जातपंचायतीचा जाच, चार कुटूंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न
राज्यात जातपंचायतीच्या जाचाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातही जात पंचायतीच्या जाचातून सामुहिक आत्मदहनाचा प्रयत्न झाला. याबाबतचा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा स्पेशल रिपोर्ट
X
गेल्या काही दिवसात जात पंचायतीच्या जाचाचे अनेक प्रकार समोर येत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यातील नवघर येथील कोळीवाड्यातील जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून चार कुटूंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही राज्यात सामाजिक बहिष्कार आणि वाळीत टाकण्याच्या प्रकरणांमध्ये कोकण अग्रस्थानी दिसून येत आहे. सामाजिक बहिष्कारासह गाव कमिटीचे जाचक नियम, अटी-शर्ती व दंडेलशाहीने रायगड पोखरत चालला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील नवघर कोळीवाडा येथे तीन कुटुंबीयांना गावातील पंच कमिटीकडून वाळीत टाकण्याचा धक्कादायक प्रकार घडला. याबाबत संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान आपल्या कुटुंबीयांना गाव पंच कमिटीकडून पुन्हा वाळीत टाकल्याचा आरोप देवेंद्र मारुती कोळी आणि त्याच्या कुटुंबीयांनी केला. नवघर कोळीवाड्यातील जातपंचायतीच्या जाच आणि जुलमाला कंटाळून चार कुटुंबांनी रायगड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे हा बाका प्रसंग टळला.
रायगड जिल्ह्यातील पेण मधील नवघर कोळीवाड्यात जात पंचायतीकडून तीन कुटूंबियांना वाळीत टाकण्याचा प्रकार घडला. त्यानंतर या कुटूंबियांनी प्रशासनाकडे अर्ज-विनंत्या केल्या. मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त कुटूंबाने अखेर रायगड जिल्हाधिकारी कार्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार घडण्यापासून वाचला.
यावेळी वाळीत प्रकरणातील कुटूंबियांनी पंच कमिटीची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. तसंच आत्मदहनाच्या प्रयत्नानंतर का होईना पण आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पीडित कुटूंबाचे कुटूंबप्रमुख देवेंद्र कोळी यांनी यावेळी सांगितले की, गेल्या 15 महिन्यांपासून जात पंचायतीचा जाच सुरू आहे. त्यांच्या त्रास आता असह्य होत असल्याने आणि आमची सहनशक्ती संपल्याने आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेतला होता. कारण हा आमच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, असं मत यावेळी पीडित देवेंद्र कोळी यांनी व्यक्त केले. तसंच प्रशासनाने आम्हाला फिर्याद द्या आम्ही कारवाई करू असं आश्वासन दिले आहे.
तसंच पीडित कुटूंबातील महिला प्रगती कोळी यांनी सांगितले की, आमच्यावर जातपंचायतीच्या पंचांनी जाचक अटी टाकल्या आहेत. मात्र यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत नव्हती. त्यामुळे आम्ही आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सांगितले आहे की, तुम्ही फिर्याद द्या त्यानंतर आम्ही तातडीने कारवाई करू. मात्र फिर्याद दिल्यानंतर गावातील पंच कमिटी आणि नागरिकांकडून शिवीगाळ केली जाते. त्यामुळे आमचे मानसिक खच्चीकरण होते. मात्र प्रशासनाने मार्गदर्शन केल्याप्रमाणे आम्ही फिर्याद देणार आहोत. तसंच आम्हाला प्रशासनावर विश्वास असून ते न्याय देतील अशी अपेक्षाही प्रगती कोळी यांनी व्यक्त केली.
जात पंचायतीच्या जाचामुळे आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या कोळी कुटूंबाशी पोलिस निरीक्षक एस डी सणस यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, ज्या पीडित कुटूंबाने आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. त्यांना ताब्यात घेतले आहे. तसंच त्यांचे समुपदेशन करून त्यांना जात पंचायत आणि सामाजिक बहिष्कारासंबंधी कायद्याची माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांनी फिर्याद दिल्यास या प्रकरणात तातडीने कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एस डी सणस यांनी दिली.
या प्रकरणात पीडित कुटूंबाने न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र प्रशासनाने तातडीने सामाजिक बहिष्कार आणि जात पंचायतीच्या जाचातून पीडित कुटूंबाची मुक्तता करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.