Home > Election 2020 >  जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही – विनोद पाटील

 जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही – विनोद पाटील

 जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत निवडणूक लढणार नाही – विनोद पाटील
X

मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही. तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही. असं म्हणत पाटील यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केलं आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे.

मागच्या काळात मी जाहीर केलं होतं, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक लढवणार नाही. परंतु सुदैवाने मराठा आरक्षण मिळालं. आज न्यायालयीन लढाई लढत असताना माननीय उच्च न्यायालयात प्रकरण जिंकलो जरी असलो, तरी या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रलंबित आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याच्या चौकटीत आपल्या बाजूने लागेल हा मला विश्वास आहे. मागील अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल चर्चा आहे की, मी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार. आज मी स्पष्ट करतो, मी सदर निवडणूक लढणार नाही. जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही.

मी न्यायालयीन लढाई, सामाजिक लढाई ही कुठलाही राजकीय विचार डोळ्यासमोर ठेवून केलेली नव्हती. मला तर विश्वास आहे की, सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीत 100% विजयी होऊ शकतो. परंतु मी सुद्धा इतर नेत्यांप्रमाणे आज जर राजकारणात गेलो तर मला वाटते माझ्याकडून या राजकारणाच्या धावपळीत कोर्टातील केसकडे दुर्लक्ष होऊ शकत.

50 पेक्षा अधिक युवकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय. जर काही कमी जास्त झालं तर अनेकांचे जीव धोक्यात टाकण्याचा मला अधिकार नाही.

त्यामुळे मी माझी नैतिकता समजून मी आज औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही हे स्पष्ट करतो.

ज्या-ज्या पक्षांनी विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षाने मला बिनशर्त पुरस्कृत उमेदवारी देण्याचं जे मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि आपल्या सर्वांची माफी मागतो, या पुढच्या काळात मराठा समाजासह इतर समाजाच्या तरुणांचे प्रश्न लावून धरण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करील.

- आपला विनोद पाटील.

अध्यक्ष: आर.आर.पाटील फाउंडेशन, महाराष्ट्र

Updated : 31 July 2019 1:12 PM IST
Next Story
Share it
Top