Home > मॅक्स रिपोर्ट > ममता बॅनर्जींचा सत्याग्रह कुणासाठी ?

ममता बॅनर्जींचा सत्याग्रह कुणासाठी ?

ममता बॅनर्जींचा सत्याग्रह कुणासाठी ?
X

३ फेब्रुवारी कोलकातामध्ये सीबीआय विरुद्ध कोलकाता पोलीसात झालेल्या बाचाबाचीमुळे वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे. शारदा चिटफंड घोटाळा प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या सीबीआय पथकालात कोलकाता पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तेथे राजकीय नाट्यमय घडामोडी सुरूच आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या केंद्रातील मोदी सरकारविरोधात हल्लाबोल करत धरणे आंदोलनाला बसल्या आहेत. मोदी सरकार सीबीआयवर दबाव टाकत असल्याचा आरोप बॅनर्जी यांनी केला आहे. मेट्रो चॅनेलजवळ त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. हे धरणे म्हणजे मी संविधानाच्या बचावासाठी सुरू केलेला सत्याग्रह आहे, असे ममता म्हणाल्या.

'सीबीआय नोटीस न देताच कोलकाता पोलीस आयुक्तांच्या घरी आली. आमच्या फोर्सला सुरक्षा पुरवणं आमची जबाबदारी आहे. आम्ही सीबीआय अधिकाऱ्यांना अटकही करू शकलो असतो, पण आम्ही त्यांना सोडून दिलं,' असंही त्या म्हणाल्या.

'पंतप्रधान अशाप्रकारे सूडबुद्धीचे राजकारण करण्यासाठी सीबीआयवर दबाव आणत आहेत. मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह बंगालमध्ये सत्तापालटाचा प्रयत्न करत आहेत. संपूर्ण देश मोदींमुळे त्रस्त आहे आणि त्यांची एक्सपायरी डेट जवळ आली आहे. मी त्यांच्या रॅलीला परवानगी दिली नाही म्हणून जाणीवपूर्वक भाजप बंगालला बर्बाद करायला निघाली आहे. काल मोदींच्या भाषणात हे स्पष्ट दिसत होतं की ते धमकी देत होते,' असा आरोप ममतांनी केला आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? सीबीआय पथक का पोहचलं पोलीस आयुक्तांच्या घरी?

शारदा आणि राजवैली चिटफंड घोटाळ्याप्रकरणी विचारपूस करण्यासाठी सीबीआयची एक टीम रविवारी संध्याकाळी(ता.3फेब्रुवारी) कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी पोहोचली. लवकरच राज्याचे अन्य पोलीस अधिकारी त्या ठिकाणी पोहोचले आणि सीबीआय टीमला रोखले. या दरम्यान ममता बॅनर्जीही कुमार यांच्या घरी पोहोचल्या. पोलिसांनी सीबीआयच्या पाच अधिकाऱ्यांना अटक केली, त्यानंतर दोन-तीन तासांनी त्यांची सुटका केली. राजीव कुमार यांनी चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी तयार करण्यात आलेल्या पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या टीमचे नेतृत्व केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चिटफंड घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सीबीआयला शंका आहे की, कुमार यांनी घोटाळ्याशी संबंधित दस्ता ऐवज नष्ट केले आहेत. म्हणून त्यांच्या चौकशीसाठी हे पथक त्यांच्या निवासस्थानी गेलं होतं.

दरम्यान वरील सर्व घडामोडी घडल्यानंतर आंदोलनला बसलेल्या ममता बनर्जी यांना आरजेडी नेते तेजस्वी यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दु्ल्ला, बसपा अध्यक्ष मायावती यांच्यासह अनेक नेत्यांनी ममता यांना आपला जाहीर पाठिंबा असल्याचे सांगितले.

Updated : 4 Feb 2019 7:46 AM IST
Next Story
Share it
Top