Max Maharashtra Impact: त्या आदिवासी गावपाड्याच्या रस्त्यासाठी 4 कोटी 45 लाख निधी मंजूर
7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार या मथळ्याखाली मॅक्स महाराष्ट्रने पालघर जिल्ह्यातील गरोदर मातेची रस्त्याअभावी होणारी फरपट चव्हाट्यावर आणली होती. या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागे झाले होते. मॅक्स महाराष्ट्रच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. या गावांसाठी रस्ता मंजूर झाला असून येथील नागरिकांनी मॅक्स महाराष्ट्रचे आभार मानले आहेत.
X
मुंबई (mumbai) पासून 100 किमी अंतरावर व जव्हार पासून अवघ्या 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही मुलभूत सोयीसुविधांपासून कोसो दूर आहेत. या प्रश्नाला मॅक्समहाराष्ट्राने (Max Maharashtra) वाचा फोडून
7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार या मथळ्याखाली 20 सप्टेंबर 2020 रोजी वृत्त प्रसिद्ध करून येथील एका गरोदर मातेला रस्त्याअभावी होणारी जीवघेण्या समस्यांचे भयाण वास्तव चव्हाट्यावर आणले होते या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातून (maharashtra) संताप व्यक्त व करण्यात आला या घटनेनंतर तात्काळ खासदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांनी घटनास्थळी भेट देऊन येथील रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते तसेच खासदारांनी देखील या रस्त्यासाठी मोठे प्रयत्न करून त्याचबरोबर मॅक्समहाराष्ट्राने सातत्याने केलेल्या प्रयत्नामुळे प्रजीमा 21 ते वडपाडा, उंबरपाडा, भाटीपाडा, मनमोहाडी (LR138) हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजने (Village Road Scheme) अंतर्गत मंजूर झाला असून महाराष्ट्र शासनाने या गावपाड्याना जोडणाऱ्या रस्त्यासाठी 24 कोटी 17 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे
स्वातंत्र्याची 75 वर्ष उलटूनही आदिवासी (Adivasi) बहुल असलेल्या जव्हार तालुक्यातील गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्यानं येथील आदिवासींना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्याअभावी अबाल वृद्ध, गरोदर माता, शाळकरी मुले, चाकरमान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी पेशंट झाल्यास लाकडाची डोली करून 7 किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते. परंतु वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक पेशंट दगावले देखील आहेत. हि बाब खेदाने म्हणावी लागेल
तसेच यामधील दखण्याचापाडा वडपाडा, उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतमध्ये येतात. तर मनमोहाडी पाडा ऐना ग्रामपंचायतमध्ये येतात. भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या सर्व पाड्यांची एकूण लोकसंख्या चौदाशे च्या आसपास आहे. येथील 200 मुलं पुढील शिक्षण घेत आहेत. परंतु रस्ता नसल्यानं शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. तसेच मनमोहाडी या पाड्याची 80 घराची लोकवस्ती असून नदी ओलांडून त्यांना ये-जा करावी लागत आहे.
7 किमीचा डोंगर गरोदर माता कशी पार करणार?
यामुळे पावसाळ्यात येथील आदिवासींचा पूर्णपणे संपर्क तुटतो. तसेच यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील आदिवासींसमोर कोणताच पर्याय उपलब्ध नसतो. त्याचबरोबर या पाड्याच्या चारही बाजूने डोंगर असल्याने येथे कोणतेच नेटवर्क नाही. येथील ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अश्या अनेक घटना वारंवार येथे घडत आहेत. परंतु आता येथील आदिवासींची रस्त्या अभावी होणारी परवड थांबणार असून या रस्त्यासाठी 4 कोटी 45 लाखाचा निधी मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत झाप ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच एकनाथ दरोडा यांनी मॅक्समहाराष्ट्रचे आभार मानले आहेत