Home > मॅक्स रिपोर्ट > शासकीय दवाखाने की मृत्यूची ठिकाणे

शासकीय दवाखाने की मृत्यूची ठिकाणे

शासकीय दवाखाने की मृत्यूची ठिकाणे
X

सर्वसामान्यांसाठी शासकीय दवाखाने हा सर्वात शेवटचा आशेचा किरण आहे. खासगी दवाखान्यांमधील महागडे उपचार परवडत नाहीत, त्यामुळं शासकीय दवाखान्यांमध्ये उपचार घेण्यावरच सामान्यांचा भर असतो. मात्र, आता याच दवाखान्यांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांच्या मृत्यूचे आकडे पाहिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतो की हे शासकीय दवाखाने आहेत की मृत्यूची ठिकाणे आहेत.

ठाणे महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात ऑगस्ट २०२३ मध्ये ४८ तासातच १८ रूग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर एकूणच शासकीय रूग्णालयातील आरोग्य सेवेवर प्रश्नचिन्हं उभं करण्यात आलं होतं. मात्र, एक महिन्याचा कालावधी उलटत नाही तोच मराठवाड्यातील नांदेड शहरातल्या श्री. शंकरराव चव्हाण शासकीय रूग्णालयात २४ तासात २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. त्यात आणखी ७ रूग्णांची भर पडलीय. त्यामुळं आता मृतांचा आकडा हा ३१ झाला आहे.

नांदेडच्या या दुर्घटनेची दखल देशपातळीवर घेण्यात आलीय. राहुल गांधी, प्रियंका गांधी, जयराम रमेश यांच्यासह राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही याप्रकऱणी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील यावर ट्वीट केलंय. त्यानी म्हटले आहे की महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात औषधे नसल्याने २४ रूग्णांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. भाजप सरकार आपल्या प्रसिद्धीवर हजारो कोटी रुपये खर्च करते, पण मुलांच्या औषधांसाठी पैसे नाहीत ? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाही नसल्याची घणाघाती टीका राहुल गांधी यांनी ट्वीट करत केली आहे.

औषधांच्या तुटवड्यामुळे निरपराधात नागरिकांचा बळी जात असून नांदेड सारख्या घटनांना सर्वस्वी सरकार जबाबदार आहे. आयुष्मान भारत आणि आपला दवाखाना या सगळ्याचा फायदा काय ? असा सवाल थेट अंबादास दानवे यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान, नांदेडमधील रूग्णांच्या मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. औषध किंवा उपचारामध्ये कुठलीही कमतरता केली नसल्याचं रूग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. जर औषधे आणि उपचार केले असतील तर ३१ रूग्णांचा मृत्यू कशामुळं झालाय, हा प्रश्न उपस्थित होतो.


Updated : 3 Oct 2023 7:53 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top