Home > मॅक्स रिपोर्ट > Lockdown यात्रा : राष्ट्रध्वजांची विक्री 50 टक्क्यांनी घटली

Lockdown यात्रा : राष्ट्रध्वजांची विक्री 50 टक्क्यांनी घटली

देशात गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बाधांचा परिणाम सर्वच व्यवसायांवर झाला. याचा फटका राष्ट्रध्वजांची निर्मिती करणाऱ्या खादी ग्रामोद्योग समिती संस्थेलाही बसला आहे. आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदुरकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Lockdown यात्रा :  राष्ट्रध्वजांची विक्री 50 टक्क्यांनी घटली
X

देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर जेव्हा तिरंगा डौलाने फडकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या मनात देशाभिमान जागृत होत असतो. लाल किल्ल्यावरचा हा तिरंगा महाराष्ट्रासाठी आणखी खास आहे कारण हा तिरंगा नांदेडमध्ये तयार झालपा आहे. देशाच्या शक्तीचं प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थेमार्फत केले जाते. इथे तयार झालेले राष्ट्रध्वज देशभर वितरित करण्याचे देखील संस्थेतर्फे दरवर्षी केले जाते.

पण यंदा कोरोनाचे संकट आणि गेल्या दीड वर्षांपासून असलेल्या लॉकडाऊनच्या निर्बंधांमुळे राष्ट्रध्वजांची विक्री 50 टक्क्यांनी घटल्याचे समोर आले आहे. नांदेडच्या मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना ही माहिती दिली.

नांदेड आणि कर्नाटक राज्यातील हुबळी (जि. धारवाड ) या दोनच ठिकाणी राष्ट्रध्वज तयार करण्याचे काम केले जाते. तसेच या दोन ठिकाणांवरुन देशभर राष्ट्रध्वज वितरीत केला जातो. यंदा कोरोना महामारीमुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.



नांदेडच्या संस्थेत तयार करण्यात आलेला राष्ट्रध्वज दरवर्षी पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली, छत्तीसगढ , राजस्थान, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये वितरित केला जातो. दरवर्षी दीड ते अडीच कोटी रुपयांचे ध्वज देशभर वितरित केले जातात. पण कोरोना महामारीमुळे संस्थेतून यंदा 55 लाख रुपयांच्या 6 हजार 841 इतक्या राष्ट्रध्वजांची विक्री झाली आहे. यंदा 50 टक्के विक्री कमी झाल्याचे मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थेचे सचिव ईश्वरराव भोसीकर यांनी 'मॅक्स महाराष्ट्र'शी बोलताना सांगितले आहे.




दिल्लीचा लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, मंत्रालय, यावर फडकणारा राष्ट्रध्वज हा आकाराने सर्वात मोठा असतो. 14 ×21 फूट इतका या तिरंग्याचा आकार असतो. त्यानंतर जिल्हास्तरीय कार्यालय ते ग्रामपंचायतीच्या कार्यालयांणध्ये 8×12 , 6×9 असे आकार असतात. राष्ट्रध्वजाचे आकार हे ठरवून देण्यात आलेले आहेत.



हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1967 साली मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली. मराठवाडा, तेलंगाण आणि कर्नाटकात त्यांनी या समितीच्या शाखा सुरू केल्या. सरदार वल्लभभाई पटेल हे या संस्थेचे मार्गदर्शक होते. तर माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी या संस्थेत संस्थापक सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

या संस्थेत साधारणपणे 650 इतके कारागीर व 75 कार्यकर्ते काम करतात. संस्थे अंतर्गत 4 मोठे उत्पादन केंद्र, नऊ उपकेंद्रांच्या माध्यमातून याचा कारभार चालतो. 5 एकरात पसरलेली ही संस्था सध्या मोडकळीस आली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी संस्थेच्या सदस्यांनी पुढाकार घेतला आहे,

Updated : 14 Aug 2021 8:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top