#MumbaiBridgeCollapse : कुणीच राजीनामा देऊ नका
X
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जोडणाऱा पूल आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. यात तीन जणांचा मृत्यु झाला तर ३४ जण जखमी झाले आहेत. आता मुद्दा हा आहे की, या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, झालं असेल तर त्या ऑडिटकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं. ज्या पद्धतीनं हा पूल कोसळला तो पाहता या पूलाची देखभाल दुरूस्ती व्यवस्थित होत नसल्याचंही स्पष्ट आहे.
सीएसएमटी स्टेशन परिसरात कायम वर्दळ असते. या परिसरातील पादचारी पुलांचं जीवनमान हे अतिभारामुळं कमी होतं. मुदतीआधीच अतिभारामुळं या पूलांचं जीवनमान संपतं. सततच्या वर्दळीमुळं या पूलांचं स्ट्रक्चरल ऑडिट सातत्यानं होण्याची गरज असते. २६ डिसेंबर २०१७ मध्ये परळ-एलफिन्सटन या रेल्वे स्टेशनवरील पूलावर झालेल्या चेंगराचेंगरीतही २३ प्रवाशांचा मृत्यु तर ४० प्रवाशी जखमी झाले होते. त्यावेळीही सरकारकडून जबाबदारीनं पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळं यावेळीही कुणी राजीनामा देईल, याची शक्यता कमीच आहे. याउलट या दुर्घटनेवर राजकारणच होण्याची शक्यता अधिक आहे. कदाचित या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात ज्यांच्या कार्यकाळात पूल बांधण्यात आला त्यांनाही दोषी ठरवण्यात येईल. यापुढे जाऊन कदाचित हा दोषारोप पंडित नेहरूपर्यंतही पोहचवला जाऊ शकतो. या दुर्घटनेवरच राजकारण खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतं. हे गृहीत धरूनच एक मुंबईकर म्हणून प्रश्न विचारावा वाटतो की, तुमचं राजकारण गेलं चुलीत पण मुंबईच्या या निष्पाप लोकांसाठी कुठल्या राजकीय पक्षाकडे काही प्लॅन आहे का, मुंबईकरांचं जीवन सुसह्य करण्यासाठी राजकीय पक्षांनी काय विचार केला आहे.
मुंबईच्या या छोट्याशा भूभागावर सव्वा दोन कोटी लोकं किड्या-मुंग्यांसारखी राहतात. या सव्वा दोन कोटी लोकांसाठी सर्व पक्षांनी दिलासा देणारा प्लॅन केलाय का ? हीच किड्या-मुंग्यांसारखी जगणारी माणसं असंतोषानं एका क्षणी पेटून उठतील त्यांच्या असंतोषाला मग कुणीच आवरू शकणार नाही. उद्याच्या संघर्षाची सुरूवात अशाच एका ठिणगीतून पडण्याची शक्यता आहे...
रवींद्र आंबेकर
संपादक, मॅक्स महाराष्ट्र