मरिआईवाले समाजाचा मृत्यू नंतरच्या 'दो गज' जमिनीसाठी संघर्ष, शाळेचं स्मशानभूमीवर अतिक्रमण
तब्बल ५५ वर्षे आमदारपदी राहिलेले शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते गणपत (आबा) देशमुख यांच्या पेनूर या मूळगावी मरीआईवाले समाजाचा दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
X
तब्बल ५५ वर्षे आमदार पदी राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत नेते गणपत (आबा) देशमुख यांच्या मूळगावात स्मशानभूमीचा प्रश्न तापला आहे. गणपत आबा देशमुख यांचं पेनूर हे मूळ गाव. या गावात मरीआईवाले समाजाचा दफनभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या समाजाची या संदर्भात मागणी आहे. त्यांनी या संदर्भात सरकारला न्याय देण्याची मागणी निवेदनाद्वे केली आहे.
विधानसभेवर तब्बल ११ वेळा सांगोला मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेलेले गणपत (आबा) देशमुख यांचा सांगोला मतदारसंघ कर्मभूमी होता. तर पेनूर हे त्याचे मूळगाव होते. त्यांचे बालपण व प्राथमिक शिक्षण पेनूर ता. मोहोळ या गावात झाले. आमदारकीच्या काळात भाई गणपतराव देशमुख यांनी पेनूर गावातील अनेक प्रश्न मार्गी लावले होते. त्यांचे पार्थिव सांगोल्याकडे घेऊन जात असताना काही काळासाठी पेनूर या त्यांच्या मूळ गावात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हे तेच गाव. आता गावात मरीआईवाले समाजाच्या स्मशानभूमीचा मुद्दा तापला आहे.
शाळेच्या कंपाऊंड साठी शाळेने जेसीबीच्या सहाय्याने मरीआईवाले समाजाची दफनभूमी असलेल्या जागेवर अतिक्रमण केले असून योग्य चौकशी करून शाळेने केलेले अतिक्रमण काढून आम्हाला न्याय द्यावा. अशी मागणी मरीआईवाले समाज विकास परिषदेच्या वतीने तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मरीआईवाले समाज विकास परिषदेने निवेदनात काय म्हटले आहे..?
मरीआईवाले समाज विकास परिषदेचे अध्यक्ष दगडू निवृत्ती निंबाळकर यांनी तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी,पेनूर गावात मरीआईवाला समाज हा गावची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून त्या जागेत मृतदेह दफन करत आहे. आजतागायत त्या जागेबाबत कोणाची तक्रार नव्हती.
परंतु दि.१० ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी शाळेने जेसीबीच्या सहाय्याने मरीआईवाले समाजाच्या दफनभूमीवर अतिक्रमण करून दफनभूमी खोदून टाकली आहे. त्यामुळे हाडे वर आली असून दफनभूमीवरील सर्व दगड, माती काढून टाकली आहे. मरीआईवाले समाज दफनभूमी जागेत अतिक्रमण करून मयत व्यक्तींची हाडे बाहेर काढून पोत्यात भरून झाडाला बांधून ठेवली होती. त्याची रीतसर तक्रार मोहोळ पोलीस स्टेशन येथे दिली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मरीआईवाले समाज म्हणजे नक्की कोणता समाज?
महाराष्ट्रातीच्या विविध भोगोलिक भागातील लोकांची बोली भाषा, राहणीमान जसे वेगवेगळे आहे. तशाच प्रकारे मरीआई समाजाची बोली भाषा व पेहराव वेगळा आहे. या समाजातील पुरुष हे मरीआई देवीचे पोतराज व उपासक असून महाराष्ट्राच्या विविध भागात जाऊन भिक्षुकी मागून खातात. या समाजातील महिला व पुरुष गावोगावी मरीआई देवीचा गाडा डोक्यावर घेऊन जातात. त्यावेळी महिला या ढोलकी वाजवतात व पुरुष हातात चाबूक घेऊन स्वतःच्या पाठीवर मारत राहतो. त्यावेळी गावातील महिला येऊन देवीची पूजा करून दान म्हणून धान्य देतात. अशावेळी पुरुष हा घरोघरी जाऊन पैसे व धान्य मागतो.
या समाजातील पुरुष मंडळी पोतराज असून त्याचे केस बांधलेले असतात.
त्याच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावलेले असते. त्याच्या कंबरेवर अनेक साड्या जोडून शिलाई केलेला 'घागरा' असतो. त्याच्या हातात घंटी व कंबरेवर घुंगरू बांधलेले असते. गावोगावी भिक्षुकी मागताना मरीआई समाजातील पोतराजाच्या सोबत त्याची पत्नी असते. पत्नी ढोल वाजवून पतीला मदत करते. एखाद्या गावात गेल्यास मरीआई वाले गावाच्या बाहेर तंब्बू मारून राहतात. हा समाज महाराष्ट्राच्या विविध भागात तब्बल ७ महिने भिक्षुकी मागत फिरतो. काही काळच घरी थांबतो.
शिक्षणाचा अभाव...
मरिआईवाले समाज हा तसा महाराष्ट्रभर आढळतो. मात्र, या समाजात शिक्षणाचे प्रमाण खूप कमी असते. आई वडील भीक मागून गावोगावी फिरत असतात. त्यामुळं मुलांचे हाल तर होतातच. त्याचबरोबर मुलांचं शिक्षण देखील थांबतं. तसंच जी मुलं शिक्षण घेतात. अशा मुलांना कागदपत्रे काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. काही लोकांकडे रेशन कार्ड आहे. परंतु त्यांना धान्य मिळत नसल्याचे सुनील पवार यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
मरीआईवाले समाजातील रामचंद्र कांबळे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, माझे वय ७१ वर्षे असून माझ्याकडे १९५१ सालचा दाखला आहे. त्याच्या आधीपासूनच आम्ही पेनूर गावचे रहिवाशी आहोत. आमच्या वडिलांच्या आधीपासून जवळ-जवळ १०० वर्षाच्या पूर्वीपासून ही दफनभूमी तेथे आहे. त्याठिकाणी तळ्याचा भराव असून भला मोठा बांध आहे. याठिकाणी आम्हाला कोणी रोखू शकले नाही. आमची कित्येक माणसे मेली तरीसुद्धा कोणी अडवले नाही.
आता शाळेने न विचारता, न सूचना देता जेसीबी लावून दफनभूमी सपाट केली आहे. त्यातील जी हाडे निघाली होती. ती एका गाठोड्यात बांधून एका झाडाला बांधून ठेवली. असा अन्याय करत असाल तर आम्ही खपवून घेणार नाही. शासन, प्रशासनाने आम्हाला न्याय जर दिला नाही तर उपोषणाला बसणार आहोत.
ग्रामपंचायतीची जागा आहे म्हणून दफनभूमी ची जागा पोखरली असून तेथे घरे बांधली गेली आहेत. शाळेवाल्यांनी जेसीबी लावून जागा सपाट करून टाकली आहे. दफनभूमी संबधी आम्हाला न्याय देण्यात यावा असे कांबळे यांनी सांगितले.
मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सुनील पवार यांनी सांगितले की, आमचा मरीआईवाला समाज असा आहे की ,७ महिने उदरनिर्वाहासाठी गावोगावी फिरतो. अशा कालावधीत गावातील काही ग्रामस्थांनी दफनभूमीचा बांध पोखरून घरे बांधली आहेत. आता एका शाळेने दफनभूमीवर जेसीबी चालवून पुरलेल्या मृत लोकांची विटंबना केली आहे. आमच्या समाजावर अन्याय झाला असून आम्हाला न्याय देण्यात यावा अन्यथा आम्ही आमरण उपोषणाला बसू असा इशारा पवार यांनी दिला आहे.
दफनभूमीची ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद नाही-सरपंच सुजित आवारे
मरीआईवाले समाज्याच्या दफनभूमीच्या जागेची ग्रामपंचायत दप्तरी नोंद नाही. दफनभूमी संबंधी ग्रामपंचायतीला अद्यापही कोणतीही तक्रार प्राप्त झाली नाही. असे पेनूर गावचे सरपंच सुजित आवारे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.
या संदर्भात संबंधित तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याशी आम्ही चर्चा केली. ते म्हणाले शाळा प्रशासनाने मरीआईवाले समाजाच्या प्रतिनिधीशी चर्चा करूनच कंपाउंडचे काम करण्याचे आदेश दिले आहे.
पेनूर येथील शाळेने कंपाऊंडचे काम करण्यापूर्वी मरीआई समाजाच्या प्रतिनिधींशी चर्चा करून ते म्हणतील त्याप्रमाणे दफनभूमीची जागा सोडावी. असे निर्देश शाळेला दिले असल्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे-पाटील यांनी सांगितले.