गांजा लावण्याची परवानगी दिली नाही तर १६ सप्टेंबर ला गांजा लावणार, शेतकरी संतापला...
X
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने सोलापूर जिल्ह्यातील मौजे शिरापूर (सो) ता. मोहोळ येथील शेतकरी अनिल पाटील यांनी दोन एकर शेतीमध्ये गांजा लावण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
अनिल पाटील यांना वारसाहक्काने मिळालेली साडेचार एकर शेती असून गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करत आहेत. त्यांचे वय ५३ असून त्यांना दोन मुले आहेत. सध्या मुले बेरोजगार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे स्वतःचे शिक्षण ३ री पर्यंत झाले आहे. शेती तोट्यात जात असल्याने त्यांच्यावर ४ लाख रुपये कर्ज झाले आहे. या कर्जाचे व्याज भरून त्यांना नाकीनऊ आले असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माझी शिरापूर सोसायटी येथे स्वतःच्या मालकीची २ एकर शेती असून तिचा गट नंबर १८१/४ आहे.
मी कोणतेही पीक केले तरी त्याला शासनाचा हमीभाव मिळत नसल्याने शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील शेतीच्या उत्पन्नातून निघत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे बील देखील लवकर मिळत नाही.
त्यामुळे गांजाला चांगला भाव मिळत असल्यामुळे मला माझ्या २ एकर शेतीमध्ये दि.१५ सप्टेंबर २०२१ पर्यंत लेखी परवानगी द्यावी. अन्यथा १६ सप्टेंबर २०२१ या तारखेपासून आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली. असे गृहीत धरून मी लागवड सुरू करणार आहे. माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.
लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत का?
कोरोना महामारीमुळे शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे. सध्या टोमॅटो, कोबी व इतर भाज्यांना कवडीमोल दर आहेत. त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या जीवनावर झाला असल्याचे पाहायला मिळते. शेतकऱ्यांनी शेतीसाठी लाखो रुपये खर्चून ही त्याचा खर्च निघत नाही. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हॉटेल व्यवसाय व आठवडी बाजार बंद असल्याने त्याचा परिणाम शेतीमालावर झाला का?
कोरोनामुळे हॉटेल व्यवसाय व गावोगावचे आठवडी बाजार बंद असल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीमालावर झाला असल्याचे सांगण्यात येते. तसेच शहरातील भाजी विक्रेत्यांवर बंधने असल्याने शेतीमालाला मागणी कमी प्रमाणात आहे असे अनेकांना वाटते.
शेतकरी अनिल पाटील यांच्याशी बातचीत करताना त्यांनी सांगितले की, २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले असून मला २ एकर गांजा लावायची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
का दिलं निवदेन?
निवेदन देत असताना मला असा विचार आला की, सध्या शेतीमालाला भावच नाही. टोमॅटो, वांगी करावी किंवा कोणतेही १८ पगड जातीची पिके केली तर त्यांना भावच नाही. ऊस शेतात करून कारखान्याला घालवला तर सरकार, कारखानदार पैसे लवकर देत नाहीत. गेल्या वर्षी माझ्या गट नंबर २८१/४ या २ एकर शेतात केळीची लागण केली होती. ही केळी ५० पैसे दराने लॉकडाऊनमध्ये कोणी घ्यायला तयार नव्हते.
या केळी च्या लागवडीसाठी मला साडेचार लाख रुपये खर्च आला होता. ही केळी मी राजस्थान च्या गुरेवाल्यांना दिली. मी या केळी मुळे साडेचार लाख रुपयाला झोपलो आहे. आज माझी २ एकर शेती पडीक असून ती नीट करायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही. माझ्याकडे २ एकर ऊस आहे. त्यालाही कारखानदार लवकर पैसे देत नाहीत. मग शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची का? माझी २ एकर शेती पडीक आहे तर काय करावे? असा विचार डोक्याला हात लावून करीत असताना कोणते पीक शेतात घ्यावे असा विचार मनात आला.
त्याचवेळी माझ्या डोक्यात आले की, गांजाला चांगला भाव आहे. तरी गांजा लावायची प्रशासनाकडे मागणी करू त्याप्रमाणे मी काल जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे गांजा लावण्याची मागणी केली आहे.
मला सांगा शेतकऱ्यांच्या कोणत्या मालाला भाव आहे. तुरीला, सोयाबीनला भाव नाही. सरकार सोयाबीन ९२ रुपये दराने बाहेर देशातून मागवते. येथे सोयाबीन पिकले तर सरकार ८५ रुपये भाव देते. आत्महत्या करील नाहीतर काय करील? माझ्या शेतकऱ्यांचे कोण प्रश्न मांडणार आहे की नाही.
केंद्र सरकार, राज्य सरकार म्हणते की, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत तर मग बाबाहो तुम्हाला हमी भाव द्यायला कोणत्या '…. ' अडवले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माझी विनंती आहे की, मी आत्महत्या करू काय? .
माझ्यासमोर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. मी गांजा लावणार आहे. तरी मला प्रशासनाने १५ सप्टेंबर पर्यंत कळवावे. नाही कळविल्यास १६ सप्टेंबर रोजी गट क्र.२८१/४ मध्ये गांजा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. प्रशासनाने मला काय करायचे ते करू द्या. गेल्या वर्षी माझे साडेचार लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.शासनाने त्याची नुकसानभरपाई द्यावी.
काल माझी बहिण राखी बांधायला आली होती. बहिणीच्या ताटात ओवाळणी म्हणून टाकायला माझ्याकडे एक रूपया सुद्धा नव्हता. आमच्या शेतकऱ्यांची एवढी बिकट अवस्था या सरकारने केली आहे. आत्महत्या केल्यावर तुम्ही आमच्या जखमेवर मीठ चोळायला येता. आम्ही शेती करतो म्हणून का? शेती करतो म्हणून आमचे दुर्दैव वाईट आहे का? आम्ही शेतकऱ्यांच्या पोटाला जन्माला आलो म्हणून तुम्ही आमची चेष्टा लावली आहे का?
माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जाहीर आवाहन राहील.का तर आम्ही मरण्यासाठी जन्माला आलो आहे का ? शिव छत्रपतींने गवताची काडी घाण ठेवली होती. ती सुद्धा छत्रपतीनी सोडवून घेतली होती. त्या छत्रपतीचे मावळे आम्ही शेतकरी आहोत. म्हणून तुम्ही आम्हाला गांजा लावायची परवानगी द्यावी. एवढीच माझी प्रशासनाला जाहीर विनंती आहे. असे अनिल पाटील यांनी सांगितले आहे.