जीव धोक्यात घालून नागरिक करतायेत नदी पार, आमदार म्हणाले शरद पवारांना सांगितलंय...
जीव धोक्यात घालून नागरिकांचा प्रवास, आमच्या आज्या-पंज्यांचे आयुष्य गेले तरीही पूल झाला नाही शेतकऱ्यांची खंत. आमदार सांगतात शरद पवारांकडे केलीय मागणी...
X
सोलापूर : आमचे आयुष्य गेले आमच्या आज्या-पंज्यांचे आयुष्य गेले तरीही पुलाचे काम झाले नाही. अशी खंत दररोज भोगावती-नागझरी नदी पार करून जाणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून नदी पार करावी लागते. शासनाकडे पुलाची मागणी केली परंतु शासन मनावर घेत नाही. वस्तीवरील शेतकऱ्यांना जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी वाळूज गावात यावे लागते. जास्त पाणी आले तर नदी पार करता येत नाही.
या जीवघेण्या प्रवासाला कंटाळलो असून नदीवर पूल बांधण्याची मागणी अनेक वर्षांपासून करीत असतानाही पूल बांधला जात नाही. नदी पार करीत असताना मोठी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन घेईल का? असा प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत.
वाळूज ता.मोहोळ, जि. सोलापूर या गावाच्या पूर्व दिशेला नागझरी व भोगावती नद्यांचा संगम असून नद्या गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर आहेत. सध्या या नद्यांना पूर आला असून नदी पलीकडील जाधव वस्तीवर सुमारे २५० ते ३०० कुटुंबे रहायला आहेत.
नदीला पूर आल्यास या वस्तीवरील नागरिकांचा संपर्क तुटतो. वस्तीवर राहणाऱ्या लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला असून शेतकरी जीव धोक्यात घालून नदी पार करीत आहेत. त्यांच्या व्यथा कोणीही एकूण घ्यायला तयार नाहीत असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
महिला ही जीव धोक्यात घालून करतात नदी पार…
वाळूज गावात जाण्यासाठी महिला या पुरुषांबरोबर नदीच्या पाण्यातून वाट काढत गावात येतात. गावातील कामे उरकून त्या पुन्हा नदीच्या पाण्यातून वस्तीवर जातात. महिला लहान मुले, पुरुष सतत या पाण्यातून ये-जा करीत असल्याने मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास याची जबाबदारी शासन घेईल का? त्यासाठी शासनाने आम्हाला पूल बांधून द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करीत आहेत.
नदी पार करत असताना डोक्यावर बांधली जाते भाकरी…
येथील शेतकरी, शेतमजूर नदीपार करीत असताना दुपारच्या सुट्टीत खाण्यासाठी आणलेली भाकरी टॉवेल च्या साह्याने डोक्यावर बांधून नदी पार करतात. या पाण्यात काही ठिकाणी काटेरी झुडपांच्या फांद्या वाहून आल्या आहेत. त्याचे काटे पायात रुतल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पायांना इजा झाली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. पाण्यातून साहित्य पलीकडे नेताना शेतकऱ्याचे मोठे हाल होत आहेत. त्यासाठी आम्हाला शासनाने पूल बांधून द्यावा अशी आर्त हाक शेतकरी देऊ लागले आहेत.
स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत या नदीवर नाही पूल
या नदीतून साखरेवाडी या गावाकडे जाणारा रस्ता असून स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत या नदीवर पूल बांधला गेला नाही. असे तेथील शेतकरी सांगतात. नदीला पाणी आले की, या वस्तीवरील कुटूंबाचा संपर्क तुटतो. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी २० किलोमीटरचे अंतर कापून वाळूज या गावी यावे लागते. नदीला पाणी येऊन १५ दिवसाचा कालावधी उलटला आहे. या पाण्यातून वाट काढत ये-जा करावी लागते असे शेतकरी सांगत आहेत. दररोज कपडे ओले होतात. पाण्याचा प्रवाह जास्त असून त्यातूनही नाईलाजस्तव मार्ग काढत वस्तीवर जावे लागते.
नदीला पाणी आल्यास २० किलोमीटरचे अंतर कापून वस्तीवर जावे लागते
नदीला मोठा पूर आल्यास वैराग-शेळगाव-कौठाळी असे २० किलोमीटरचे अंतर कापून वस्तीवर जावे लागते. असे शेतकरी तुकाराम कादे यांनी सांगितले. वस्ती तर वाळूज गावातून नदीपलिकडेच आहे. त्यासाठी पाच मिनिटं लागतात. नदीला पाणी आल्यास आम्हाला २० किमीचा प्रवास करावा लागतो. जाण्या-येण्यासाठी आम्हाला फार मोठी अडचण असून भोगावती व नागझरी नदी पार करून आम्हाला जावे लागते. आज ३० वर्षे झाले आम्ही शासनाकडे पूल बांधून देण्याची मागणी करत आहोत. परंतु आमच्याकडे कोणीही लक्ष देईना गेले आहे.
या वस्तीवर २५० ते ३०० घरे असून नदीला पाणी आल्यास शिक्षण घेणाऱ्या मुलांचे नुकसान होते. शासनाकडे पुलाची मागणी केली असून त्यासाठी नुसता होकार दिला जातो. असे कादे यांनी सांगितले.
मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना शेतकरी शिवाजी कादे यांनी सांगितले की, वाळूज गावाच्या पूर्व दिशेला नागझरी आणि भोगावती या नद्यांचा संगम असून नदी पलीकडील वस्तीवर, शेतात जाण्या-येण्यासाठी पूल करावा. अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही करत आहोत. परंतु अद्यापही एकाही आमदार, खासदारांनी याकडे लक्ष दिले नाही.
आजपर्यंत कित्येक निवडणुका आल्या-गेल्या प्रत्येकांनी पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले. पण ते पाळले नाही. या नदीच्या पलीकडे जाधव वस्तीवर सुमारे ७०० ते ८०० लोकांची लोकवस्ती असून नदीला पाणी आल्यास या लोकांचा संपर्क तुटतो. वाळूज गावात यायचे असेल तर २० किमीचा प्रवास करून यावे लागते. नदीत पाणी कमी असेल तर गळाभर पाण्यातून महिलाही वाट काढत नदी पार करतात. यातून मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? यासाठी शासनाने आम्हाला पूल बांधून द्यावा. ही विनंती असे शेवटी कादे यांनी सांगितले.
पुलासाठी महिन्याभरापूर्वी केली शरद पवारांकडे मागणी: आमदार यशवंत माने
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गेल्या महिन्याभरापूर्वी या पुलाची मागणी केली असून तो उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे. या पुलाचे काम मुख्यमंत्री निधीतुन करण्यात यावे. अशी मागणी असून या पुलाचे काम लवकरच मार्गी लागेल अशी आशा आहे. अशी माहिती आमदार यशवंत माने यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितली.