पूजा चव्हाण प्रकरण : संजय राठोड यांचा शक्ती प्रदर्शनाचा डाव अंगलट
पूजा चव्हाण प्रकरणी आरोप झालेले ठाकरे वनमंत्री संजय राठोड यांच्यामुळे आता सरकारची कोंडी झाली आहे. पण आता याप्रकरणी संजय राठोड यांच्यासह सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात कसे उभे राहिले आहे हे सांगणारा कार्यकारी संपादक विलास आठवले यांचा स्पेशल रिपोर्ट...
X
राज्याचे राजकारण सध्या पूजा चव्हाण प्रकरणाने तापले आहे. वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढतो आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर गायब झालेले वनमंत्री संजय राठोड गायब झाले होते. त्यानंतर त्यांनी बंजारा समाजाच्या पोहरादेवीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शन केले. पण आता त्यांचे हे शक्ती प्रदर्शनच त्यांच्या अंगलट आले आहे.
या प्रकरणात ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली आणि संजय राठोड यांच्या अडचणीत वाढ झाली. पूजा बंजारा समाजाचीच असल्यानं बंजारा समाजातही संताप व्यक्त होत होता.
पोहरादेवी इथं गर्दी जमवण्यासाठी आटापिटा?
पोहरा देवी ही संजय राठोड यांच्या मालकीची जागा नाही ती बंजारा समाजाची काशी आहे. या ठिकाणी लोकांना गाड्या पाठवून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री मदन येरावार यांनी केला आहे, ते मॅक्स महाराष्ट्रशी बोलत होते. पोहरादेवी स्थळासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी हातभार लावला असल्याचं ते म्हणाले. पण शक्तिप्रदर्श करण्याची ही जागा नाही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गर्दी न करण्याचं आवाहन करूनही व्हॉटअपवर मेसेज पाठवून गर्दी जमा गेल्याचे केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या मागे ताकद आहे हे दाखवण्यासाठी हा प्रकार केल्याचा आरोपही येरावार यांनी केला आहे. यवतमाळ जिल्ह्यात वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते, मनोहरराव नाईक अनेक वर्ष आमदार होते. हरीभाऊ राठोड आमदार होते. पण असा प्रयत्न कधी कुणी केला नाही असंही ते म्हणाले.
पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण झाल्यानंतर राठोड यांच्या कुटंबात मोठा वाद निर्माण झाला. ते निस्तरण्यासाठी संजय राठोड यांना दहा दिवस समजूत घालावी लागली. तेव्हा कुठे ते पोहरा देवी या धार्मिकस्थळी प्रकट झाल्याचं सांगितलं जात आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांचे कुठे चुकले?
पूजा चव्हाणच्या संशयास्पद मृत्यूनंतर पुणे पोलिसांनी नियमाप्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पण त्यानंतर काही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आणि यात वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमधून होऊ लागला. पण त्यानंतरही पुणे पोलिसांनी FIR दाखल केला नाही फक्त एडीआर दाखल केला. यासंदर्भात आम्ही माजी पोलीस अधिकारी वाय.सी.पवार यांच्याशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, एखादी आत्महत्या झाली तर त्यासंदर्भात एडीआर दाखल केला जातो. पण त्याचा तपास गुन्ह्यासारखाच करावा लागतो. त्या व्यक्तीला आत्महत्या करायला कुणी प्रवृत्त केले आहे का किंवा त्या व्यक्तीचा खून झाला आहे असे तपासात वाटले तर कलम बदलता येते. ऑडिओ क्लीप्स आणि फोटोंचा या प्रकरणात कितपत उपयोग होऊ शकतो या प्रश्नावर ते म्हणाले की, ऑडिओ क्लीप्स किंवा फोटोंमधून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे किंवा आणखी इतर काही सिद्ध कऱणारे पुरावे समोर येत असतील तरच गुन्हा नोंदवता येतो. पण निव्वळ एवढ्या पुराव्यांवर कारवाई होऊ शकत नाही. पण जर तपास अधिकारी प्रामाणिकपणे तपास करत असेल तर त्यातून काहीतरी निष्पन्न होऊ शकते, असेही मत त्यांनी व्यक्त केले. तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर ऑडिओ क्लीपमधील लोकांची चौकशी केली पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले. तसेच आरोप झालेली किंवा त्या प्रकरणात नाव आलेली व्यक्ती मंत्रीपदावर असली तर तपासावर परिणाम होऊ शकतो असेही पवार यांनी सांगितले. तसेच मी तपास अधिकारी असतो तर आधी याप्रकरणातील लोकांची चौकशी केली असती आणि मग गुन्हा दाखल करण्याचा निर्णय त्यानंतर घेतला असता, असेही वाय.सी.पवार यांनी सांगितले.
याचसंदर्भात आम्ही आणखी एक माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांना संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, पोलिसांच्या दृष्टीने अकस्मात मृत्यू म्हणजे जो मृत्यू अनैसर्गिक आहे किंवा ज्या मृत्यूचे कारण समजलेले नाही तो अकस्मात मृत्यू आहे. आता पूजा चव्हाणचा मृत्यू आत्महत्या आहे, अपघाती मृत्यू आहे किंवा खून आहे ही माहिती पोलीस तपासातूनच पुढे येऊ शकले. पण आत्महत्या प्रकरणाचा तपास खुनाच्या गुन्ह्याचा तपास करावा तसाच केला जातो. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना तक्रार केली नाही तरी कुणीही फिर्याद देऊ शकतं किंवा तशी माहिती मिळाली तर तपास करता येतो, असे त्यांनी सांगितले. पण संजय राठोड यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत आम्ही त्यांना विचारले तेव्हा ते म्हटले की, ही घटना घडली तेव्हा संजय राठोड तिथे नव्हते. ते अप्रत्यक्षपणे कसे जबाबदार आहेत, हे तपासात सिद्ध झाले तरच कारवाई होऊ शकते. त्यामुळे त्यांना फार मोठी अडचण येईल असे आता तरी वाटत नाही. भाजप क्लीपच्या पलीकडे काहीच सांगू शकत नाहीये. तसेच आतापर्यंत तपासाबाबत जी माहिती समोर आली आहे किंवा माध्यमांमधून जे समोर येत आहे त्यामध्ये वनमंत्र्यांना गुंतवणारे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत, असे त्यांनी सांगितले. माणसे खोटे बोलू शकतात, पण परिस्थितीजन्य पुरावा खोटे बोलत नाही, असे सांगत त्यांनी तपास योग्य झाला तर सत्य समोर येऊ शकते असे सांगितले. नातेवाईकांनी तक्रार नाही दिली तरी तपासी अंमलदार, राज्य सरकारतर्फे तक्रार नोंदवू शकतात असेही त्यांनी सांगितले.
ऑडिओ क्लीप आणि फोटोंशिवायही आणखी एक पुरावा?
पूजा चव्हाण प्रकरणात सध्या पूजा राठोड हे नावही चर्चेत आले आहे. ६ फेब्रुवारी यवतमाळमध्ये गर्भपात झालेली पूजा राठोड हीच पूजा चव्हाण होती का, अशी चर्चा आता सुरू आहे. यवतमाळ शासकीय रुग्णालयात ६ फेब्रुवारी रोजी पहाटे पूजा अरुण राठोड नावाच्या तरुणीवर गर्भपातासंदर्भात उपचार केल्याची नोंद आहे. हीच पूजा राठोड म्हणजे पूजा चव्हाण आहे असा आरोप केला जातो आहे. हे सर्व संशयास्पद असून त्याचा मानसिक त्रास संजय राठोड यांच्या कुटुंबाला होत आहे, त्याचा खुलासा का ते करत नाहीत असा सवालही मदत येरावार करतात. सोशल मीडियामध्ये ज्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्या आहेत. त्यात संजय राठोड यांचे नाव येत आहे, मग मुख्यमंत्री त्यांना का वाचवत आहे असा सवालही येरावार यांनी विचारला आहे.
डॉ. रोहिदास चव्हाण कुठे आहेत?
ज्या डॉक्टरने पूजा अरूण राठोड हिचा गर्भपात केला ते डॉ. रोहिदास चव्हाण गायब झाले आहेत. ते घरीही सापडत नाहीत आणि हॉस्पिटललाही सापडत नाहीत, चव्हाण नॉटरिचेबल का आहेत असा सवालही ते येरावार करतात. पूजा जेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तेव्हा तिचे आधारकार्ड, रेशनकार्ड दाखवले गेले की नाही, याची तपासणी झाली की नाही हे पोलिसांकडून का तपासले जात नाही असंही ते सांगतात. हॉस्पिटलचे डीन मिलिंद कांबळे यांना या संदर्भात माहिती विचारली असता ते रोहिदास चव्हाण यांना विचारा असे म्हटले. त्यामुळे प्रकरण गंभीर असून संजय राठोड यांनी स्वताहून पुढे वस्तुस्थिती सांगावी असं भाजपच्या नेत्या रेखा कोठेकर यांनी सांगितलं. बजारा समाजाला वेठीला धरून संजय राठोड यांनी सर्व सरकारी यंत्रणाही दबावात ठेवल्याचं हे उदाहण असल्याचं त्या सांगतात.
सरकारचे म्हणणे काय?
पुजा चव्हाण प्रकरणात पुणे पोलिसांकडून तपास सुरू असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. तपास सुरू असून तपासात जो दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असा खुलासा मंत्री अनिल परब यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केला. तपासाची दिशा योग्य नाही, पोलीस तपास नीट होत नाही, असा आरोप भाजप नेते करत आहेत, त्याबद्दल विचारल्यावर अनिल परब यांनी सांगितलं की, "कुणाला दोषी ठरण्याच्या आधीच जर कारवाई केली किंवा राजीनामा घेतला तर योग्य होणार नाही पण दोषी असल्यास कारवाई होणारच मग तो कुणीही असो".
पुणे पोलिसांनी केलेला तपास, विरोधकांचे आरोप, संजय राठोड यांनी केलेले शक्ती प्रदर्शन आणि तज्ज्ञांचे म्हणणे हे सगळे पाहता या प्रकरणात काही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण हिचा मोबाईलवर संजय राठोड नावाने ४५ मिस कॉल होते तरीही पोलीस त्यांची चौकशी का करत नाहीत असा थेट सवाल विचारला आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पूजाच्या फोनमधून आणि लॅपटॉपमधून कोणतीह माहिती समोर आली. पुजाचा मित्र अरून राठोडला पोलिसांनी अटक केली आहे की नाही, अरूण राठोड कुठे आहे, पुजाचा आतेभाऊ विलास चव्हाण कुठे आहे. ज्या आडीओ क्लीप सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्या आहेत त्या तपासल्या का जात नाहीत, यवतमाळ मधील गर्भापात झालेली तरूणी नेमकी कोण आहे, त्या हॉस्पिटलचे डॉ.रोहिदास चव्हाण अचानक रजेवर का गेले, संजय राठोड पंधरा दिवस गप्प का होते, पुणे पोलिस या प्रकरणात माध्यमांसमोर तपासाची प्रगती का सांगत नाहीत, हे प्रश्न आजही कायम आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याआधीच याप्रकरणी सखोल तपास करुन कारवाई केली जाईल असे जाहीर केले आहे. पण एखाद्या मंत्र्यांचे नाव तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात येते, तो मंत्री १५ दिवस गायब होतो आणि कोरोनाचे सर्व नियम धुडकावून शक्ती प्रदर्शन करत तो मंत्री माध्यमांसमोर येतो. ऐन अधिवेशनाच्या तोंडावर सरकारच्या अडचणी संजय राठोड यांच्यामुळे वाढल्या असतानाही मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतलेला नाही, यावरुन आता त्यांच्यावरच दबाव आहे का असा सवालही विरोधक उपस्थित करत आहेत.