Home > मॅक्स रिपोर्ट > खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी ?

खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी ?

आपण एकमेकांशी बोलताना एखाद्या जातीचा अपमानजनक उल्लेख का करतो? बोलताना एखाद्या जातीबाबत वापरणारे हे शब्द कोणतं? तुम्हाला खरंच एखाद्या जातीचा राग येतो का? जातीवाचक शब्दांचा समाजावर नक्की काय परिणाम होतो... वाचा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट खेडी केंव्हा तोडणार जातींची बेडी

खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी ?
X

काय मर कालवा लावला आहे? उठावदार, चकमकीत कपडे घातले की हिरोवाणी दिसतोस किंवा कोट्यावानी दिसतेस, घीसाड्यागत अवतार का केलाय? रंगाने काळा असेल तर वडरा म्हणून हाक मारणे, एखाद्याची गोष्ट दुसऱ्याला सांगितली तर न्हावकी करतोय न्हाव्याचा आहेस का? हे आणि असे बरेचसे शब्द प्रयोग आपल्या रोजच्या जीवनात ग्रामीण भागात ऐकायला भेटतात.

या शब्दांबरोबर हाल्या तुला मांच्या गाडग्यात घातलं अशी शिवी जनावरांना गुराखी देतो,चांभार चौकशा करू नको, काय घर केलंय पारध्यागत, नंदीवाल्याचा आहेस का? अशी जातीवरून अवहेलना करणारी वाक्ये नेहमीच ऐकायला मिळतात. एखाद्याचे लहान मुल ऐकत नसेल तर लगेचच याचे महार लाड बंद करा. असा सल्ला दिला जातो.

स्त्रियांना तुझ्या आईला र लावला, प लावला अशा जात आणि लिंगवाचक शिव्या नेहमीच दिल्या जातात हे मी अनेक वर्षापासून ऐकत आलोय ग्रामीण भागात आजही हे ऐकायला मिळतं."

हा अनुभव आहे ग्रामीण भागात वास्तव्य केलेल्या शैलेश सावंत यांचा ते पुढे सांगतात

"या वाक्यांचे सामान्यीकरण झाले असल्याने त्यात बहुतांशी लोकांना काहीच गैर वाटत नाही. विशेष जाती, जमातींची, जात समुदायातील लोकांची अवहेलना करणारे हे शब्द प्रयोग आहेत. आपल्या देशाला मौखिक इतिहासाची परंपरा आहे. भविष्यात इतिहास लेखनासाठी जेंव्हा मौखिक इतिहासाचा आधार घेतला जाईल तेंव्हा उपरोक्त संबंधित जाती, जमातींची समाज प्रतिमा काय म्हणून नोंदवली जाईल? तर अमुक अमुक जाती, जमातीतील लोक असेच असतात हे बिंबवले जाईल का? या प्रकियेतून जातीचे अस्तित्व ठळक झाले आहे".

जातीच्या या बेड्या इतक्या घट्ट झाल्या आहेत की, आजसुद्धा जातीबाहेर होत असलेल्या विवाहांना प्रखर विरोध केला जातो. मुलगी ऐकत नसेल तर ऑनर किलिंग सारखे प्रकार देखील घडत असतात. बेटी व्यवहारामध्ये केवळ उच्च जाती विरोध करतात असे नाही.

मिलिंद नावाच्या एका मातंग तरुणाचे बौध्द असलेल्या मुलीवर प्रेम आहे. परंतु तो मातंग असल्यामुळे त्याच्या लग्नाला मुलीच्या घरचा विरोध आहे. तो सांगतो मी जाती अंताच्या चळवळीत काम करतो परंतु या शोषित जातींमध्ये देखील जात वैशिष्ट्यांचे आचरण अतिशय प्रखर स्वरूपात आढळून येते. ते जातीने घालून दिलेले नियम तोडायला तयारच होत नाहीत.

वैशाली रायते ही उच्च शिक्षित मराठा कुटुंबात जन्माला आलेली मुलगी आहे. तिला आंतरजातीय लग्न करायचे आहे. ती तिचा अनुभव सांगते

"मी मराठा समाजातील अविवाहित तरुणी आहे, घरातील परिस्थिती कधीच जातीय कट्टर नव्हती. याचमुळे माझा मित्र परीवार जातीबाहेर वाढला. त्यानंतर सामाजिक वातावरणात घडत गेल्याने मी वडिलांना एक दिवस म्हणाले की दादा मला

"जातीबाहेर लग्न करायचे आहे" ते मुंबईत काही काळ राहिले होते. त्यामुळे गाव खेड्यातील कट्टर जातीयता त्यांच्या आचरणात नव्हती. त्यामुळे या वाक्याला त्यांनी सहज घेतलं आणि म्हणाले

"नाही रे पोरी समाज नावं ठेवतो"

इतकं बोलून ते शांत झाले.

पण आई मात्र म्हणते

"जातीबाहेर लग्न करणार असशील तर माझ्या घरातून चालती हो, तिकडे महाराशी कर नाही मांगाशी कर माझ्या घराचा उंबरठा ओलांडून यायचे नाही."

उंबरठा न ओलांडण्याच्या कट्टरतेचे वास्तव तर भयानक आहे. वनिता यांनी नाभिक समाजाच्या मुलाशी तीन वर्षापूर्वी घरचा विरोध झुगारून लग्न केले आहे. आजपर्यंत तिच्या घरी जाऊन उंबरठा ओलांडणे तर दूरच पण घरून त्यांना साधा फोन देखील कुणी केलेला नाही.

जातीच्या या बेड्या तोडण्याची हिम्मत दाखवणारी अनेक जोडपी आज महाराष्ट्रात आहेत.

चर्मकार समाजात जन्म घेतलेला सागर आणि त्यांचा भाऊ दोघांनीही मराठा समाजातील मुलीशी लग्न केले आहे. लग्नानंतर सामाजिक बहिष्कार वगैरे घटना घडल्याच. पण या सर्वावर मात करत त्यांनी त्यांच्या संसाराचा गाढा नेटके पणाने पुढे नेला आहे. इतकेच नव्हे तर स्वतःच्या बहिणीचा प्रेम विवाह मराठा तरूणासोबत त्यांनी लाऊन दिला आहे.

जातीने अशा अनेक स्वरूपात भारतात आपले अस्तित्व मजबूत केले आहे. विशेषकरून जातींचे अस्तित्व आजही ग्रामीण भागात जास्त प्रमाणात दिसून येते.

याबाबत नवयान महाजलसा चे शाहीर तसेच महाराष्ट्रातील सांस्कृतिक अभ्यासक सचिन माळी सांगतात

"खेड्यातील मिरासदार शेतकरी जातींनी बँका, कारखाने, दूध डेअऱ्या, खते व बियाणे विक्री केंद्र, पाणी सोसायट्या, शिक्षण संस्था अशा माध्यमातून आपले सत्ताकेंद्र मजबूत केलेले आहे. खेड्यातील आर्थिक व्यवस्था आणि नियोजन हे जात्यंतक नसून ते जातीव्यवस्थाक आहे. त्यामुळे Marginalize जातींना मिरासदार जातींच्या अधिपत्याखालीच वावरावे लागते. शूद्र-अतिशूद्र जातींना संख्यादुर्बल असल्याने गावात दाबूनच राहावे लागते.

दलितांवरील अत्याचाराच्या घटनांचा जर बारकाईने अभ्यास केला तर हे ध्यानात येते की, मिरासदार शेतकरी जातीचा आशिर्वाद असल्याशिवाय ॲट्रोसिटी घडतच नाही. खेड्यातील जातवास्तव अत्यंत दाहक असून SC, ST, VJNT आणि OBC मधील संख्या दुर्बल जातींना पावला पावलावर जाती दमनाला तोंड द्यावे लागते."

राहुल सपकाळ यांच्या गावाचे नाव भीमनगर आहे. अनेकदा त्यांच्या गावाचे नाव सांगितले की, लोक भुवया उंचावतात. तिथं एकाच जातीचे लोक आहेत का नाव असे कसे वगैरे प्रश्न नेहमीच विचारले जातात. ते सांगतात की जातीने आता मेंदूचा ताबा घेतलेला आहे. ती दृश्य स्वरूपात दिसत नाही. पण जेंव्हा जेंव्हा संधी मिळते तेंव्हा तेंव्हा अत्याचार केले जातात."

रणजित ने सांगितलेली बाब तर अतिशय आश्चर्यकारक आहे. तो सांगतो की आमच्या गावात आजही देवाच्या मंदिरात माझ्या समाजातील लोकांसाठी अंगाऱ्याची एक वेगळी देवळी आहे. या गोष्टींवरून वाद घालत बसण्यापेक्षा मी मंदिराकडे फिरकत नाही.

जात समुहांच्या आर्थिक विकासासाठी विविध योजना कार्यक्रम ठरवत असताना सरकार पुन्हा या जातींना पारंपारीक जातीने दिलेले व्यवसाय करण्यास उद्युक्त करत आहे. संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ हे चांभार समाजातील गटई काम करण्यास अनुदान देते.

आजही मेहतर समाजासाठी शौचालय साफ करण्यासाठीच्या जागा रिक्त ठेवल्या जातात. सफाई कामगारांमध्ये देखील अनुसूचित जातींची संख्या मोठी आहे. जात निर्मूलन ज्यांचे कर्तव्य आहे अशा सामाजिक न्याय विभागात देखील गाव खेड्यातील जातींना पारंपरिक व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे.

महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये जातीय अत्याचाराच्या दरवर्षी अनेक घटना घडत असतात. खून गंभीर इजा बलात्कार विनयभंग बहिष्कार अशा अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असतात. यातील स्त्रियांच्यावर होणारे अत्याचार देखील भयंकर आहेत.

२०१७ या वर्षी एकूण २१५३, २०१८ ला २६०१, २०१९ ला १३७१ जातीय अत्याचाराचे एकूण गुन्हे नोंद झालेले आहेत. खैरलांजी,खर्डा सारखी निर्घृण जातीय हत्याकांड या राज्यात घडलेली आहेत.या धगधगत्या वास्तव असताना भारतातील खेडी केंव्हा तोडणार जातीची बेडी असा प्रश्र्न उपस्थित होतो.

Updated : 5 Jun 2021 8:10 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top