Home > मॅक्स रिपोर्ट > नयनतारा यांचे विचार जोपासायला हवेत : अरुणा ढेरे

नयनतारा यांचे विचार जोपासायला हवेत : अरुणा ढेरे

नयनतारा यांचे विचार जोपासायला हवेत : अरुणा ढेरे
X

92 व्या साहित्य संमेलनात अरुणा ढेरे यांच्या भाषणाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले होते. त्यांनी यावेळी नयनतारा यांचे विचार आपण जोपासले पाहिजे. तसेच कुठल्याही झुंडशाहीला झुकु नये अस म्हणतं कुणीही येईल आणि साहित्यास वेठीस धरेल हे चालणार अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे... अरुणा ढेर यांच्या भाषणातील काही महत्त्वपूर्ण मुद्दे....

- साहित्य हा एक उत्सव असतो खरा, पण अनेक कारणांनी आपण त्या आनंदोत्सवाचं स्वरुप गढूळ होऊ दिलं. आपलं दुर्लक्ष, आपला भाबडेपणा, आपली मर्यादित समज, आपलं लहानसहान मोहांना आणि वाङ्मयीन राजकारणाला सहज बळी पडणं, यासह अनेक कारणांनी हा उत्सव आपण भ्रष्ट होऊ दिला.

- साहित्य ही आपल्यासाठी एक ठेव आहे आणि आज कधी नव्हे ती ही ठेव तिच्या प्रेरक शक्तींसकट सांभाळण्याची जोखीम तुमच्यामाझ्यावर आली आहे.

- कोणीही यावं आणि वाङ्मयबाह्य कारणांसाठी किंवा वाङ्ंमयीन राजकारणासाठी हे संमेलन वेठीला धरावं असं आता आपण होऊ देता कामा नये. भल्या वाचकांनी, निर्मळ साहित्यप्रेमींनी आणि वृत्तिगांभीर्यानं लेखन करणाऱ्यांनी संमेलनाच्या या स्वरुपाबद्दल चिंता व्यक्त केली. काहींनी या अमंगळ वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि संमेलनाचं स्वरुप नकोशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींनी विकृत होत राहिलं. संमेलनाला वेठीला धरणाऱ्या, संमेलनाला भ्रष्ट करणाऱ्या आणि साहित्याचं मूल्य शून्यवत करणाऱ्या अनेक बाबींचे आपण बळी ठरलो.

- संमेलनांमधला गेल्या काही वर्षांचा एक सुंदर प्रघात म्हणजे इतर भाषांमध्ये कसदार लेखन करणाऱ्या एखाद्या साहित्यकाराला संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करणं. नयनतारा सहगल यांना याच कारणानं आपण आमंत्रित केलं होतं. अखिल भारतीय मराठी माणसांच्या वतीनं त्यांना आमंत्रण दिलं होतं. पण अत्यंत अनुचित पद्धतीनं आपण त्यांना पाठवलेलं आमंत्रणच रद्द केलं. ही अतिशय नामुष्कीची आणि निषेध करण्याची गोष्ट आहे यात शंका नाही. ही गोष्ट त्यांच्यासाठी अपमानजनक आणि आपल्यासाठी लाजीरवाणीच आहे. संयोजकांकडून ही गंभीर चूक घडली आहे यात शंकाच नाही. संमेलन हे सध्याच्या परिस्थितीत, सतत साहित्यबाह्य शक्तींच्या ताब्यात जाण्याचा धोका स्पष्ट असताना ती जोखीम पुरेशा समजशक्तीनं उचलली गेलीच पाहिजे, ही काळाची गरज संयोजकांना ओळखता आली नाही. झुंडशाहीच्या बळावर कोणी जर आपल्याला भयभीत करत असेल, तर आपण केवळ नमतं घेऊन टीकेचे धनी होण्याचा मार्ग स्वीकारणार का? पण तसं घडल्यामुळे केवळ संयोजन समितीच नव्हे, तर सगळ्या मराठी साहित्यप्रेमींच्याच माना खाली जाताहेत याची गंभीर जाणीव आपल्याला असायला हवी. साहित्याशी किंवा भाषेच्या जाणत्या प्रेमाशी ज्यांचा सुतराम संबंध नाही अशा कोणा समूहानं दिलेल्या धमक्यांपुढे वाकणं ही शोभनीय गोष्ट नव्हे.

Updated : 11 Jan 2019 7:46 PM IST
Next Story
Share it
Top