Home > मॅक्स रिपोर्ट > छिन्न-विच्छिन्न मृतदेहाशेजारी लिंबू,तांब्या आणि फुले ; नरबळीचा संशय

छिन्न-विच्छिन्न मृतदेहाशेजारी लिंबू,तांब्या आणि फुले ; नरबळीचा संशय

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा करणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा नरबळीची घटना घडल्याचे समोर आले आहे. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील रहिवासी पांडुरंग लक्ष्मण तोटेवाड या तरुणाचा मृतदेह तेलंगाणा सीमेवरील वाशीच्या जंगलात छिन्न विच्छिन्न अवस्थेत आढळून आला आहे, प्रतिनिधी कुलदिप नंदूरकर यांचा रिपोर्ट...

छिन्न-विच्छिन्न मृतदेहाशेजारी लिंबू,तांब्या आणि फुले ; नरबळीचा संशय
X

या तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी एका महिलेसह तीन पुरुष अशा चार आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.




दरम्यान छिन्न-विच्छिन्न मृतदेहाशेजारी लिंबू,तांब्या आणि फुले आढळून आल्याने ही घटना नरबळीचा प्रकार असल्याचा संशय मयत पांडुरंग याचा भाऊ संतोष याने व्यक्त केला आहे. राज्यात गुप्त धनासाठी वा अन्य कारणासाठी अंधश्रद्धेतून नरबळी दिले जातात, पुरोगामी महाराष्ट्रात आजही या प्रकारच्या घटना घडत आहेत. त्यात हिमायतनगर या भाग नांदेड आणि तेलंगाणाच्या सीमेवरील तालुका आहे ,या भागात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आढळून येतात .

महाराष्ट्रात अशा प्रकारच्या अंधश्रद्धेच्या घटना घडू नयेत यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी आपली हयात घालविली. त्यानंतर राज्यात जादूटोणा विरोधी, अघोरी कृत्ये प्रतिबंधक कायद्याची निर्मिती झाली,परंतु नरबळीसारख्या दुर्दैवी घटनेत पोलिसांकडून जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अमंलबजावणी फारसी होत नाही, त्यासाठी या कायद्याचा प्रभावी वापर करणे गरजेचे असल्याचे मत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉ.बालाजी कोंपलवार यांनी आमच्याशी बोलताना सांगितले आहे.





सदरील मयत तरुणाचा छिन्नविच्छिन्न विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा व्हिडिओ कुणी केला याबाबत ही पोलीस तपास करीत आहेत. सदरील प्रकरण अपघात असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी मयत तरुण पांडुरंग यास काहीतरी आमिष दाखवून ,बोलावून नेले, वाशीच्या जंगलात बोलवून इतर साथीदाराच्या मदतीने दगडाने ठेचून खून केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मयत तरुणाच्या भावाने नरबळीची शंका व्यक्त केलीय त्यामुळे या प्रकरणी प्रभावीपणे या नरबळीचा छडा लावावा, पुढेही अशा प्रकारच्या मानिसकतेतून अघोरी कृत्ये घडू नयेत यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा , असे मत अंनिसचे प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केले आहे.





याप्रकरणी बालाजी तोटेवाड यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी परमेश्वर लक्ष्मण अक्कलवाड , लक्ष्मण अक्कलवाड, रमेश लक्ष्मण अक्कलवाड, लक्ष्मीबाई लक्ष्मण अक्कलवाड यांनी संगनमत करून खून केल्याप्रकरणी हिमायतनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Updated : 11 Sept 2022 5:43 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top