ड्रायव्हरशिवाय चालणारी कार, MIT इंजिनिअरिंगच्या रँचोंची कमाल !
X
पुणे : जगभरात सध्या ड्रायव्हर शिवाय चालणाऱ्या कारची चर्चा आहे. पण भारतातील पहिली ड्रायव्हरलेस कार तयार झाली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या मेकॅनिकल तसेच ई अॅण्ड टीसी या अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी भारतातील पहिली ड्रायव्हरलेस कार तयार केली आहे. चार चाकी वाहनांना अधिकाधिक अद्ययावत बनवण्यासाठी तंत्रज्ञ प्रयत्नशील आहेत. याचेच पुढचे रुप स्वंयचलित आणि चालक विरहित वाहन...य़ावर टेस्ला आणि गूगल या कंपन्या काम करत आहेत.
या कारसाठी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या अद्ययावत प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि मृत्यू कमी करण्यास मदत होईल, असे ही कार तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ही गाडी लेव्हल थ्री ऑटोनॉमीवर आधारित असून यात बीएलडीसी मोटर्सचा वापर करण्यात आला आहे. या वाहनाला उर्जा देण्यासाठी लिथियम आयर्न बॅटरी वापरण्यात आली आहे असे यश केसकर या विद्यार्थ्याने सांगितले.
ऑटोमेटिक नियंत्रण करणारी यंत्रणा आणि विविध सेन्सर्ससह अनेक एआय आणि एमएल अल्गोरिदम वापरून स्टीयरिंग, थ्रॉटल आणि ब्रेकवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे, असे सुधांशू मणेरीकर या विद्यार्थ्याने सांगितले.या गाडीची पॉवर तीन किलोवॅट इतकी असून चार्जिंगसाठी चार तासांचा वेळ लागतो. यामध्ये चाळीस किलोमीटर प्रवास केला केला जाऊ शकतो. या गाडीचा उपयोग शेती, खाण, वाहतूक या क्षेत्रांमध्ये करता येऊ शकतो.