इतर भाषांना स्थान देताना मराठी गायब...
X
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. तसेच हे शिल्प साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली खरी, परंतु मोदींच्या गुजरातमध्ये त्या पुतळ्याजवळ ५ विदेशी भाषा आणि ५ भारतीय भाषांना स्थान देताना मराठीला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. तसेच गुजराती भाषा वगळून इतर भारतीय भाषांमध्ये व्याकरण्याच्या चुका झाल्याचे समोर आलं आहे.
आज लोकार्पण झालेल्या या “स्टॅचू ऑफ युनिटीच्या” खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मोदींना मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराज मोदींसाठी केवळ राजकारणाचं निमित्त असल्याची प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटते आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे असंच म्हणावं लागेल.
विशेष म्हणजे पुतळ्याजवळील या नावाच्या पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ आणि गुजराती भाषेंसह रशियन, फ्रेंच आणि चीनच्या भाषांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. महत्वाकांक्षी राफेल करारानंतर फ्रेंच भाषातर मोदींच्या विशेष आवडीची झाल्यासारखे चित्र आहे आणि त्यामुळे फ्रेंच भाषेला त्यात विशेष स्थान आहे. मात्र, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने समाज माध्यमांवर प्रचंड नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नावात सुद्धा व्याकरण्याच्या चुका झाल्याने समाज माध्यमांवर त्या भाषेवर प्रेम करणारी जनता टीका करताना दिसत आहे.