स्मशानात मृतात्म्यांशी संवाद साधल्याचा मांत्रिकांचा बनाव, पण पोलिसांची जुजबी कारवाई
X
बुलडाणा – अंधश्रद्धा संपवण्यासाठी सरकारतर्फे विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर जादूटोणा विरोधी कायदा करुन अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवरही कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. पण तरीही आज अंधश्रद्धेमुळे अनेक ठिकाणी अघोरी प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे.
वडील आणि भावाच्या आत्म्याच्या शांतीसाठी एका तरुणाने स्मशानभूमीत मांत्रिकाच्य़ा सहाय्याने होमहवन केल्याचा प्रकार घड़ला. तीन मांत्रिकांच्या माध्यमातून हे होम हवन आणि मंत्रोच्चार करत प्रेत जागृती करण्याच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता. हा प्रकार पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. यानंतर नागरिकांनी तक्रार केली आणि पोलिसांनी तीन मांत्रिकासह दिव्यांची आरास लावत आत्मशांती आणि अशी अघोरी प्रक्रिया करून घेणाऱ्या एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. पण त्यांच्यावर फक्त शांतता भंग करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या सर्वांवर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावे अशी मागणी आता अंनिसने केली आहे.
नेमके प्रकरण काय?
मलकापूर शहरातील माता महाकाली परिसरातील रहिवाशी आशिष गोठी या युवकाच्या वडिलांचे आणि भावाचे काही महिन्यापूर्वी निधन झाले. पण त्यांची आत्मशांती झालेली नाही, त्यामुळेच आपल्या घरात शांतता प्रस्थापित होऊ शकत नाहीये, असा गैरसमज आशिष गोठी याने करुन घेतला. त्यानंतर त्याला काही मांत्रिकांनी स्मशानभूमीत पूजाविधी करण्याचा सल्ला दिला. त्यावर उपाययोजना म्हणून आशीष गोठी याने शुक्रवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तीन मांत्रिकांना स्मशानभूमीत बोलावले. या मांत्रिकांनी स्मशानभूमीमध्ये दिव्यांची आरास मांडली व मंत्रोच्चार करून प्रेत जागृतीचा अघोरी प्रकार केला. तब्बल दोन तास मांत्रिकांचे आणि प्रेतांचे संभाषण सुरु असल्याचे भासवण्यात आले.
ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरिकांनी स्मशानभूमी परिसरात एकच गर्दी केली. या अघोरी प्रकाराने संपूर्ण परिसर चांगलाच हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तीन मांत्रिकांसह आशिष गोठी याला ताब्यात घेतले. पण या कारवाईनंतर पोलिसांनी फक्त शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे या अघोरी प्रवृत्तीला आळा बसवण्यासाठी पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे.
अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या आणि अशा अघोरी कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला आळा बसावा यासाठी सरकारने जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला आहे, मात्र अजूनही समाजात मोठ्या प्रमाणात असे कृत्य केल्या जात आहे, आणि पोलिसांकडून अशा प्रकरणात कारवाई होताना दिसत नाहीये...