Home > मॅक्स रिपोर्ट > मुजफ्फरनगर शिक्षिकेकडून मुस्लिम मुलाला मारहाण प्रकरण दावे-प्रतिदाव्यांनी गाजले

मुजफ्फरनगर शिक्षिकेकडून मुस्लिम मुलाला मारहाण प्रकरण दावे-प्रतिदाव्यांनी गाजले

मुजफ्फरनगरमध्ये शिक्षिकेकडून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केलेले प्रकरण दिवसभर गाजले. या प्रकरणी अनेक दावे-प्रतिदावे समोर आले आहेत. पण नेमकं हे प्रकरण काय घडलं? त्यावरून करण्यात आलेले दावे आणि प्रतिदावे काय आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...

मुजफ्फरनगर शिक्षिकेकडून मुस्लिम मुलाला मारहाण प्रकरण दावे-प्रतिदाव्यांनी गाजले
X

मुजफ्फरनगरमध्ये शिक्षिकेकडून मुस्लिम मुलाला इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केलेले प्रकरण दिवसभर गाजले. या प्रकरणी अनेक दावे-प्रतिदावे समोर आले आहेत. पण नेमकं हे प्रकरण काय घडलं? त्यावरून करण्यात आलेले दावे आणि प्रतिदावे काय आहेत? जाणून घेण्यासाठी वाचा भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट...

मुजफ्फरनगरमधील खुब्बापूर येथील नेहा पब्लिक स्कूलमध्ये एका मुस्लिम विद्यार्थ्याला शिक्षिकेने इतर विद्यार्थ्यांकडून मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संतापजनक प्रकारावर देशभरातून प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. अनेक दावे आणि प्रतिदावे करण्यात आले आहेत.

राहुल गांधी यांनी मुजफ्फरनगरमधील मुस्लिम मुलाला शिक्षिकेच्या आदेशाने मारहाण सुरू असल्याच्या व्हिडीओवर ट्वीट करून प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये राहूल गांधी यांनी म्हटले आहे की, लहान मुलांच्या मनात भेदभावाचं विष पेरलं जात आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी द्वेषाचा बाजार बनवणं. हे एका शिक्षिकेसाठी यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही.

हे भाजपने फेकलेलं केरोसिन आहे. ज्यामुळे भारताच्या कानाकोपऱ्यात आग लावून ठेवली आहे. लहान मुलं ही भारताचं भविष्य आहे. त्यामुळे द्वेष नाही तर प्रेम शिकवायला हवं, असं मत व्यक्त केले आहे.

प्रियंका गांधी यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, आम्ही येणाऱ्या पिढ्यांना कशा प्रकारे क्लासरूम देणार आहोत? कसा समाज देणार आहोत? जिथं चंद्रावर जाण्याचं तंत्रज्ञान तयार होत आहे. तिथंच द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. फरक स्पष्ट आहे की, द्वेष ही विकासाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. त्यामुळे आम्हाला एकजूट होऊन या द्वेषाच्या विरोधात लढावं लागेल. देशासाठी, विकासासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी....

समाजवादी पक्षाने ट्वीट करून म्हटले आहे की, भाजप आणि आरएसएसचं द्वेषाचं राजकारण देशाला इथपर्यंत घेऊन आलं आहे. मुजफ्फरनगरमध्ये एक शिक्षिका अल्पसंख्यंक मुलाला इतर मुलांना मारायला सांगत आहे. मासूम मुलांच्या मनात विष पेरणाऱ्या शिक्षिकेला तातडीने हाकललं पाहिजे, तसेच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावर मुजफ्फरनगर पोलिसांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, मंसुरपूर पोलिसांना सोशल मीडियाच्या माध्यमातून एक व्हिडीओ मिळाला. त्यात एका महिला शिक्षिकेकडून पाढे न आठवल्याने इतर विद्यार्थ्यांना चापट मारायला सांगितल्या आहेत. तसेच व्हिडीओ काही आपत्तीजनक वक्तव्यसुद्धा केले जात आहे. या वक्तव्यासंदर्भात तपास केला गेला. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेशी बातचीत केली. त्यानुसार म्हटले आहे की, मुस्लिम मुलांची आई त्यांच्या अभ्यासावर लक्ष देत नाही. त्यामुळे त्या मुलांच्या शिक्षणाचा नाश होतो. त्यामुळे यासंदर्भात संबंधित शिक्षिकेच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.

यानंतर मॅक्स महाराष्ट्रने पिडीत कुटूंबाकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पिडीत मुलाने सांगितले की, मला पाढा आठवला नाही. या चुकीमुळे मॅडमने वर्गातील इतर विद्यार्थ्यांना माझ्या कानाखाली मारायला सांगितली. त्यावेळी मॅडम म्हणाल्या की, हा मुस्लिम आहे. त्यामुळे याला जोरात मारा. जवळपास एक तासभर मुलं माझ्या कानाखाली मारत होते, अशी प्रतिक्रीया पिडीत मुलाने दिली.

त्यानंतर मॅक्स महाराष्ट्रने मुलाचे वडील ईर्शाद यांची प्रतिक्रीया जाणून घेतली. त्यावेळी ईर्शाद म्हणाले की, मॅडमने मुलांमध्ये आपापसात वाद घडवून आणला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी तक्रार केल्यानंतर मुलाला शाळेतून काढून टाकण्यात आलं. मात्र शेवटी तुम्ही तक्रार मागे घेत असाल तर आम्ही तुमच्या मुलाला शाळेत परत घेऊ, असा समझोता करण्यात आल्याचे पिडीत मुलाच्या वडिलांनी सांगितले.

मुजफ्फरनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरूवातीला मुलाचे वडील तक्रार देण्यास तयार नव्हते. मात्र सकाळी त्यांनी तक्रार दिली. त्यानंतर बालकल्याण समितीच्या माध्यमातून मुलाचे आणि त्याच्या आई वडिलांचे समूपदेशन करण्यात आले. तसेच जी तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. याबरोबरच शांतता कायम ठेवण्यासाठी मुजफ्फरनगरमधील नागरिकांनी सहकार्य करावे. या प्रकरणात शिक्षिकेवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रीया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

त्यामुळे या प्रकरणी समोर आलेले दावे आणि प्रतिदावे यातून प्रशासन काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

Updated : 26 Aug 2023 8:29 PM IST
Next Story
Share it
Top