शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे रस्त्या अभावी नागरिकांची गैरसोय...
रस्ते विकासाची साधने मानली जातात. जर रस्ते चांगल्या प्रकारचे असतील तर वाहतूक वेगवान आणि जलद होते. हेच रस्ते खराब आणि खड्डे युक्त असतील तर अपघाताचे प्रमाण वाढून नागरिकांची गैरसोय होते, प्रतिनिधी अशोक कांबळेचा ग्राऊंड रिपोर्ट
X
रस्ते विकासाची साधने मानली जातात. जर रस्ते चांगल्या प्रकारचे असतील तर वाहतूक वेगवान आणि जलद होते. हेच रस्ते खराब आणि खड्डे युक्त असतील तर अपघाताचे प्रमाण वाढून नागरिकांची गैरसोय होते, प्रतिनिधी अशोक कांबळेचा ग्राऊंड रिपोर्ट
रस्त्या अभावी अनेक समस्या उभ्या राहतात. आजारी रुग्णास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. त्यामुळे कदाचित त्या रुग्णाला जीवितास मुकावे लागते. अशा प्रकारच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत. खराब रस्त्यामुळे निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी ना प्रशासन घेते,ना शासन. उत्तर सोलापूर तालुक्यातील तिर्हे - शिवणी - पाकणी या रस्त्याची दुरवस्था झाली असून गेल्या दोन ते तीन महिन्यापासून रस्ता उकरून ठेवला आहे. या रस्त्यावरून जात असताना शाळकरी विद्यार्थी गाडीवरून पडल्याने जखमी झाला आहे,तर एक वयस्कर आजी जखमी झाली आहे. रात्रीच्या वेळेत येणाऱ्या नागरिकांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे शिवणी गावचे ग्रामस्थ सांगतात. येणाऱ्या काळात अपघाताच्या घटना वाढू नये,यासाठी रस्त्याच्या दुरवस्थेला कंटाळून शिवणी गावातील नागरिकांनी प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष विशाल सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला काळे फासून निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या काही दिवसात तिर्हे-शिवणी- पाकणी या रस्त्याचे काम लवकर नाही झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यांवर खडीचे ढिगारे पडून
तिर्हे-शिवणी- पाकणी या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून रस्त्याच्या कामासाठी ढिगारे टाकण्यात आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वाहन धारकाना वाहन चालवण्यास अडथळा निर्माण झाला आहे. याच बरोबर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डी वर आली असून त्यामुळे गाडी चालवत असताना गाडी चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जात असताना अनेक जणांचे अपघात होवून जखमी झाले आहेत. या रस्त्याचे काम लवकरात-लवकर करण्यात यावे,यासाठी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही रस्त्याचे काम केले जात,नसल्याने शिवणी गावचे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. येणाऱ्या काळात हा रस्ता लवकर दुरुस्त नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.
एमआयडीसीच्या आसपास असणाऱ्या परिसरातील रस्ता असल्याने यावरून सातत्याने होते वाहतूक
तिर्हे-शिवणी-पाकणी गावातून जाणारा रस्ता चिंचोली काटी येथील एमआयडीसीत असणाऱ्या कंपन्यांना जातो. या कंपन्यांत कामाला जात असताना आजूबाजूच्या गावातील लोक याच रस्त्याचा उपयोग करतात. त्यामुळे हा रस्ता रहदारीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो. याच रस्त्यावरून लहान वाहने सातत्याने जात असतात. त्याचबरोबर शाळकरी विद्यार्थी आणि कॉलेजला जाणारे विद्यार्थी याच रस्त्याचा उपयोग करतात. या रस्त्यावरून जात असताना असताना शाळकरी विद्यार्थी जखमी झाला असून तसेच एक महिला ही जखमी झाली आहे.
शिवणी गावच्या ग्रामस्थांची स्थिती इकडे आड तिकडे विहीर
तिर्हे-शिवणी-पाकणी या रस्तावर तिर्हे आणि पाकणी या दोन गावांच्या मध्ये शिवणे गाव असून या गावातील नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेचा त्रास जास्त प्रमाणात सोसावा लागत आहे. सध्या पावसाळा सुरू असून या रस्त्यावरून जात असताना अनेकदा गाड्या स्लीप झाल्या आहेत. पावसाळा संपत आला तरी रस्त्याचे काम पूर्ण होत नाही. त्यामुळे ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत. या गावची लोकसंख्या सातशेच्या आसपास असून त्यांची रोजीरोटी शेती या व्यवसायावर चालते. शेतात जात असताना ग्रामस्थ याच रस्त्याचा वापर करतात. यावर खडीचे ढीग टाकल्याने याचा त्रास शेतातील माल मार्केटला पाठवता जात असताना शेतकऱ्यांना होत आहे. अनेकदा शेतातील माल खराब होत असून या रस्त्यावरून जात असताना शेती मालाच्या गाड्या आदळत जात असल्याने शेती मालाला हानी पोहचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली आहे.
रस्त्याच्या प्रश्ना विषयी प्रहार संघटनेच्या वतीने आंदोलन
रस्त्याच्या प्रश्नावरून प्रहार संघटनेच्या वतीने सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या कार्यालयावर शाई फेकून निषेध व्यक्त केला. येत्या काही दिवसात रस्त्याचे काम चालू नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
कार्यकारी अभियंता नॉट रीचेबल
उत्तर सोलापूर तालुका सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता जेऊरकर यांच्याशी रस्त्याच्या कामासंबधी फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते नॉट रीचेबल असल्याचा मेसेज येत होता.