Ground Report : Mumbai-Goa हायवे गेला खड्ड्यात...
रस्त्यावरचे खड्डे मोजण्यासाठी मोजणीची टेप अपूर्ण पडू शकते का, एखादी मोठी बसच अडकावी एवढा मोठा खड्डा रस्त्यावर असू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा रिपोर्ट नक्की पाहा....
X
रायगड : टॅक्स भरुन चांगले रस्ते मिळणार नसतील तर टॅक्स का भरायचा...असा सवाल एका सामान्य वाहनचालकाने विचारला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम 13 वर्षापासून रेंगाळत सुरु असल्याने मार्गाच्या दूरवस्थेने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
या महामार्गावर मोजपट्टीने मोजता येत नाहीत एवढे मोठे जीवघेणे खड्डे आहेत. तसेच चिखलामुळे वाहनचालकांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. जागो जागी तळी साचली आहेत रस्त्यावर खड्डे आहेत की तलाव असा प्रश्न पडावा असे दृश्य आहे. गर्भवती महिला, रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचत नसल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गापेक्षा डोंगर दरी खोऱ्यातील पायवाट बरी आहे असा संताप प्रवाशांनी व्यक्त केला आहे. सरकारला अजुन किती निष्पाप जीवांच्या मृत्युची प्रतीक्षा आहे, असा सवाल जनतेतून विचारला जातो आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एक तपाहून अधिक काळ सुरू आहे. खड्डेमय मार्ग, दिशादर्शक सूचना फलकांचा अभाव, या मार्गावर पावसात खड्डे आणि उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य देखील पसरल्याने चालक हैराण होत असतात. गणेशोत्सवादरम्यान मुंबई - गोवा महामार्गावरील खड्डे भरण्याचे आदेश दिल्यामुळे तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली खरी मात्र पुन्हा रस्त्याची स्थिती ' जैसे थे ' झाली आहे.
यासंदर्भात रस्त्याचे कम करणाऱ्या सुप्रिमो इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंता मधुकर आडे यांनी सांगितले की, "मुंबई - गोवा महामार्गावर पावसामुळे पडलेले खड्डे तात्काळ भरण्यात येत आहेत. गणेशोत्सवात खड्डे भरण्याचे काम सुरू केले होते आणि अद्यापही कामे सुरू आहेत. पण पावसामुळे खड्डे भरण्यात अडचणी येत आहेत. तरी मोठ्या खड्डयांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम सुरू आहे. महामार्गावरील आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे पाऊस थांबताच डांबरीकरण करण्यात येईल"