Home > मॅक्स रिपोर्ट > बंदिस्त शेळी पालनाच्या उत्पन्नातून शेतकरी वर्षाला कमावतोय दोन लाख रुपये

बंदिस्त शेळी पालनाच्या उत्पन्नातून शेतकरी वर्षाला कमावतोय दोन लाख रुपये

शेती आणि पुरक (agriculture and alllied business) धंद्यामधे बदल होत असून गोपालनाबरोबरच बंदीस्त शेळीपालनातून आर्थिक उन्नती साधण्यात आली आहे. दोन शेळ्यांपासून केलेली

बंदिस्त शेळी पालनाच्या उत्पन्नातून शेतकरी वर्षाला कमावतोय दोन लाख रुपये
X

सोलापूर जिल्ह्यात शेती क्षेत्रात विविध प्रयोग होत आहेत. शेतकरी शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून पशुपालन हजारो वर्षापासून करत असल्याचे पुरावे इतिहासात सापतात. परंतु काळानुसार यामध्ये बदल झाला असल्याचे दिसते. या पशुपालनात शेळ्या,मेंढ्या, देशी गाई,जर्सी गाई,कुकुट पालन यांचा समावेश होतो. या पशुपालन व्यवसायातून शेतकरी वर्षाला लाखो रुपये कमवतात. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. आता या पशुपालन व्यवसायात ही नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. काही शेतकरी पारंपरिक पद्धतीने देशी गाई पाळत होते. त्यांची संख्या घटून त्यांच्या जागी जास्त दूध आणि जास्त पैसा मिळवून देणाऱ्या जर्सी गाईंच्या पालनाकडे सध्या शेतकरी वळला आहे. त्याच्यातून त्यांना आर्थिक फायदा होत आहे. याचबरोबर शेतकरी म्हशीचे पालन ही करत आहे. जर्सी गाईंच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधाला जास्त किंमत आहे. जर्सी गाईपेक्षा म्हैस कमी दूध देते परंतु म्हशीचे दूध खाण्यासाठी पोषक असल्याचे समजले जाते. या गाई म्हशीच्या पशुपालनातही ब्रिडिंग होवू लागले आहे. आता वेगवेगळ्या शेळ्यांच्या जातीची क्रॉस पैदास सुद्धा सुरू आहे. असाच प्रयोग पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या गावातील शेतकरी दत्तात्रय बागल यांनी केला आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीच्या शेळी पालनाला फाटा देत. क्रॉस पद्धतीच्या शेळ्याची पैदास केली आहे. सुरुवातीला दोन शेळ्यांवर सुरू केलेले बंदीस्त शेळी पालन आता 50 ते 55 शेळ्यापर्यंत येऊन ठेपले आहे. दिवसेंदिवस या शेळ्यात वाढ होत आहे. क्रॉस पैदास केलेल्या बोकड अथवा शेळ्यांच्या पिलांची विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. यातून त्यांना वर्षाकाठी 2 लाख रुपयांच्या आसपास फायदा होत आहे. सध्या त्यांच्या बंदीस्त शेळी पालनाला अनेक शेतकरी भेट देऊन त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत.





दोन शेळ्यांवर बंदिस्त शेळी पालनाची केली सुरुवात

शेतकरी दत्तात्रय बागल गेल्या 7 ते 8 वर्षापासून शेळी पालन करत असून सुरुवातीला 2 देशी शेळ्यांवर बंदीस्त शेळी पालन सुरू केले होते. त्यांनी प्रयोग म्हणून क्रॉस शेळी पालन करायचे ठरवून त्यासाठी एक शिरोळ जातीचे बोकड विकत आणले. त्यापासून शेळ्यांची क्रॉस पैदास करण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्याकडे लहान-मोठ्या मिळून 50 ते 55 शेळ्या आहेत. त्यांनी आतापर्यंत 70 ते 75 शेळ्या बाजारात विकल्या आहेत. या शेळ्यांच्या पैश्यावर त्यांनी शेळ्यांसाठी बंदिस्त शेड उभे केले असून ते 50 बाय 30 चे आहे. त्यांच्या या शेडमध्ये बोर क्रॉस,शिरोळ क्रॉस,सोजत क्रॉस अश्या तीन प्रकारच्या शेळ्या आहेत. त्यांनी आता शेळ्यांच्या ब्रिडिंगसाठी अहमदनगर वरून बिटल जातीचे 40 हजार रुपयाला बोकड विकत आणले आहे. त्यापासून क्रॉस शेळी पैदास केली जाणार असून त्यातून चांगले पैसे मिळतील,अशी आशा शेतकरी दत्तात्रय बागल यांना आहे. बंदिस्त शेळी पालनातून क्रॉस पैदास झालेली पिल्ल सद्या सुदृढ आहेत. त्यांना एक प्रकारची चमक प्राप्त झाली आहे. देशी शेळ्यांच्या तुलनेत त्यांच्या शेळ्यांची दीड ते दोन पट्टीने वाढ झाली आहे.





शेळ्यांना वेळेवर वैरण आणि पाणी दिले जाते

शेळ्यांच्या खाण्या-पिण्याची सुरुवात सकाळी 6:30 ते 7 वाजल्यापासून सुरू होते. सकाळी शेळ्यांना मका आणि पेंड खण्यासाठी ठेवली जाते. मोठ्या शेळ्यांना साधारण 200 ग्रॅम खाद्य तर लहान पिल्लांना 100 ग्रॅम खाद्य ठेवले जाते. ते ठेवत असताना विभागून ठेवले जाते. जेणेकरून शेळ्या व लहान पिल्लं एकमेकांचे अन्न खाऊ नये. हा यामागचा उद्देश आहे. सकाळी गोठा साफ केला करून सकाळी 8:30 वाजण्याच्या दरम्यान शेळ्यांना चारा टाकला जातो. त्याचदरम्यान त्यांना पिण्यासाठी पाणी दिले जाते. परत 11:30 वाजता आणि दुपारी 1:30 वाजता चारा टाकला जातो. त्यानंतर शेतकरी दत्तात्रय बागल शेळ्यांना चारा टाकत नाही. पुन्हा दुसऱ्याच दिवशी शेळ्यांना चारा टाकला जातो.

शेळ्यांचे रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी लसीकरण आणि कीटकनाशकांचा केला जातो वापर





शेळ्यांचे विविध रोगापासून संरक्षण व्हावे,यासाठी जसा ऋतू बदलेल त्याप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतूच्या सुरुवातीला शेळ्यांना लसीकरण केले जाते. दर 3 महिन्याला शेळ्यांना जंतांचे औषध पाजले जाते. तसेच शेळ्यांची वाढ चांगली व्हावी यासाठी दर 10 ते 15 दिवसाला कॅल्शियम पाजले जाते. बंदिस्त शेळी पालन असल्याने शेळ्यांना झाडपाल्यापासून मिळणारे कॅल्शियम मिळत नाही. त्याची झीज भरून काढण्यासाठी शेळ्यांना कॅल्शियमचा डोस दिला जातो. बंदिस्त शेळी पालन करत असताना चाऱ्याचे नियोजन करावे लागते. या चाऱ्यातून शेळ्यांना सगळेच पोषणतत्वे मिळत नाहीत. त्यामुळे त्यांना कॅल्शियम देने आवश्यक असते. शेळ्यांना रोगाची लागण होऊ नये,यासाठी शेळ्यांच्या गोठ्यात नाममात्र कीटकनाशकांची फवारणी केले जाते. फवारणी करत असताना शेळ्यांची लहान पिल्लं बाहेर काढली जातात. फवारणीच्या 2 तासाच्या वेळेनंतर त्यांना गोठ्यात सोडले जाते. या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे कीडा,मुंगी,गोचीड यांचा नायनाट होतो.

शेळ्यांची विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जाते

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी दत्तात्रय बागल यांनी सांगितले,की या क्रॉस पैदास शेळ्यांची विक्री ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. मी अनेक व्हाट्सएप ग्रुपला ऍड असून शेळी किंवा बोकड विकायचे असल्यास त्याची माहिती या ग्रुप आणि फेसबुकवर टाकतो. शेळीच्या पिलांचे 30 किलोपर्यंत वजन होईपर्यंत पिल्ल विकली जात नाहीत. शेळीची मादी 350 रुपये किलोने तर नर जातीच्या बोकडांची विक्री 400 रुपये किलोने विक्री केली जात आहे. बोकडाच्या विक्रीतून 12 हजार रुपये मिळतात तर मादीच्या विक्रीतून 11 हजार रुपयांच्या आसपास पैसे मिळतात. माझ्याकडील जास्त नर शेळ्यांच्या ब्रिडिंगसाठी विकले जातात. शेळी पालन आता पारंपरिक पद्धतीचे राहिलेले नाही. पूर्वी शेती रिकामी होती. त्यामुळे शेळ्यांना फिरवता येत होते. आता पडीक जमीन सुद्धा राहिली नाही. त्यामुळे बंदिस्त शेळी पालन करणेच या काळात योग्य आहे. शेळ्यांच्या लेंडी खताच्या शेतीसाठी उपयोग होत असून शेती सुपीक होण्यास याची मदत झाली आहे. लेंडी खताची किंमत बाजारात एक ट्रेलर सुमारे 25 हजार रुपयाला विकला जातो. या बंदिस्त शेळी पालनातून वर्षाला 2 लाख 50 हजार रुपयांचा फायदा होत असून वरचे 50 हजार रुपये शेळ्यांची औषधें,डॉक्टर, मका,पेंड व इतर खाद्यासाठी खर्च होतात. तर वर्षांला निव्वळ 2 लाख रुपयांच्या आसपास फायदा होतो. त्यासाठी शेतकऱ्यांने बंदिस्त शेळी पालनाचा विचार करावा,असे शेतकरी दत्तात्रय बगल यांना वाटते.

Updated : 5 Jun 2022 6:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top