धावांच्या पावसात टीम इंडियाचा शानदार दुसरा विजय
Max Maharashtra | 10 Jun 2019 1:07 PM IST
X
X
भारतात शनिवारी मान्सूनने हजेरी लावली. हे जरी खरं असलं तरी त्याच्या एक दिवसानंतर म्हणजेच रविवारी इंग्लंडमध्ये क्रिकेटपटू बरसले. धावांच्या या पावसात टीम इंडियाने शानदार विजय मिळविला. भारताने ठेवलेल्या 353 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना ऑस्ट्रेलियाला 316 धावाच करता आल्या आणि भारताचा 36 धावांनी विजय झाला.
इंग्लंडमधील ओव्हलच्या मैदानात ढगांनी गर्दी केली खरी पण ते न बरसताच निघून गेले. खऱ्या अर्थाने येथे फलंदाज बरसले. सुरुवात भारतीय फलंदाजांनी केली. नाणेफेक भारताचा कर्णधार विराट कोहलीने जिंकली. त्याने पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारली. त्यानंतर मैदानात रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी पाय ठेवला. सुरुवातीलाच ते फटकेबाजी करतील, असा अंदाज मैदानात जमलेल्या क्रिकेटचाहत्यांना आणि टीव्हीवर सामना बघणाऱ्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना होता. मात्र दोघेही सुरुवातीला खूप शांत आणि संथ खेळले. त्यांनी आधी अंदाज घेतला. नंतर शिखर धवनच्या बॅटमधून वादळी वाऱ्यासारख्या धावा वाहू लागल्या. दुसऱ्या बाजूने रोहित शर्माने क्लासिक फलंदाजी केली. दोघांनीही अर्धशतक केले. सलामीची ही जोडी ऐन रंगात आली असतानाच अखेर वीज कोसळावी, त्या प्रमाणे रोहित शर्माची विकेट कोसळली. तो 57 धावा काढून बाद झाला. त्यानंतर कोहली मैदानात विराट रुप घेऊनच उतरला. कोहलीने धवनला मोलाची साथ दिली. मैदानाच्या चहुबाजुंनी धावांचा पाऊस दोघांनी पाडला. धवनने शतक झळकावले. भारताला सुरक्षित स्थितीत पोहोचवून धवन माघारी फिरला. पण तंबूत पोहोचण्यापूर्वी त्याने 117 धावांची दमदार खेळी केली होती. भारतासाठी अतिशय पोषक स्थिती असतानाच हार्दिक पांड्या वादळाचं रुप घेवून मैदानात आला. त्याने ताबडतोब 48 धावांची खेळी केली अन् तंबूत परतला. दुसऱ्या बाजुने फटके लगावणारा कोहली किल्ला लढवत होता. त्यातच महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. त्यानेही झटपट 27 धावा केल्या अन् तो बाद झाला. दुसरीकडे कोहलीने 82 धावांची कर्णधारपदाला साजेशी अशी खेळी केली. नंतर लोकेश राहुुलनेही 3 चेंडूत एक षटकार अन् एक चौकार लगावत भारतीय डावाचा शेवट गोड केला. अशा प्रकारे भारताने कांगारुंपुढे 352 धावांचा डोंगर उभा केला.
आता ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्वतःला सिद्ध करण्याची वेळ होती. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळताना डोकं जरा जास्तच लावतात. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात याचा अनुभव सर्वांना आला. जिंकण्यासाठी काय आवश्यक आहे, त्याचा हे कांगारू लगेच स्वीकार करतात. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी जो मार्ग अवलंबला बिलकूल त्याच मार्गाने ऑस्ट्रेलियाने डावाला सुरुवात केली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिन्च यांनी डोंगराएवढे आव्हान असूनसुद्धा सावध सुरुवात केली. भारताप्रमाणेच एकदा टिकलं की नंतर फटकेबाजी करण्याचा त्यांचा मनसुबा होता. 50 धावांपेक्षा जास्त भागिदारी त्यांच्यात झाली. यानंतर आता ते आक्रमक खेळणार, असे वाटत असतांनाच फिन्च अडखळला. दोन धावा घेण्याच्या नादात तो धावबाद झाला. क्षेत्ररक्षणात अगदी तैनात असलेला केदार जाधवचा थ्रो ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देणारा ठरला. त्यानंतर कांगारुंचा सर्वात कणखर फलंदाज स्टीव्ह स्मिथ मैदानात आला. वॉर्नर आणि स्मिथ यांनी धावांची शंभरी ओलांडली. वॉर्नरचे अर्धशतक झाले. तेव्हाच यजुवेंद्र चहलने त्याला 56 धावांवर माघारी पाठवले. मग उस्मान ख्वाजा आल्या आल्याच आक्रमक झाला. ताबडतोब 42 धावांची खेळी केली. आता तो अतिआक्रमक होणार, असे दिसताच जसप्रीत बुमराहने त्याला त्रिफळाचित केले. दुसऱ्या बाजुला किल्ला लढवणाऱ्या स्मिथला 69 धावांवर भुवनेश्वर कुमारने पायचित केले. एवढे धक्के बसल्यानंतरही भारतावरचं संकट टळलं नव्हतं. कारण दुसऱ्या बाजुला अॅलेक्स कॅरी मोठ्या जिद्दीने खेळत होता. तो खेळलाही. शेवटपर्यंत किल्ला लढवला. मात्र एक एक करत दुसऱ्या बाजुने ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज बाद झाले. कॅरी 55 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने 316 धावा केल्या. धावांचा मैदानात पाऊस पडला. पण याच पावसात कांगारूंचा 36 धावांनी पराभव झाला. शेवटी भारताच्या खात्यात दुसऱ्या विजयाची नोंद झाली. एकूणच काय, तर सुट्टीचा सुपर संडे कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांसाठी विजयी गुडनाईट म्हणून संपला....
संक्षिप्त धावफलक -
- भारत - 352/5 ( रोहित शर्मा - 57, शिखर धवन - 117, विराट कोहली - 82, हार्दिक पांड्या - 48, महेंद्रसिंग धोनी - 27)
- ऑस्ट्रेलिया - सर्वबाद 316 ( डेव्हिड वॉर्नर - 56, स्टीव्ह स्मिथ - 69, अॅलेक्स कॅरी - नाबाद 55, उस्मान ख्वाजा - 42)
- भारताकडून जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले
- सामनावीर - शिखर धवन
Updated : 10 Jun 2019 1:07 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire