Ground Report : दरडग्रस्त कुटुंबांची परवड, ऐन दिवाळीतही घरात अंधार
X
राज्यात आता कोरोनाची तीव्रता कमी झालेली आहे, त्यामुळे दिवाळीचा उत्साह आहे...घरोघरी आकाश कंदील झळकत आहेत. पण केवळ सरकारी अनास्थेमुळे अनेक कुटुंब अशी आहेत, ज्यांची दिवाळी अंधारात जाण्याची भीती आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना भागात दोन महिन्यांपूर्वी अतिवृष्टीच्या काळात दरड कोसळण्याच्या शक्यतेने अनेक कुटुंबांचे तात्पुरत्या स्वरुपात स्थलांवर करण्यात आले होते. या लोकांना शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते.

पण आता त्यांना सरकारने तात्पुरत्या स्वरुपात निवारे उपलब्ध करुन दिले. त्यासाठी भव्य कार्यक्रम घेण्यात आला. चांदोली अभयारण्याच्या मध्यभागी कोयनानगर या ठिकाणी शासकीय वसाहतीला लागून तात्पुरती पत्र्याची शेड या लोकांना घरांच्या रुपाने देण्यात आली आहे. या घरांचा ताबा देतांना मोठा गाजावाजा केला गेला होता. पण प्रत्यक्षात इथे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली आहे. तसेच वीजेचे कनेक्शन देखील नसल्याने इथे या दरडग्रस्तांना अंधारात रहावे लागते आहे.

अन्न शिजवण्यासाठी गॅसची सोय नसल्यामुळे चूलीवर स्वयंपाक करावा लागतो, पण त्यासाठी लाकडं, रॉकेल मिळत नसल्याने प्रचंड त्रास होत असल्याचे इथले लोक सांगत आहेत. "जेव्हा निवडणूक लागते तेव्हा आम्ही पोटाला लहान बाळ बांधून मतदानाला जायचो, आता आमच्या घरावर संकट आले तरी नेते येत नाहीत" असा संताप एका महिलेने व्यक्त केला.

यासंदर्भात आम्ही साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी दोन ते तीन दिवसात सुविधा दिल्या जातील असे सांगितले. पण अजूनही या लोकांना सुविधा मिळालेल्या नाहीत.