Home > मॅक्स रिपोर्ट > मोखाड्यात दहा दिवसांत दोन कुपोषीत बालकांचा मृत्यू ;वास्तव लपवण्यासाठी प्रशासनाची वजनात हेराफेरी

मोखाड्यात दहा दिवसांत दोन कुपोषीत बालकांचा मृत्यू ;वास्तव लपवण्यासाठी प्रशासनाची वजनात हेराफेरी

मोखाड्यात दहा दिवसांत दोन कुपोषीत बालकांचा मृत्यू ;वास्तव लपवण्यासाठी प्रशासनाची वजनात हेराफेरी
X

जिल्ह्यातील आणि मोखाडा तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या अतिदुर्गम सावर्डे गावात दोन कुपोषीत बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुर्गा निंबारे आणि रेणुका मुकणे या दोन बालकांचा दहा दिवसांत मृत्यू झाला आहे. सदरची बालके कुपोषीत नसल्याचे दाखवण्यासाठी, अंगणवाडी सेविकेने मृत बालकांच्या वजनात हेराफेरी करत जादा वजनाची नोंद करून कुपोषीत नसल्याचे दाखवले आहे.

या प्रकारामुळे संतप्त ग्रामपंचायत उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी या घटनेची सखोल चौकशी करून घटनेस जबाबदार असणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे मोखाड्यात कुपोषीत बालकांच्या मृत्यू चा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

मोखाड्यातील अतिदुर्गम सावर्डे गावातील अंगणवाडीतील दुर्गा कल्पेश निंबारे ( 11 महिने ) ही मुलगी सतत आजारी असायची. त्यामुळे तीच्या पालकांनी तीला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात डिसेंबर महिन्यात ऊपचारासाठी दाखल केले होते. तेथील उपचारानंतर अधिकच्या ऊपचारासाठी जव्हार च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. ऊपचारादरम्यान दुर्गाचा रूग्णालयातच मृत्यू झाला आहे. तर रोजगारासाठी भिवंडी तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या रेणुका मुकणे ( 3 महिने ) या कुपोषीत बालीकेचा मृत्यू झाला आहे. दहा दिवसाच्या अंतरात एकाच सावर्डे येथील अंगणवाडी क्षेत्रातील दोन कुपोषीत बालकांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

जव्हार ऊपजिल्हा रूग्णालयात ऊपचार घेणार्या मृत दुर्गा निंबारे या बालिकेची डिसेंबर महिन्यात अंगणवाडी सेविकेने अंगणवाडीत हजर असल्याची नोंद केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच या बालिकेचे वजन 9 किलो 100 ग्रॅम ची नोंद करून, या बालिकेस कुपोषीत नसल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे. प्रत्यक्षात दुर्गाचे दवाखान्यात केले असता ते 6 किलोच भरल्याचा आरोप तिचे वडील कल्पेश निंबारे व आई सविता निंबारे यांनी केला आहे. तसेच आमचे बाळ कुपोषीत असल्याची कुठलीही माहिती अथवा त्याचा पोषण आहार दिलेला नसल्याची तक्रार पालघर चे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. तर भिवंडी येथे मृत्यू झालेल्या रेणुका मुकणे या बालिकेची कुठलीही अंगणवाडी सेविका नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, जिल्हा परिषद सदस्या कुसुम झोले आणि उपसरपंच हनुमंत पादिर यांनी मृत बालीकांच्या कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच अंगणवाडीत जाऊन हजेरी पुस्तक बघीतले असता, दुर्गा निंबारे दवाखान्यात दाखल असताना तीची हजेरी पटाला नोंद केल्याची धक्कादायक माहिती दिसुन आली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सावर्डे ग्रामपंचायती चे उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी या बाबतची लेखी तक्रार पालकमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालविकास अधिकार्यांकडे केली आहे.

या घटनेची माहिती तसेच तक्रार माझ्या कडे आली आहे. सावर्डे येथे प्रत्यक्ष भेट देऊन घटनेची चौकशी करणार आहे. तसेच या घटनेत दोषी असणार्या वर कारवाई निश्चित करण्यात येणार असल्याचे मोखाड्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी, कुलदीप जाधव यांनी सांगितले.

Updated : 14 Jan 2023 5:39 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top