Home > मॅक्स रिपोर्ट > बाप रे ! आठवी पास युवक कमवतोय महिन्याला अडीच लाखांचा नफा

बाप रे ! आठवी पास युवक कमवतोय महिन्याला अडीच लाखांचा नफा

बाप रे ! आठवी पास युवक कमवतोय महिन्याला अडीच लाखांचा नफा
X

सोलापूर जिल्ह्यातील आठवी पास युवकाने एक अनोखं बिझनेस मॉडेल शोधून काढलं आहे. यातून हा युवक महिन्याला तब्बल अडीच लाख रुपये कमावतो. तुम्हालाही महिन्याला अडीच लाख रुपये कमवायचे असतील तर मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा हा रिपोर्ट नक्की पहा...

आठवी पास युवक आणि महिन्याला अडीच लाखांचा नफा, वाचून धक्का बसला असेल तर थोडं स्वतःला सावरा. ह्या सोलापूरच्या युवकाने व्यवसायाचं अनोखं मॉडेल विकसीत केलंय आणि ते यशस्वीसुध्दा केलंय. हा युवक महिन्याला साडेचार रुपये कमावतो आणि त्यातून दोन लाखांचा खर्च वजा केला तर तब्बल अडीच लाख रुपये महिन्याला निव्वळ नफा राहतो. चला तर पाहुयात या युवकाचं हे अनोखं बिझनेस मॉडेल.

देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने आजचा युवक गोंधळलेल्या स्थितीत असल्याचे दिसतो. पण अशाही कठीण परिस्थितीत युवक रोजगारासाठी धडपडत आहेत. रोजगार कमी आणि त्यासाठी अर्ज करणाऱ्या तरुणाची संख्या मात्र जास्त झाली. आजचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात कमी पगारात काम करताना दिसतो. यासाठी सरकारची ही धोरणे याला जबाबदार असल्याचे सांगितले जाते. शहराबरोबरच गाव खेड्यातील मुलांच्या हाताला ग्रामीण भागात कामे मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील मुले शहराचा रस्ता धरतात. परंतु त्या ठिकाणी त्यांना विविध अडचणीचा सामना देखील करावा लागतो. शहरात घरभाडे,मेस आणि इतर खर्चासाठी सर्व पगार खर्ची पडतो. त्यामुळे अनेक युवकांनी गड्या आपला गावच बरा म्हणत गावची वाट धरली असल्याचे दिसून येते. काही तरुणांनी गावाकडे येवून चांगल्या प्रकारचे उद्योग देखील सुरू केले आहेत. त्यांची भरभराट होताना दिसते. शहरातून आलेल्या अनेक तरुणांनी आपल्या शेतात नवनवीन पिके घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातून ते महिन्याला लाखो रुपयांची कमाई देखील करतात.


शेतीवर सातत्याने येणाऱ्या अस्मानी संकटामुळे शेतकरी सातत्याने अडचणीत येत आहे. हाता - तोंडाला आलेली पिके कधी निसर्गाच्या लहरीपणाचे शिखर होतील हे सांगता येत नाही. अशाही परिस्थितीत अनेक युवक शेतीला जोडधंदा करताना दिसतात. आजची शेती बेभरवशाची झाल्याने ते नाउमेद झाले नाहीत. तरुण सातत्याने प्रयोगशील होवू लागलेत. असाच प्रयोग सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील देगाव येथील युवक ज्ञानेश्वर फराटे याने केला असून त्याने सुमारे 53 गायींचे बंदिस्त गोठा पालन केले आहे. त्यांना दुधाच्या उत्पन्नातून महिण्याकाठी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. केवळ आठवी शाळा झाली असताना त्यांना मिळणाऱ्या उत्पन्नामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या या अनोख्या प्रयोगाची अनेकांनी दखल घेतली असून त्याच्या या बंदिस्त गाय पालन गोठ्याला अनेकजण भेटी देवू लागले आहेत.

एका गायीवर बंदिस्त गाय पालनाची केली सुरुवात

गाय पालन करण्याच्या आधी ज्ञानेश्वर फराटे यांनी अनेक ठिकाणच्या बंदिस्त गाय पालन गोठ्याना भेटी दिल्या. त्यामध्ये सातारा जिल्हा आणि सांगोला तालुक्यातील गाय पालन गोठ्याचा समावेश होतो. या गाय पालनाची वेगवेगळी माहिती घेतल्यानंतर त्यांनी सुरुवातीला एक गाय विकत घेवून बंदिस्त गाय पालनाला सुरुवात केली. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी पुन्हा चार गाई विकत घेतल्या. त्यापासून अनेक वासरे जन्माला आली तेथून खरे गाय पालन व्यवसायाला सुरुवात झाली. त्यांच्या गोठ्यात ' एचफ ' जर्शी गायीची संख्या जास्त प्रमाणात असून सुरुवातीला कमी बजेट मध्ये शेडची उभारणी केली. परंतु गाईंची संख्या वाढू लागल्याने शेडचे बजट देखील वाढत गेले. आता उभ्या असलेल्या शेडसाठी गेल्या चार वर्षापूर्वी सुमारे सात लाख रुपये खर्च आला होता. यासाठी साडे पाच ते सहा टन स्टील लागले होते. पण या शेडचे नियोजन जेणेकरून दहा वर्षे चालवे,असे चार वर्षापूर्वी नियोजन त्यांनी केले होते. आता कुठे त्याचा त्यांना फायदा झाला आहे.

एका गाई पासून सुरू झालेला प्रवास 53 गाईवर येवून ठेपला

ज्ञानेश्वर फराटे यांनी 2009 साली पहिली गाय विकत आणली आणि तेथून गाय पालनाची गोडी वाढत गेली. हळूहळू त्यातून पैसे मिळत गेले. त्यातून गाईंची संख्या ही वाढत गेली. त्यांच्या गोठ्यात आता मोठ्या 35 गाई असून लहान वासरे जवळपास 15 आहेत. त्यांच्या गोठ्यात म्हैशी देखील असून त्याचबरोबर खिल्लार गाय, शेळ्या ही आहेत.

जनावरांच्या देखभालीची सुरुवात होते सकाळी

एवढ्या जनावरांसाठी चारा तोडून घालणे शक्य होत नाही. यामध्ये आमच्या जनावरांची संख्या देखील जास्त आहे. यासाठी आम्ही मुरघास बनवलेला असून तो वनटाईम बनवून ठेवलेला आहे. जनावरांना जवळपास वर्षाला 150 टनाच्या आसपास मुरघास लागतो. पावसाळ्याच्या आधी साठ ते सत्तर टन आणि पावसाळा संपल्यानंतर साठ ते सत्तर टन मुरघास लागतो. जनावरांना दिवसातून दोन वेळेस चारा टाकला जातो. एका वेळेस जनावरांना सात ते आठ किलो मूरघास टाकला जातो. त्याचबरोबर हिरवी वैरण देखील जनावरांना टाकिली जाते. या मध्ये ऊस, मका म्हणजे हिरवी वैरण मिळेल तशी टाकतो. जनावरांना दोन वेळेस वैरण टाकली जात असून त्यासाठी तिसरा किंवा चौथा टाईम असे काही नाही. यामध्ये पेंड देखील जनावरांना ठेवली जाते. या जर्शी गाईना दोन टाईम वैरण ठेवण्याचा नियमच आहे. याठिकाणी मुक्त गोठा असल्याने जनावरांना सातत्याने पाणी मिळते. या गाईसाठी मकवान आणि मूरघास टणावर विकत घेतो. पण हिरवा चारा सहा एकरात लावण्यात आला आहे. यामध्ये नेपियर, सुपियार, ऊस, कडवळ, मकवान यांचा समावेश होतो, असे फराटे यांनी सांगितले.

गाईंच्या आरोग्याच्या काळजी कशी घेतली जाते?

जनावरांचे आरोग्य चागले राहावे यासाठी पशू खाद्याचा देखील उपयोग करण्यात येतो. ज्या गाईला जेवढे प्रोटीन पाहिजे तेवढे तिला दिले गेले पाहिजे. त्यामुळे पुढे जावून जनावरांना आजार होत नाहीत. आमच्याकडे लंपी रोग आलेला नाही. परंतु जनावरांना अगोदरच लस दिली गेली होती. आता लंपी रोगाचा प्रादुर्भाव कमी झाल्या असल्याचे दिसून येतो. या जनावरांना वर्षातून दोनदा लस दिली जाते. सरकारी दवाखान्यात लसी उपलब्ध होत नसल्यास खासगी मेडिकल मधून डोस आणून जनावरांना दिले जातात. सुरुवातीला जनावरांना डोस देणे गरजेचे असून रोग झाल्यानंतर डोस देवून काही उपयोग नाही. डोस सुरुवातीला देणे गरजेचे असून जेणेकरून जनावरांना दगाफटका होवू नये, असे फराटे यांना वाटते.

सकाळी दुध डेअरीला वेळेत घालण्यासाठी जनावरांचे दुध मशिनंने काढले जाते. दुध काढण्यासाठी सकाळी दीड तास आणि संध्याकाळी दीड तास लागतो. यामध्ये दिवसाकाठी दुधासाठी तीन तास जातात. सकाळच्या वेळेस जनावरांना चारा टाकणे त्यांची झाडलोट करणे याची कामे केली जातात. सकाळच्या वेळेस 200 लिटर च्या आसपास दुध निघते तर संध्याकाळी 170 ते 180 लिटरच्या आसपास दुध निघते. पण काही वेळेस गाय आजारी असल्यास दुध कमी - जास्त निघते. नियमीत एचफ जर्शी गाई असतात. त्या सुरुवातीला कमी दुध देतात. त्यानंतर तिची दुध देण्याची क्षमता वाढत जाते. नियमित एचफ दुध देणाऱ्या गाई 35 लिटरच्या पुढे गेल्या आहेत. या गोठ्यात तीस लिटर च्या पुढे दुध देणाऱ्या गाई जास्त असल्याचे ही फराटे सांगतात. यांच्या गोठ्यात तयार होणाऱ्या कालवडीचे दुध वीस लिटर च्या पुढे चालते. त्याची निगा पण तशीच राखली जाते. दुसऱ्या येता पासून तीच गाय तीस ते पस्तीस लिटर दुध देते. यामध्ये नवीन ब्रिड देखील तयार केले असून आणखीन ते वेलेले नाही ते फक्त कालवडीत आहे. यासाठी दोन वर्षापूर्वी काम हाती घेण्यात आले होते. त्याचे आता फळ मिळत असून आणखीन वर्षभराने त्याचे दूध बघायला मिळेल.

गाईच्या शेणांचा खत म्हणून शेतात केला जातो उपयोग

आता आमच्याकडे शेतीचे क्षेत्र वाढले असून गाईच्या शेणाचा उपयोग शेतात खत म्हणून केला जातो. त्या शेणाच्या खतामुळे शेतातून चांगल्या प्रकारे उत्पन्न निघते. शेणखत वापरल्याने शेतात रासायनिक खत कमी लागते. रासायनिक खतांमुळे शेती सुद्धा दमून गेली आहे. त्यासाठी शेतीला शेणखताची आवश्यकता आहे. वर्षभरात टप्याटप्याने भरपूर प्रमाणत शेतात शेणखत टाकले जाते.

दुधाचे दहा दिवसाला मिळतात दीड लाख रुपये

आता दुधाचे दर वाढले असून दहा दिवसाला एक लाख चाळीस हजाराच्या आसपास दुधाचे बिल निघते. महिण्याकाठी चार ते साडे चार लाखाचे बिल निघते. त्यातून दोन लाखांच्या आसपास जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि आरोग्यासाठी खर्च होतात. शेतकऱ्यांनी गाई पालनाकडे व्यवसाय म्हणून पहावे. शेतीपिके शेतात केल्यास ती निघण्यास वेळ लागतो. पीक मार्केटला जावून ही पैसे वेळेवर मिळत नाहीत. कधी पिकाला भाव मिळतो तर कधी नाही. दुधाचे दर ही कमी जास्त होतात. पण पैसे दहा दिवसाला मिळणारच आहेत. त्यामुळे पैसे फिरवता येतात. या व्यवसायात तरुण मुलाने यावे. सर्व तरुणांना नोकऱ्या मिळणे तर अवघड आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे तरुणांनी वळावे, असे फराटे यांना वाटते.

Updated : 2 Dec 2022 6:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top