Home > मॅक्स रिपोर्ट > तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही, वाळीत प्रकरणातील कुटुंबीयांची व्यथा

तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही, वाळीत प्रकरणातील कुटुंबीयांची व्यथा

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय, याप्रकरणी वैफल्यग्रस्त पीडित कुटुंबियांनी न्यायाची अपेक्षा केली आहे. तक्रारीनंतर सहा महिने प्रशासनातील कोणी फिरकले नाही, आम्ही मरायचे काय? पीडित कुटुंबियांचा संताप आहे... आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....

तर आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही, वाळीत प्रकरणातील कुटुंबीयांची व्यथा
X

महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कार व वाळीत प्रकरणात कोकण अग्रस्थानी राहिला आहे. सामाजिक बहिष्कारासह गाव कमिटीचे जाचक नियम, अटी शर्थी व दंडेलशाहीने रायगड पोखरत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ६ महिन्यापासून आपल्या कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकल्याचा आरोप देवेंद्र मारुती कोळी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला असून या पंच कमिटीची सखोल चौकशी होऊन प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावाअशी मागणी केलीय. गावातील कुणी आमच्याशी संपर्क केला तर गाव कमिटी कडून दंड आकारला जातोय, कुणीही आमच्याशी बोलत नाहीत, घरी येत नाहीत , शिवाय सुख दुःखात सहभागी होत नाहीत, असा आरोप या कोळी कुटूंबाने केलाय. या मागणीकडे लक्ष वेधण्याकरिता १२ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी ठिय्या आंदोलन करणार आहेत.

हनुमान जयंतीला झालेल्या छोट्याशा वादाचे रूपांतर हे आम्हा कुटुंबीयांना वाळीत टाकण्यापर्यंत गेले असून आमच्याशी गावातील कुणीही लोक बोलत नसून आमचे आर्थिक व्यवहार बंद करण्यात आले आहेत. आमची मासेमारीची बोट बंद करण्यात आली असून बोटीवर काम करणारी १५ वर्षापासून काम करणारी जुनी माणसे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे आमचा मासेमारीचा व्यवसाय बंद करण्यात आल्याने आम्ही खायचे काय असा गंभीर प्रश्न आमच्यासमोर पडला आहे. या गाव पंच कमिटीमुळे आमच्या परिवाराला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे असे देवेंद्र कोळी या पीडित तरुणाचे म्हणणे आहे

शाळेतील लहान मुलांना शाळेत जाताना रिक्षात घ्यायचे नाही, लहान मुले दुकानावर खाऊ विकत घ्यायला आले तर त्यांना हटकणे, या मुलांशी गावातील मुलांनी कोणी खेळायचे नाही, कोणी बोलायचे देखील नाही असे या घरातील शाळकरी मुले सांगत आहेत. तसेच गावातील कोणीही व्यक्तीने आमच्याशी बोलायचे नाही, कोणतेही व्यवहार करायचे नाही आमच्याशी गावातील कोणी व्यक्ती बोलला तर त्यांचे फोटो काढले जातात आणि त्यांना गाव पंच कमिटीकडून दंड आकारला जातो अशी भयानक परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली असून त्यामुळे दंड पडेल या भीतीने गावातील लोकच काय आमचे नातेवाईक देखील घरी येण्याचे नाकारतात. आम्ही कपडे धुवायला, पाणी भरायला नळावर गेलो तर यांना पाणी द्यायचे नाही असे बोलून शिवीगाळ, टोमणे देऊन आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रकार गेली ६ महिन्यापासून आमच्यासोबत घडत आहे असे या पीडित कुटुंबातील स्त्रिया, लहान मुले आणि पुरूषांचे म्हणणे आहे. यासंबंधी आम्ही पेण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून या ६ महिन्यापासून कोणीही पोलीस अधिकारी किंवा प्रशासनाची व्यक्ती आमच्याकडे फिरकली नसून आम्ही मेल्यावर प्रशासनाचा माणूस येणार काय असे दत्तात्रेय कोळी या पीडित व्यक्तीचे म्हणणे आहे.

मी श्री महालक्ष्मी बचत गटाची अध्यक्षा असून आम्ही ५ वर्षापासून शासनमान्य रेशनिंग दुकान चालवीत आहोत परंतू आम्हाला गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्यात आल्यामुळे गावातील लोक त्यामुळे या प्रकरणामध्ये प्रशासनाने लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्या अन्यथा आम्ही आमच्या जीवाचे काही बरे वाईट करू असे येथील वैफल्यग्रस्त कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

मी श्री महालक्ष्मी बचत गटाची अध्यक्षा असून आम्ही ५ वर्षापासून शासनमान्य रेशनिंग दुकान चालवीत आहोत परंतू आम्हाला गाव पंच कमिटीकडून वाळीत टाकण्यात आल्यामुळे गावातील लोक गेली ५ महिन्यापासून आमच्या दुकानावर येतच नाहीत. त्यामुळे धान्याची पोती दुकानात तशीच पडून आहेत. तर गावातील त्रयस्थ व्यक्तीला हे रेशनिंग दुकान चालवायला हवे आहे त्याकरिता आमच्यावर रेशनिंग धान्याचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गाव पंच कमिटीकडून आमच्यावर लादला जात आहे असे देवेंद्र कोळी यांच्या पत्नी सौ.कोळी यांचे म्हणणे आहे.

माझ्या उभ्या आयुष्यात इतकी जुल्मी आणि वाईट प्रथा मी कधीच पाहिली नसून माझ्या मुलाबाळांच्या वाट्याला आलेले हे जगणे फारच दुर्दैवी आहे असे देवेंद्र कोळी यांच्या आजींचे म्हणणे आहे.

याप्रकरणी पीडित कुटुंबीयांनी न्यायासाठी रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली, यावर आनंदराज आंबेडकर यांनी या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे आश्वाशीत केले, ते म्हणाले की भारत देश हा लोकशाहीप्रधान देश आहे, संविधानिक मूल्यावर हा देश मार्गक्रमण करतोय. देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने समान हक्क व अधिकार दिलेत, स्वतंत्र, समता , बंधुता, न्याय व समानतेची तत्वे संविधानात जोपासली असून सामाजिक सलोखा, व एकोपा टिकवण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची गरज आहे, अशातच जग आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना आजही ग्रामीण भागात वाळीत प्रकरणासह, गाव कमिटी, पंच कमिटी यांचे अन्यायकारक व जुलमी धोरण पीडित कुटुंबियांच्या जीवावर उठत आहे, स्थानिक व जिल्हा प्रशासनाने अशी प्रकरणे गांभीर्याने हाताळावीत, व पीडितांना न्याय द्यावा अन्यथा याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा इशारा आंबेडकर यांनी दिला.

या गंभीर प्रकाराबद्दल आम्ही प्रत्येक्ष गावात जाऊन गाव कमिटीचे म्हणणे जाणून घेतले तर गाव कमिटीच्या वतीने राजेंद्र कोळी यांनी आपले म्हणणे मांडले, आम्ही या कुटुंबाला वाळीत टाकले नाही, स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की आम्ही अनेक वर्षे त्यांना सांभाळून घेतले. आम्ही त्या कुटुंबाला वाळीत टाकले नाही, तर रेशन दुकानाच्या मुद्द्यावर हा बहिष्कार आहे. रेशनिंग दुकानात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यासंदर्भात पेण उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितलं की याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार नवघर कोळीवाडा , ग्रामपंचायत पाटणोली येथील तक्रारदार कुटुंब व गाव कमिटी यांच्या समवेत सोमवारी बैठक लावली जाईल, गावात शांतता, सलोखा व एकोपा नांदावा यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्न करीत असते, या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी आम्ही यापूर्वी दोन वेळा बैठक आयोजित केली होती, आता पुन्हा तक्रारदार व गाव कमिटी यांची एक संयुक्त बैठक लावून सामंजस्याने हे प्रकरण निकाली काढले जाईल, असे सांगितले.

Updated : 12 Nov 2021 2:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top