Ground Report : उर्दू शाळांकडे दुर्लक्ष, शिक्षकच येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान
काळाच्या ओघात मागे पडलेल्या मुस्लिम समाजातील विद्यार्थी शिकले तर समाजाची प्रगती होईल असे म्हटले जाते. पण उर्दू माध्यमाच्या शाळांबाबत सरकारी पातळीवर कसे दुर्लक्ष होते आहे याचे वास्तव मांडणारा धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट...
X
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याची धक्कादायक व संतापजनक माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शिकायचं आहे, मोठं व्हायचंय पण शिकवायला शिक्षक नसल्याने विद्यार्थी अडचणीत सापडलेत. महाड तालुक्यात तीन केंद्रांमधून असलेल्या एकूण ७३ मंजूर पदांपैकी ५२ पदे कार्यरत असून, २१ पदे रिक्त आहेत. दरम्यान, या प्रकाराने तालुक्यातील सातशेपेक्षा जास्त उर्दू भाषिक विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
केवळ महाड तालुक्यात 21 हुन अधिक पदे रिक्त असतील तर संपूर्ण रायगड जिल्ह्यात व राज्यात ही संख्या खूप मोठी असल्याची चिंता पालक व्यक्त करीत आहेत. दुसऱ्या बाजूला उर्दू भाषिक डीएड व बीएड झालेली मुले असून ते नोकरीच्या संधी शोधत आहेत, रोजगारापासून वंचित आहेत, सदरच्या रिक्त जागा भरत नसल्याने या गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांवर देखील अन्याय होतोय.
तालुक्यातील तीन केंद्रांमध्ये असलेल्या उर्दू माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या सुमारे तीसपेक्षा जास्त आहे. यामध्ये मंजूर उपशिक्षकांची ६० पदं असताना, प्रत्यक्षात ४९ कार्यरत आहे. रिक्त पदांची संख्या ११ आहे. तर, पदवीधर शिक्षकाची मंजूर पदे १३ असून, केवळ ३ पदे कार्यरत आहेत. ११ पदे रिक्त असल्याची माहिती पंचायत समिती शिक्षण विभागाकडूनच देण्यात आली आहे.
यासंदर्भात प्राथमिक स्तरावर करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान तालुक्याच्या मुमुर्शी, दासगाव व सव आदी शाळांमधून शिक्षक नसल्याने अन्य शाळांतील उर्दू भाषिक शिक्षकांना कामगिरीवर या संबंधित शाळांवर पाठवण्यात आल्याची माहिती महाड पंचायत समिती शिक्षण विभागाच्या अधिकार्यांकडून देण्यात आली. यासंदर्भात करण्यात आलेल्या पाहणीमध्ये तालुक्याच्या उर्दू भाषिक तीन केंद्रांतर्गत दासगाव कांबळे व तुडिल या ठिकाणी प्रत्येकी दोनशे पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थी- विद्यार्थिनी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले आहे.
मागील दोन वर्षे जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बहुतांश काळ बंद होत्या. मात्र, त्यानंतर चालू वर्षी सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील अनेक प्रमुख गावांतील उर्दू भाषिक शाळांमध्ये शिक्षकच येत नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रशासनाचे दुर्लक्ष
पुढील पिढीतील सुमारे सातशेपेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भवितव्याबाबत जिल्हा शिक्षण मंडळाकडून अनास्था दिसत आहे. शासनाने यासंदर्भात उर्दू भाषिक विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांची व्यवस्था कामगिरी तत्त्वावर करावी, अशी मागणी महाड तालुक्यातील मुस्लीम भाषिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संपूर्ण महाड तालुक्यातील उर्दू भाषिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे रिक्त आहेत. परंतु, हा प्रश्न केवळ महाडपुरता मर्यादित नसून, जिल्हा स्तरावर देखील हीच समस्या आहे. याबाबत वरिष्ठांकडे नव्याने शिक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पंचायत समितीच्या शिक्षण विभागीय अधिकारी पालकर यांनी दिली.
शिक्षकांची पाठ
मागील दोन वर्षे जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शाळा बहुतांश काळ बंद होत्या. मात्र, त्यानंतर चालू वर्षी सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षापासून तालुक्यातील अनेक प्रमुख गावांतील उर्दू भाषिक शाळांमध्ये शिक्षकच येत नसल्याने येथील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
महाड तालुक्यामध्ये एकूण जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा 20 आहेत.आणि त्यामध्ये सध्या एकूण मंजूर शिक्षक 73 आहेत आणि रिक्त शिक्षक 27 आहेत आणि त्या मधले 13 शिक्षक पदवीधर आहेत आणि 14 उपशिक्षक आहेत.खरंतर उर्दू शाळांच्या संदर्भात जे पवित्र पोर्टल 2019 च्या अनुषंगाने जे काही शिक्षक भरती झालेली होती. त्यामध्ये आपल्याकडे एकही उर्दू शिक्षकांची भरती झालेली नाही तसेच आंतर जिल्हा बदली च्या प्रक्रियेमध्ये एकही उर्दू शिक्षक आपल्याकडे आले नाही त्यामुळे आपल्याला सध्याही उर्दू पदे जरी दिसत असली तरी आम्ही आमच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनानुसार माननीय आयुक्त शिक्षण यांना पत्र पाठवले आहे की आमच्याकडे एवढी उर्दूची पदे रिक्त असून संपूर्ण जिल्ह्याचा आम्ही अहवाल दिला आहे. आणि उर्दू पदे लवकरात लवकर आम्हाला भरून मिळावी असे आम्ही शासनाला कळवले आहे, असे शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद रायगड पुनीता गुरव यांनी सांगितले.