Home > मॅक्स रिपोर्ट > Gound Report : मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा का बनला?

Gound Report : मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा का बनला?

मुंबई-गोवा महामार्गाच्या दूरवस्थेचा प्रश्न दरवर्षी गणेशोत्सव आला की ऐरणीवर येतो आणि पुन्हा थंड होतो...पण हा महामार्ग मृत्यूचा सापळा का बनला आहे, या महामार्गाच्या दुरवस्थेची कारणं काय आहेत हे दाखवणारा आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांचा ग्राऊंड रिपोर्ट....

Gound Report : मुंबई-गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा का बनला?
X

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 12 वर्षांपासून रेंगाळत सुरु आहे. 12 वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातात अडीच हजार निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. अनेकजण विकलांग झाले आहेत. आता गणेशोत्सव तोंडावर आला आहे, अशातच महामार्गाची प्रचंड दूरवस्था झाली आहे. चाकरमानी, गणेशभक्तांचा प्रवास आदळत-आपटत होणार आहे. खड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे ओळखणे कठीण झालं आहे. प्रवासी व वाहन चालकांचे अतोनात हाल होत आहेत.


मे महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश ठिकाणी डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र आता नवीन मार्गावर पावसामुळे पुन्हा एकदा खड्डे पडले आहेत, त्यामुले रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालक व प्रवाशांना खड्ड्यातुन प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवताना होणार्‍या अपघाती घटनांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवितांना अडथळा येतो. या मार्गावरील हेलकावे देत होणारा प्रवास म्हणजे जणू नौका नयनातील प्रवासाची अनुभूती मिळते.


पावसामुळे या मार्गावर आता काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही जास्त आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने मोटारसायकलस्वार कोसळण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. तसेच मोठ्या खड्यांमध्ये वाहन आपटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. मागील वर्षी देखील या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. यावर्षी काही ठिकाणी रस्ता अजुन सुस्थितीत आहे. परंतू कामाचा निकृष्ट दर्जा, अवजड वाहने आणि मुसळधार पावसात या रस्त्याचा देखील टिकाव लागणार नाही. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे.



मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातीची ठिकाणे कोणती?

खारपाडा ब्रिज, खरोशी फाटा, तरणखोप, रामवाडी, वाशीफाटा, उचेडे, डोलवी, गडब, कासू, आमटेम, पेण फाटा ते अंगार आळी, सुकेळीखिंड, तळवली, पुई, मुरावली, कशेणे, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव पेट्रोलपंप , गोरेगाव बस स्थानक, लोणेरे बस स्थानक, टेमपाले ते लाखपाले - पहेल महामार्ग, गांधारपाले, वीर, वीरफाटा, चोळई, धामणदेवी, लोहारे, पार्ले, चारफाटा, तिनविरा, तासगाव



अपघात का होतात?

ठिकठिकाणी गावांजवळ बायपास पुलाचे काम सुरु आहे. अर्धवट कामामुळे प्रवासी व वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. या मार्गावर जीवघेण्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीने प्रवासी व वाहनचालक रडकुंडीला येत आहेत.

त्याचबरोबर पावसाळ्यात महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी बारीक खडीचा वापर केला होता. पण पाऊस थांबून उन पडले की धुळीचा त्रास होतो. याचा त्रास वाहन चालक, दुचाकीस्वार व प्रवाशांना होत आहे. तसेच महामार्गाशेजारील दुकानदार, हॉटेल व्यावसायिक व रहिवाशी देखील यामुळे त्रस्त झाले आहेत. ही धूळ इतक्या मोठ्या प्रमाणत उडते की बऱ्य़ाचदा समोरून येणारे वाहन देखील दिसत नाही, अशी तक्रार काही प्रवाशांनी केली. त्यामुळे अपघात होण्याचा धोका आहे. हा धुरळा वाहन चालक आणि प्रवाशांच्या अंगावर बसतो, नाका-तोंडात जातो. त्यामुळे अनेकांना श्वसनाचा त्रास झाला आहे.



या मार्गावरुन नियमितपणे प्रवास करणारे रामदास कळंबे यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, पावसाळ्यापूर्वी काही प्रमाणात हा मार्ग सुस्थितीत होता. परंतु पावसामुळे पुन्हा या मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे या महामार्गावरुन प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. उन्हाळ्यात बरीचशी अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करणे आवश्यक होते. तसेच केलेली काम देखील दर्जेदार हवी होती. परंतू तसे न झाल्याने या वर्षी देखील नाईलाजाने खड्यांमधून प्रवास करावा लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

"समृद्धी महामार्ग मागून येऊन पूर्ण झाला, पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मार्गांचे काम पूर्णत्वास आले. मात्र 12 वर्ष झाली, हजारो निष्पाप जीवांचे बळी गेले, मात्र अजूनही हा मार्ग सुस्थितीत येत नाही, हे आमचे दुर्दैव, सरकारने कोकणवासीयांचे दुःख जाणावे व लवकरात लवकर हा मार्ग प्रवासासाठी सुखकर व सुरक्षित करावा" अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना केली आहे.

अवजड व मोठी वाहने कारणीभूत

महामार्गावर मोठ्या प्रमाणात अवजड व मोठ्या वाहनांची वाहतूक चालते. या वाहनांची चाके जास्त व अधिक मोठी असतात. त्यामुळे खड्डे आणि खराब रस्त्यावरुन ती गेल्यास खुप धुरळा उडतो. परिणामी या वाहनांच्या पाठीमागे व शेजारून जाणाऱ्या छोट्या वाहनांना आणि दुचाकीस्वारांना प्रचंड त्रास होतो.

अधिक खड्डे कुठे?

महामार्गावर अनेक ठिकाणी लेनचे काम करण्यासाठी रस्ता दुभागण्यात आला आहे. ज्या ज्या ठिकाणी अशाप्रकारे रस्ता दुभागण्यात आला आहे, तेथे खड्डे पडले आहेत. किंवा तेथील खडी व डांबर निघाले आहे. त्यामुळे अशा दुभाजकाच्या मार्गावरुन जातांना वाहन चालकांची गैरसोय होते. तसेच अनेकवेळा वाहन येथून घसरतात व अपघाताचा धोका निर्माण होतो.




महामार्गावर अनेक ठिकाणी पक्की साईड पट्टीच नाहीये. अनेक ठिकाणी साईड पट्टीवर खड्डे पडले आहेत, चिखल झाला आहे. तर काही ठिकाणी गवत उगवले आहे. यामुळे महामार्गावर वाहनचालकांना गाडी रस्त्याच्या शेजारी नेतांना अडचण येते. बऱ्याचवेळा ओव्हरटेक करतांना या साईड पट्टीवर वाहने कलंडून अपघात होतो.

रिफ्लेक्टर आणि पांढरे पट्टे नाही

चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने या मार्गावर पांढरे पट्टे किंवा रिफ्लेक्टर बसविले गेलेले नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नाही. पावसाळ्यात तर वाहनचालकांना रस्ता दिसत नाही. त्यामुळे अनेक वेळा अपघात घडतात.


प्रकल्प संचालकांचे म्हणणे काय?

"मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण प्रक्रियेचे काम सुप्रीम पनवेल इंदापूर लिमिटेड डी ओ टी ऑपरेटर यांच्यामार्फत बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर सुरू आहे. या कंपनीसाठी जे.एम म्हात्रे, रामेश्वर कंस्ट्रक्शन व एम डी कन्स्ट्रक्शन हे सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करीत आहेत. सुप्रीम पनवेल इंदापूर लिमिटेडकडे सध्या निधीची कमतरता भासत आहे, त्यामुळे महामार्ग चौपदरीकरणाचे काम रखडले आहे" अशी माहिती प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्रशांत फेगडे यांनी दिली आहे.

यासंदर्भात आम्ही रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांना संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की, "लोकसभेच्या अधिवेशन काळात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दूरवस्थेबाबत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्गाच्या देखभाल दुरुस्ती बाबत लक्ष वेधले. त्यानंतर महामार्गाच्या सुधारणेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला. पाऊस असल्याने महामार्ग दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. तर काही ठिकाणी काम सुरू आहे. गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमानी व नोकरदार वर्गाचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Updated : 9 Sept 2021 5:23 PM IST
Next Story
Share it
Top