कोळी गावकमिटी ने सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यासंदर्भात मक्समहाराष्ट्र ने हे प्रकरण सर्वांसमोर आणले. त्यानंतर रायगड सह राज्यातील विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पीडित कुटूंबियांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला आहे. वाळीत प्रकरणाची पाश्वभूमी वाळीत कुटुंबीयांनी कथन केली, यावेळी कोळी कुटुंबाने सांगितले की दि. 27/04/2021 रोजी हनुमान जयंती निमित्ताने गावात पालखी सोहळा खूप मोठ्या उत्साहात चालू होता, कोरोना प्रादुर्भावामुळे जमावबंदी असल्यामुळे गावात पालखी सोहळा होणार नव्हता परंतु गावातील पंच मंडळीने पालखी मिरवणूक काढली आणि खूप जल्लोशाने मिरवली. सदर पालखी सोहळा मध्ये दिवसा गावातील तरुणांची भांडण झाली असताना देखील या पंच मंडळीने रात्री देखील पालखी मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीत अशोक कोळी आणि गावातील एका पंच मंडळी (नरेश ध कोळी) यांच्यात काही वाद घडून आला. सदर वाद सोडविण्यासाठी देवेंद्र मा. कोळी आणि त्यांच्या घरातील गजानन मा कोळी, दत्तात्रेय भ. कोळी हे गेले होते. त्या नंतर काही वेळाने हा वाद शांत झाला. परंतु थोड्याच वेळाने देवेंद्र कोळी यांना पेण पोलीस ठाणे मधून फोन आला कि जमावबंदी असताना तुमच्या गावात पालखी मिरवणूक होतेय. असं आम्हाला कळलंय. आम्ही तिथे येतोय.
काही वेळाने पोलीस गावात आले आणि त्यांनी विचारले कि गावात पालखी कोणी काढली, ती पालखी पंच मंडळी यांनीच काढली असं समजताच पोलीस अधिकाऱ्यांनी सदर पंच मंडळी आणि त्या पालखीत झालेली भांडणे यांना त्वरितच गाडीत बसवून पेण पोलीस ठाणे येथे हजर केले. सदर पालखी मिरवणूकीचा कोणताही गुन्हा दाखल न होता फक्त पालखी मध्ये झालेल्या भांडणाचा अदखल पात्र गुन्हा पेण पोलीस ठाणे यांनी घेतला. सदर पालखी सोहळ्या बद्दलची माहिती आम्हीच दिली आणि गावात पोलीस बोलावले असा मनात राग धरून गावातील पंच मंडळी ने दि. 28/04/2021 रोजी सकाळी 9 वाजता गावातील वयोवृद्ध महिला सोबत घेउन गावापंचाच्या बैठकीत सदर कारवाईचा ठपका ठेवून अशोक कोळी, दत्तात्रेय कोळी, गजानन कोळी यांची कोणतीही बाजू ऐकू न घेता या 3 कुटुंबाना वाळीत टाकण्याचे निर्णय पंच मंडळीने घेतले. त्यामध्ये त्यांचे रेशनिंग दुकानातून रेशन कोणी घेऊ नये, यांच्या बोटीत कोणी जाऊ नये, यांच्या टेम्पोत कोणी जाऊ नये, समुद्रात असताना यांना काही अडचण आली तरी मदत कोणी करू नये, यांच्या सुख दुःखात कोणीही सहभागी होऊ नये, यांच्या कडून मच्छी कोणी खरेदी करू नये. यांच्या सोबत कोणी बोलू नये, जर कोणी यांच्या सोबत असे करताना दिसेल त्याला प्रत्येकी 30000 रुपये चा दंड आकारण्यात येईल असा निर्णय सदर बैठकीत सांगण्यात आला असून दि. 06/05/2021 रोजी तशी जाहीर दवंडीचं संपूर्ण नवघर कोळीवाडा गावामध्ये देण्यात आली होती. यामुळे आमची मोठी सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक कोंडी झाली असल्याचे कोळी कुटुंबातील सदस्यांनी सांगितले.
रायगडातील या वाळीत कुटुंबियांना जलद न्याय न मिळाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करू असा इशारा ऑल इंडिया पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ केदार यांनी दिला आहे. ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पोलीस उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वाळीत कुटुंबियांना न्याय देण्याच्या दृष्टीने सोमवारी बैठक लावून तोडगा काढू असे डीवायएसपी विभा चव्हाण यांनी आश्वाशीत केले आहे. दिपकभाऊ केदार यांनी निवेदनाद्वारे म्हटले की कोळी कुटुंबाला वाळीत टाकून त्यांचं सामाजिक, आर्थिक शोषण केले आहे. डीवायएसपी यांच्याशी चर्चा करून तात्काळ बहिष्कार उठवण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा सर्व पंचावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
संविधान असतांना, स्वतंत्र भारत असतांना, कायदा असतांना हुकूमशाही पद्धतीने समांतर न्याय व्यवस्था जात पंचायतच्या नावाने राबवली जाते. हे एकप्रकारे कायद्याला चॅलेंज आहे. हा जातीय आतंक आहे.
पीडित सांगतात, आमच्याकडून व्यवहार केला तर 30 हजार रुपये गावतल्याना दंड आहे, आमच्यासोबत बोलले तर 10 हजार दंड दौंडी देऊन जाहीर केला आहे. लहान मुलगा म्हणतो मला शाळेत जाण्यास रिक्षा गाडी दिली जात नाही मला 2.5 किलोमिटर एकट्याला जावं लागतं. या कुटुंबाकडे रेशन दुकान आहे ते रेशन सुद्धा कुणी घेईला येत नाही. अशाप्रकारे 7 महिने हा छळ सुरू आहे.
2013 ला नाशिक मध्ये एका पित्याने आपल्या पोटच्या मुलीचा गळा घोटून हत्या केली, कारण होतं आंतरजातीय विवाह केला त्यानंतर आंदोलने झाली, महाराष्ट्र सरकारने 13 जुलै 2017 ला सामजिक बहिष्कार कायदा पारित केला तरीही हे गुन्हे वाढत आहे. स्थानिक राजकारण, जातीय वर्चस्व, नेत्यांचं पाठबळ या बळावर जातीचे मक्तेदार मनमानी करून समांतर न्याय व्यवस्था सुरू आहे.
ऑल इंडिया पँथर सेना या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहे. सरकार जात पंचायतच्या हुकूमशाहितुन हत्याकांड झाल्यावरच जागी होणार आहे का? स्थानिक पालकमंत्री, जिल्हा प्रशासन यांनी दखल घेतलेली नाही. मानवता म्हणून या प्रकरणाकडे पाहत नाही.
महाराष्ट्रात ही जातीय हुकूमशाही मोडीत काढावी, नव्या कायद्याच्या धर्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, गावात सामंजस्य निर्माण करून प्रकरण सोडलं पाहिजे. 120 (ब), 389 अंतर्गत सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे. लवकरात लवकर या प्रकरणाचा तोडगा नाही निघाला तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
हिंदू खतरे में है म्हणणार्यांनी हिंदू मधील हिंदू कुणी खतऱ्यात घातला यावर बोलावं, धर्मासाठी माणसं हे धोरण राबवले जात आहे, माणसांसाठी धर्म राहिलेला नाही.
आम्ही मानवतावादी, आंबेडकरवादी म्हणून या पीडित कुटुंबाच्या पाठीशी आहोत, जातीच्या मक्तेदारीमुळे माणसं गुदमरून आम्ही मरू देणार नाहीत त्यांच्या न्यायाचा लढा आम्ही रस्त्यावर उतरून लढू!
26 नोव्हेबेर जवळ आहे संविधान दिन आहे, जातपंचायत ही संविधान विरोधी प्रक्रिया आहे. तिचा अंत करणे काळाची गरज आहे! असे दिपकभाऊ केदार यांनी म्हटले.
यासंदर्भात ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ केदार यांनी पेण डीवायएसपी विभा चव्हाण यांची वाळीत कुटुंबीयांसमवेत भेट घेतली. डीवायएसपी चव्हाण यांनी सोमवारी गावात बैठक घेऊन तोडगा काढू नाही तर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले आहे.