Home > मॅक्स रिपोर्ट > बाल दिंडीतून शिकवला जातोय सर्वधर्म समभाव

बाल दिंडीतून शिकवला जातोय सर्वधर्म समभाव

सर्वधर्मसमभावाची जाणीव शालेय वयातच मुलांना व्हावी यासाठी बालदिंडीचा अनुभव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे याविषयीचा ग्राउंड रिपोर्ट प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून

बाल दिंडीतून शिकवला जातोय सर्वधर्म समभाव
X

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर सज्ज झाले असून लाखो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरून दिंड्या पायी चालत पंढरपूरच्या दिशेने येत असतात. या दींड्या रस्त्याने येत असताना ठिकठिकाणी मुक्काम करत असतात. मुक्कामाच्या ठिकाणी उभे आणि गोल रिंगण सोहळे होतात. हा सोहळा पाहण्यासाठी लाखो लोकांचा जनसमुदाय उपस्थित असतो. या दिंड्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या असतात. त्यामध्ये विविध जाती धर्माचे लोक सहभागी झाले असतात. त्यांच्यात एकोपा असतो. तेथे कोणीच उच्च आणि नीच्च नसतो सर्वजण एकसमान असतात.

प्रत्येकाला पंढरपूरची ओढ असते. उन्ह,वारा,पाऊस झेलत या दिंड्या पंढरपूरला येत असतात. रस्त्याने येत असताना अनेक जाती धर्माचे लोक या दिंड्या आणि वारकऱ्यांना भोजन देण्याचे काम करतात. अनेक जण सेवाभावी वृत्तीने मोफत सेवा देतात. वारकऱ्यांना पंढरपूरच्या विठ्ठलाची ओढ असते. म्हणूनच ते न थकता चालत राहतात. ते सातत्याने विठू नामाचा गजर करत चालत राहतात. या वारकऱ्यांच्या खांद्यावर भागवत धर्माची पताका असते. आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले असताना गाव खेड्यात ही याबाबतचे अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले आहे. गावातील शाळेत बाल दिंड्याचे आयोजन केले गेले असल्याचे पहायला मिळत आहे. मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने ही या बाल दिंडीचे आयोजन केले होते. ही बाल दिंडी आयोजित करण्या मागचा उद्देश मुलांना सर्वधर्म समभाव समजा असा असल्याचे या शाळेच्या शिक्षिका शर्वरी थोरात यांनी बोलताना सांगितले.

मुलांनी लुटला दिंडीचा आनंद

या बाल दिंडीत शाळेतील लहान मुले सहभागी झाली होती. त्यांनी विविध रंगाचे पोशाख परिधान केले होते. मुलींनी साडी परिधान केली होती तर मुलांनी वारकऱ्यांचा पोशाख परिधान केला होता. रंगीबेरंगी साड्या आणि मुलांचे विविध रंगाचे पोशाख बघणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या बाल दिंडीने गावात प्रभात फेरी मारून सर्वधर्म संभावाचा संदेश दिला. या बाल वारीत मुलांच्या डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती तर याच दिंडीतील एका मुलाने विठ्ठलाचा पोशाख करून त्याच्याप्रमाणे रूप धारण करण्याचा प्रयत्न केला होता. या दिंडीतील लहान मुलांनी रिंगण करून फुगडीचा आनंद लुटला. तसेच मुलांनी भजन आणि कीर्तनाच्या गाण्यावर ठेका धरला होता.

मुले उड्या मारून आनंद व्यक्त करताना दिसत होती. या दिंडीतील मुलांच्या गळ्यात एक लहानशी ढोलकी ही होती. त्या ढोलकीच्या तालावर लहान मुले तल्लीन झाली असल्याचे पहायला मिळाली. ही बाल दिंडी गावातून जात असताना ठिकठिकाणी तिचे उत्साहात ही स्वागत करण्यात आले. बाल दिंडी पहाण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. या बाल दिंडीचा समारोप जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत करण्यात आला. यावेळी या शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


सर्वधर्मसमभावाची जाणीव शालेय वयातच मुलांना व्हावी यासाठी बालदिंडीचा अनुभव उपक्रम आयोजित करण्यात आला आहे याविषयीचा ग्राउंड रिपोर्ट प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडून

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका शर्वरी थोरात यांनी सांगितले,की आषाढी एकादशी निमित्त बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ही बाल दिंडी आयोजित करण्या मागचा उद्देश म्हणजे जी लहान मुले आहेत,त्यांना या वारीतील सर्वधर्मसमभाव समजावा आहे. पंढरपूरचा विठ्ठल महाराष्ट्राचे प्रेरणा स्थान आहे. पंढपूरनगरी विठ्ठल रुक्मिणी यांचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून वारीतील सर्वांत एकोपा दिसून येतो. या बाल दिंडीतून बंधुभाव,एकता आणि समाजप्रेम निर्माण करण्याचे काम केले जात असून दिंडीतून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये बरेच कला गुण दडलेले असतात त्यांना बाहेर काढण्याचे काम या बाल दिंडीच्या निमित्ताने केले जात आहे. या दिंडीतून सामाजिक एकता,बंधुभाव,प्रेम आणि एकमेकांना सहकार्याची भावना जागृत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माऊलीच्या वारीमध्ये सर्वजण वैष्णवमय झाले आहेत. या बाल दिंडीतील मुलेही वैष्णवमय झाली आहेत. या मुसळधार पावसात ही सर्वजण माऊली माऊलीचा गजर करत पंढरपूरात पोचले आहेत.

Updated : 15 July 2022 3:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top