Home > मॅक्स रिपोर्ट > ज्वारीच्या भाकरीने महिलेला दिले जगण्याचे बळ

ज्वारीच्या भाकरीने महिलेला दिले जगण्याचे बळ

सोलापूर शहरातील शेळगी परिसरात कडक भाकरी बनवण्याचा व्यवसाय तेजीत असून यावर अनेक कुटुंबांचा (family)उदरनिर्वाह चालत आहे. या व्यवसायाची सुरुवात गेल्या दहा वर्षापूर्वी लक्ष्मी बिराजदार या महिलेने केली होती. सुरुवातीच्या काळात अनेकांनी भाकरीचा व्यवसाय चालणार नाही. त्यामुळे या व्यवसायात पडू नको. असे सल्ले देण्यात आले,परंतु त्यांनी हार मानली नाही, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट...

ज्वारीच्या भाकरीने महिलेला  दिले जगण्याचे बळ
X

मानवाचा दररोजचा संघर्ष प्रामुख्याने पोटाची खळगी भरण्यासाठी चाललेला असतो. त्यामध्ये पळणे,चालणे,बोलणे,आयडिया वापरणे याचा समावेश असतो. यातून काहीतरी साध्य व्हावे,असा प्रत्येकाला वाटते. प्राचीन काळी मानव पोट भरण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात असणारी फळे आणि कंदमुळे खावून दिवस काढत होता. कालांतराने मानव नद्यांच्या खोऱ्यात स्थायिक होवून त्याठिकाणी शेती करू लागला,त्यातून विशिष्ट प्रकारची नगरे देखील वसली गेली,याचे पुरावे देखील इतिहासात मिळतात. परंतु पोट भरण्यासाठी मानवाने प्राण्यांच्या शिकारी देखील केल्याची माहिती उपलब्ध होते. पुढे जावून मानवाच्या जीवन शैलीत बदल होवून तो प्रगत झाला.

तो इतका प्रगत झाला,की त्याने या निसर्गाच्या सानिध्यात कोणत्या रहस्यमय गोष्टी दडल्या आहेत,याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हे होत असतानाच त्याच्या आहारात सुद्धा बदल झाल्याचे दिसून येते. तो फळावरून ज्वारीची भाकरी,चपाती,भात, वरण येथपर्यंत येवून पोहचला आहे. आजच्या आधुनिक युगात तर मानवाचा आहार पूर्णतः बदलला असल्याचे दिसून येते. आजही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ज्वारीची आणि बाजरीची भाकरी मोठ्या चवीने खालली जाते. या भाकरीने अनेकांना जगण्याचे बळ दिले आहे.

सोलापूर शहरातील शेळगी परिसरात कडक भाकरी बनवण्याचा व्यवसाय तेजीत असून यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. या व्यवसायाची सुरुवात गेल्या दहा वर्षापूर्वी लक्ष्मी बिराजदार या महिलेने केली होती. सुरुवातीच्या काळात अनेकांनी भाकरीचा व्यवसाय चालणार नाही. त्यामुळे या व्यवसायात पडू नको. असे सल्ले देण्यात आले,परंतु त्यांनी हार मानली नाही. त्या कडक भाकरीची मार्केटिंग करत राहिल्या. कालांतराने त्यांच्या कडक भाकरीला सोलापूरच्या स्थानिक मार्केट मध्ये मागणी वाढली. हळूहळू या भाकरीची व्यप्ती महाराष्ट्रभर वाढत जावून त्यांच्या या भाकरीला आता अमेरिकेतून सुद्धा ऑर्डर आली आहे. या व्यवसायात जवळपास बावीस महिला भाकरी बनवण्याचे काम करत असून या कुटुंबाचा रहाट गाडा चालण्यास मदत होत आहे. या कडक भाकरीची अनेकांनी दखल घेवून त्यांना पुरस्कार देखील दिले आहेत. दिवसेंदिवस या कडक भाकरीची मागणी मार्केटमध्ये वाढू लागली आहे.

लहान मुलांच्या शिकवणीपासून आयुष्याची केली सुरुवात

कडक भाकरी व्यवसायिक लक्ष्मी बिराजदार यांचे प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झाले असून त्या अवघ्या नववी पर्यंत शिकल्या आहेत. त्यानंतर त्यांनी कसे बसे पुढील दोन वर्षे शिक्षण घेतले. पुढे त्या विवाहबद्ध होवून सासरी गेल्या. त्याठिकाणी ही त्या घरी बसून राहिल्या नाहीत. त्यांनी लहान मुलांच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. कालांतराने त्या कडक भाकरी बनवण्याच्या व्यवसायाकडे वळल्या. त्याची सुरुवात त्यांनी सोलापूर शहराला चीटकुन असणाऱ्या शेळगी परिसरात केली.

सुरुवातीला आल्या अनेक अडचणी

कडक भाकरी बनवण्याचा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकांनी त्यांना हा कडक भाकरीचा व्यवसाय चालणार नाही,असाही सल्ला दिला. परंतु त्या ना उमेद झाल्या नाहीत. त्यांनी भाकरी व्यवसायात खंड पडू दिला नाही. त्याची व्यवस्थितरित्या त्या मार्केटिंग करत राहिल्या. कालांतराने या भाकरीची चव बघून अनेक हॉटेल व्यवसायिकांनी यांची मागणी केली. प्रामुख्याने कर्नाटक राज्यात ही भाकरी आवडीने खाल्ली जाते. त्या कर्नाटकातील चडचण गावच्या रहिवाशी असल्याने त्यांना या कडक भाकरी विषयी पूर्णतः माहिती होती. तशाच प्रकारे त्या भाकरी बनवू लागल्या आणि कालांतराने हा व्यवसाय भरभराटीला आला.

बावीस कुटुंबांचा कडक भाकरीच्या व्यवसायावर चालतो उदरनिर्वाह

लक्ष्मी बिराजदार यांचा संतोषी माता नावाचा हा गृह उद्योग असून यामध्ये सुमारे बावीस महिला काम करत आहेत. एक महिला दिवसभरात सुमारे दोनशे ते तीनशे च्या आसपास कडक भाकरी बनवतात. यामध्ये काही महिलांना घरच्या अडचणी सोडवून काम करता येते. याठिकाणी काम करणाऱ्या महिलांना भाकरीच्या नगावर दरोरोज रोजगार दिला जातो. त्यामुळे येथे महिलां कामगाराची संख्या वाढताना दिसत आहे. या बावीस महिला दिवसाला सुमारे दोन हजाराच्या आसपास भाकरी बनवतात. यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्वारीच्या आणि बाजरीच्या पिठाची उपलब्धता स्वतः लक्ष्मी बिराजदार करून देतात. ज्वारी आणि बाजरी दळण्यासाठी घरातच पिठाची गिरणी सुरू केली असून त्यावर त्या ज्वारी,बाजरी दळण्याचे काम करतात. भाकरी बनवत असताना महिला पीठ पूर्णतः चाळून घेतात.

त्यानंतर आवश्यक तेवढे पीठ घेवून त्याची मोठ्या ताटात मळणी करतात. मळणी झाल्यानंतर पाहिजे तेवढा पिठाचा गोळा हातावर घेवून महिला त्याला गोल आकार देतात. त्यानंतर तो गोल आकार दिलेला पिठाचा गोळा पाट्यावर थोडेसे ज्वारीचे पीठ टाकून त्यावर टाकला जातो. तेथून खर्या भाकरीला सुरुवात होते. भाकरीला पाट्यावर व्यवस्थितरीत्या हाताने थापटून गोल आकार दिला जातो. हा आकार देत असताना भाकरीच्या बरच्या बाजूने पीठ टाकून भाकरी थापटली जाते. पूर्णतः भाकरीला आकार प्राप्त झाल्यानंतर ती भाजण्यासाठी शेगडीवर असणाऱ्या तव्यावर टाकली जाते. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर तिच्या वरच्या बाजूने पाणी लावण्यात येते. त्यामुळे भाकरी उलटल्यानंतर व्यवस्थितरित्या भाजली जाते. व्यवस्थित भाजलेली भाकरी एकदम पातळ असते. तयार झालेली भाकरी पंख्या झाली काही कालावधीसाठी वाळण्यासाठी ठेवली जाते. त्यानंतर त्याचे व्यवस्थित पॅकिंग करून ती होलसेल भावाने मार्केटमध्ये विकली जाते.

स्थानिक मार्केटसह राज्याच्या विविध शहरात जाते भाकरी

कडक भाकरीची मागणी वाढली असून शेळगी भागात असणाऱ्या अनेक घरात या भाकरी बनवण्याचा व्यवसाय केला जात आहे. लक्ष्मी बिराजदार बनवत असलेल्या भाकरीना राज्याच्या विविध शहरात मागणी असून त्या देशभरात झालेल्या अनेक प्रदर्शनात देखील सहभागी झाल्या आहेत. त्यांना विविध पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या उद्योगांची व्याप्ती पाहून मुद्रा योजनेतून कर्ज देखील देण्यात आले आहे. त्या चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात असून यातून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. या उद्योग व्यवसायाला त्यांनी अनेक जोड धंदे देखील जोडले आहेत.

महिलांनी खचून जावू नये

शेवटी बोलताना लक्ष्मी बिराजदार यांनी सांगितले,की यश अपयश या ठरलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे महिलांनी खचून जावू नये. मलाही सुरुवातीला बँकांनी कर्ज देण्यास नकार दिला. परंतु मी वारंवार बँकेकडे कर्जाची मागणी करत राहिले आणि एक दिवस मला बँकेने कर्ज दिले. आज सर्व उद्योग व्यवस्थित व्यवस्थित सुरू असून महाराष्ट्रातील अनेक महिलांनी उद्योग व्यवसायात यावे,असे त्यांना वाटत आहे.

Updated : 29 Oct 2022 7:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top