Home > मॅक्स रिपोर्ट > 16 वर्षांच्या जटातून ‘ती’ ची मुक्तता

16 वर्षांच्या जटातून ‘ती’ ची मुक्तता

16 वर्षांच्या जटातून ‘ती’ ची मुक्तता
X

अजूनही अंधश्रद्धेच्या बंधनाखाली समाज अडकल्याचे चित्र आपल्याला वारंवार दिसून येते. कधी भोंदूबाबाच्या विळख्यात सापडलेला समाज तर कधी देवीचा कोप होईल या भितीतून डोक्यावरील जटाचे ओझं वागवणारी लोकं आपल्यासमोर असतात. या बंधनात अडकलेल्या समाजात बदल घडवण्याचे आपण कधी धाडस करत नाही किंवा वाच्यताही करत नाही. मात्र अंनिसच्या नंदिनी जाधव सातत्याने समाजात बदल घडविण्याचे कार्य करत आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम त्या करत आहेत. नुकतेच त्यांनी मालाड येथे 30 वर्षीय मुलीची 16 वर्षांपासूनच्या जटातून मुक्तता केली आहे. 24 जानेवारीला (गुरुवार) त्यांनी ती ची 6 फूट जटातून मुक्तता केली आहे.

सोळा वर्षांपूर्वी नववीत असताना जट आलेली ही मुलगी समाजाच्या भितीने ही जट वागवत समाजापासून अलिप्त आयुष्य जगत होती. शिकण्या खेळण्याच्या वयात शाळा सोडून घरी बसली होती. तब्बल सोळा वर्ष सामाजिक विजनवासात होती. अंनिसच्या नंदिनी जाधव यांनी केलेल्या जटामुक्तीच्या कार्याची माहिती या मुलीच्या शाळेतील शिक्षकांना कळली. त्यांनी नंदिनीताईंना संपर्क केला आणि शिक्षक व संस्थाचालकांच्या मदतीने मुलीची आणि पालकांची जटमुक्तीसाठी मानसिक तयारी करुन घेतली. नंदिनी जाधव यांनी या सोळा वर्षांच्या सहा फूट जटेपासून या मुलीला मुक्त केलं आणि तिला एक नवीन ओळख मिळवून दिली.

जटमुक्तीनंतर मुलीची प्रतिक्रिया

जट काढल्यावर हलकं हलकं वाटतंय. सोळा वर्ष सोसलेल्या ओझ्यातून मोकळं झाल्याची भावना त्या मुलीने व्यक्त केली होती. जटमुक्त झाल्यावर त्या मुलीच्या चेह-यावरचा आनंद हा खरचं सुंदर जगाचं स्वप्न पाहणा-या सगळ्यांनाच हवाहवासा वाटणारा होता.

दरम्यान नंदिनी जाधव यांनी अंनिसच्या माध्यमातून आतापर्यंत १०१ जणींना जटमुक्त केलं आहे. आजच्या प्रगत जगात, समानतेच्या संविधानिक युगात अजूनही अशा प्रकारचं काम करायला लागतय हीच खरी व्यथित करणारी बाब आहे. अंधश्रध्दा आणि परंपरा, सामाजिक बंधनांखाली असणारा समाज बदलण्याचं काम सातत्याने जाणीवपूर्वक करण्याची गरज असल्याचे यावरुन लक्षात येते.

Updated : 25 Jan 2019 12:16 PM IST
Next Story
Share it
Top