नाहीतर उद्या कोळी महिला हातात कोयता घेऊन रस्त्यावर उतरतील
कोळी महिला हातात कोयता घेऊन रस्त्यावर उतरल्या तर, हो पण हे होऊ शकतं, कारण वाचून तुम्हाला धक्काच बसेल
X
मुंबईत मुळनिवासी आणि कोळी लोकांच्या जीवावर राजकारण केलं जातं. निवडणूकीच्या काळात कोळीवाड्यांमध्ये पायघड्या घातल्या जातात. पण इतर साडेचार वर्षे कोळी समाजाच्या प्रश्नांचं भिजत घोंगडं पडून राहतं. त्याचाच संताप कोळी महिलांमध्ये दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी सुत्र हातात घेताच तातडीने शेकऱ्यांना मदत करण्याबाबत सूचना दिल्या. व्यावसायिकांना दिलासा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे म्हटले. पण मुंबईतील मुळनिवासी असलेल्या कोळी लोकांचा नव्या मुख्यमंत्र्यांनाही पुर्ण विसर पडल्याचे दिसून आले.
महाग झालेलं डिझेल आणि मोठ्या बोटींचा सुळसुळाट यामुळे आम्हा कोळी लोकांच्या 80 टक्के बोटी बंद झाल्या आहेत. आमचं जगणं म्हणजे पहाटंच उठून धक्क्यावरून माल आणणं आणि आठवड्यातले दोन दिवस बाजारात मच्छी विकायला बसणं. पण बाजाराची गटार झालीय. लोकं बाहेरून कचरा आणून आतमध्ये टाकतात. त्यामुळं रोगराईचा धोका. त्यातच दारुडे लोकं रात्री दारू पिऊन पडतात. इथं अनेकदा चोऱ्या होतात आणि आम्हाला हजारो रुपयांचा फटका बसतो. मात्र आमच्याकडं लक्ष द्यायला कोणत्याही सरकारला वेळ नाही, अशी भावना कोळी समाजातील महिलांनी व्यक्त केली.
दीडशे वर्षापुर्वीचा बाजार आहे. या बाजारात आमची आजी पंजी बसायची. तेव्हापासूनचा हा बाजार आमचा आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. एका स्वयंसेवी संस्थेने या बाजारात आमच्यासाठी शौचालय बांधून दिलं. मात्र महापालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या सुविधा दिल्या जात नाहीत. आम्हाला पिण्यासाठी पाणी नाही, या बाजारात कचऱ्याचे ढीग पडले आहेत. बाहेरून कचरा आणून आत टाकला जातो. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे, त्यामुळे घाणीचं साम्राज्य असलेल्या बाजारात लोकं मच्छी घेण्यासाठी येत नसल्याचेही मासेविक्री करणाऱ्या अनिता पाटील यांनी सांगितले.
या बाजारात चोऱ्या होतात. मात्र तरीही बाजाराला महापालिकेकडून गेट किंवा वॉचमनची व्यवस्था करण्यात येत नाही. एवढंच नाही तर महापालिका कर वसूल करते. मात्र सुविधा देण्याबाबत कायम उदासिनता दाखवत आहे. त्यामुळे कोळी महिलांनी संताप व्यक्त केला.
या राज्यात शेतकऱ्यांना मोठ्या सवलती, बँकेचे कर्ज दिले जाते. तरीही शेतकरी आत्महत्या करतो. मात्र कोळी लोकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज दिले जात नाही. सवलती आणि योजनेचा लाभ दिला जात नाही. तरीही आम्ही हिंमतीने लढतो. आम्ही आत्महत्या करणार नाही. पण आमच्याकडे असंच दुर्लक्ष केलं जाणार असेल तर आम्ही हातात काठ्या-कुऱ्हाडी आणि कोयते घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा मच्छीविक्रेत्या दिक्षीता धोणे यांनी दिला.
मुंबईत मुळनिवासी आणि मराठीच्या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. मात्र कोळी समाजाच्या प्रश्नांकडे कुणाचंच लक्ष नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कोळी महिलांचा हा उद्रेक होऊ द्यायचा नसेल तर सरकारने कोळी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने पावलं उचलायला हवी.