Home > Election 2020 > पुण्याचा पराभव...

पुण्याचा पराभव...

पुण्याचा पराभव...
X

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी झालेल्या मतदानात राज्यात पुण्याने सर्वांत कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली. पुण्यात पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाल्यानंतर पुण्याचा सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर हा दर्जा काढून घ्यायला हवा असं मला वाटतं.

मतदानाच्या कमी टक्केवारीवर अनेक पुणेकरांनी वेगवेळे जोक फॉरवर्ड करायला सुरुवात केलीय. पुढच्या निवडणुकीत ईव्हीएम घरोघरी फिरवा पासून एक ते चार मतदान बंद ठेवा पर्यंत. पुण्याच्या काही लोकांना आपल्या अशा विक्षिप्तपणाचा नको तितका गर्व आहे. हा विक्षिप्तपणा लोकशाहीविरोधी आहे. मतदानात कमी टक्केवारी असली तरी दुसऱ्यांना टोमणे मारणे आणि अक्कल शिकवण्यात आम्ही 100 टक्के आहोत. असा दुसरा एक मेसेज सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला आहे. हे जर पुणेकरांना भुषणावह वाटत असेल तर ही शोकांतिकाच आहे.

पुण्यातील कसबा, हिंजवडी अशा उच्चशिक्षित भागांमध्ये मतदानाची टक्केवारी घसरलीय. सध्या देशभरात हेच चित्र दिसतंय. कमी शिकलेल्या किंवा संसाधनांची कमतरता असलेल्या भागांमध्ये लोक जागरूकपणे मतदानाला जातात. लोकशाहीचा हा सण साजरा करतात. इतर सणांच्या दिवशी पुणे सजून-धजून रस्त्यावर उतरलेलं असतं. लोकशाहीच्या या सणात पुणेकरांचा निरूत्साह गंभीर आहे. जर खूप शिकल्याने देशाची चिंता वाटणं कमी होत असेल तर आपल्या शिक्षणपद्दतीवर सुद्धा पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

देशाच्या जडणघडणीसाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींमध्ये पुण्यातील विद्वानांचा मोठा सहभाग असतो. सल्ले देण्यापासून कार्यक्रम देण्यापर्यंत. अनेक मुलभूत विषयांवर पुण्यात संशोधन चालतं. पुण्याला सुधारणांचा इतिहास आहे. सनातनी आणि पुरोगामी अशा टोकाच्या विचारधारा इथे नांदल्या. बौद्धीक घुसळणीचं पुणे हे केंद्र राहिलंय. याची मुद्दाम आठवण करून देण्याची आता गरज वाटतेय.

पुण्याने हा वारसा आता गमावलाय. ज्या अधिकारवाणीने पुण्यातील सर्वच सामाजिक-राजकीय कार्यकर्ते-नेते विविध विषयांवर बोलत असतात, भूमिका मांडत असतात, राज्यातल्या सर्व मुख्यप्रवाहांवर आपलं वर्चस्व गाजवत असतात त्या सर्वांचा पुणेकरांनी पराभव केलेला आहे. पुणे आता उणे झालंय. यापुढे काही बोलण्याआधी पुणेकरांनी आत्मपरिक्षण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

Updated : 24 April 2019 8:32 PM IST
Next Story
Share it
Top