मुंबई गोवा महामार्गावरचा कोलाड पुईचा पूल धोकादायक
महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.मात्र ठिकठिकाणी आजही काही जुन्या पुलांवर धोक्याची घंटा वाजतेय. असाच एक जुना व खालून वरून पोखरलेला नदी पूल मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग एन एच 66 वर असल्याचे दिसून येतोय. कोलाड पुई गावानजीक असलेला महिसदरा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत जीवघेणा व धोकादायक बनलाय. हा पूल कोसळला तर मुंबई गोवा महामार्ग वाहतूक पूर्णपणे ठप्प होणार आहे, प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट....
X
मुंबई गोवा महामार्गाच्या पनवेल ते इंदापूर या 84 किमी च्या पहिल्या टप्प्याचे काम तब्बल 13 वर्षांपासून रेंगाळले आहे.अशातच या मार्गावरील पुलांची काम देखील रखडली आहेत. महामार्गावरील कामे नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया पनवेल यांच्या माध्यमातून होत आहेत. महाड सावित्री पूल दुर्घटनेनंतर राज्यातील मुख्य महामार्ग व अंतर्गत मार्गावरील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. राज्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले. नवे पूल उभारणीसह पुलांचे मजबुतीकरण करण्यासंदर्भात पाऊले उचलली गेली.
पुई गावालगतच्या या पुलावरून दिवसरात्र प्रवाशी वाहतुकीसह अत्यंत अवजड, ओव्हरलोड वाहतुक होतेय. अरुंद पूल असल्याने वाहतुकीला देखील वारंवार अडथळा येतो. पुलावर अपघाती घटना देखील घडतात. या पुलावरून वाहने जाताना जबर हादरे बसतात. पुलावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत तर पुलाची खालील बाजू खचलेली, पुलाला ठिकठिकाणी तडे गेलेत, सळ्या बाहेर निघालेल्या अवस्थेत आहेत, मुख्य खांब काही घटकेचे सारथी असल्याचे चित्र पहावयास मिळतेय. साधारणतः दहा वर्षांपूर्वी याच पुलाच्या बाजूला नवीन पुलाचे काम सुरू करण्यात आले होते.
मात्र ते काम अद्याप रखडले आहे. या पुलाची धोकादायक स्थिती असताना आजघडीला केवळ मलमपट्टी चे काम केले जातेय, या पुलावरून प्रवास करताना जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. सदर जुना व जर्जर झालेला पूल केव्हाही कोसळून मोठी जीवघेणी दुर्घटना घडू शकते अशी भीती स्थानिक रहिवाशी व प्रवाशी वाहनचालक व्यक्त करीत आहेत. संबंधित प्रशासन व सरकारने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी उपाययोजना करावी, नवीन पुलाचे मजबूत व दर्जेदार बांधकाम करून प्रवाशी व वाहनचालक यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.