'मोदी कुणालाच जगू देईना आणि काय करू देईना' शेतमजूर महिलेचा संताप
शेतकऱ्यांच्या शेतात पीकच नाही, तर आम्हाला रोजगार कोण देणार? शेतमजुरांचा सवाल...
X
सोलापूर : पाऊस पाणी लयं झालंय, शेतकऱ्यांनी काय करायचं, नुकसान भरपाई कोण देईल. कामधंदा बंद असल्यावर आम्ही खायचं काय? शेतकऱ्यांबरोबर गोरगरीब शेतमजूरांचं ही पुरानं नुकसान केलंय. शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई देऊन शासनाने मजुरांकडे ही लक्ष द्यायला पाहिजे. शेती पिकांवर उपजीविका करणाऱ्या गोरगरिब मजुरानं खायचं काय? असा सवाल शेतमजुरांनी उपस्थित केला असून आता शासन शेतमुजरांसाठी काय निर्णय घेणार? याकडे शेतमजुरांचे लक्ष लागून राहिले आहे.
सीना, भोगावती, नागझरी नदीकाठच्या शेती पिकांचे पुराने झाले नुकसान
सोलापूर जिल्ह्यातील सीना, नागझरी, भोगावती या नद्यांना पूर आल्याने या नदी काठच्या शेती पिकांवर त्याचा परिणाम झाला असून अनेक शेती पिके पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिके पाण्याखाली आहेत. काही ठिकाणी शेतातून पाणी भरधाव वेगाने वाहिले असल्याने शेतकऱ्यांनी पैसे खर्च करून सपाट केलेल्या शेतजमीनी चे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला आहे.
अतिवृष्टी व पूराचा शेतकरी, शेतमजुरांना बसला फटका...
अतिवृष्टी व पुराचा फटका शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांनाही बसला आहे. शेतीवर उपजीविका असणाऱ्या शेतमजुरांना कामासाठी धावाधाव करावी लागणार आहे. सोयाबीन, उडीद, मका, कांदा ही पिके पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली असल्याने शेतमजुरांच्या हातचा रोजगार गेला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असल्याने उभी पिकं खराब झाली आहेत. त्याचाही फटका शेतमजुरांना बसला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, शेतमजुर सध्या बेरोजगार झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांना काहीच नाही, शेतमजुरांनाही काही नाही...
सुधीर आतकरे या शेतकऱ्याने सांगितले की, या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना काही मिळाले नाहीच शेवटी शेतमजुराला सुद्धा काही मिळणार नाही. पावसाच्या व पुराच्या पाण्यात आमची पिकं गेली आहेत. यावर्षी कांदा लावला होता. त्या कांद्याला खर्च भरपूर आला असून त्याच्यावर जगणाऱ्या शेतमजुरावर देखील उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना काहीतरी मदत करावी. खर्चामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून गेल्या वर्षी ही पुरात पीक वाहून गेली होती. त्या पिकांची नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नाही.
नागझरी, भोगावतीच्या पाण्याने शेतीचे केले नुकसान...
आण्णा कादे या शेतकऱ्याने सांगितले की, नागझरीच्या पाण्याने फारच मोठे नुकसान केले आहे. सोयाबीन, ऊस, कडवळ, या पिकांचे नुकसान झाले आहे. पाणी आणखीन ही शेतात आहे. पाण्यामुळे शेतात खड्डे पडले आहेत. शेतातील पाण्याचा निचरा होत नाही.
गेल्या ३ ते ४ दिवसापासून शेतातून पाणी वाहत आहे. आभाळ पण आणखीन येत आहे. पाऊस पण ढगफुटी झाल्यासारखा सतत चालू आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी नदीला जास्त पाणी आले. यावर्षी आमच्या सोयाबीन मध्ये ५ ते ७ फूट पाणी होते. शासनाने याची लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.
तुरी,मका,सोयाबीन, कांदा या पिकांचे झाले नुकसान
शेतकरी नानासाहेब घाडगे यांनी सांगितले की, भोगावती नागझरी नदीला भरपूर पाणी आले होते. आमची पूर्ण शेती पाण्यात होती. शेतात ५ फूट पाणी होते.त्यामुळे सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले असून कांदा, सोयाबीन, तुरी, मका या पिकांचे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने लवकर द्यावी.
गेल्या वर्षी सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नाही...
चांगदेव घाडगे या शेतकऱ्याने मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितले की, माझा गट नंबर २५९ असून नागझरी, भोगावती नदीला पूर आल्याने माझ्या शेतीचे नुकसान झाले आहे. आमच्या सोयाबीन पिकावर १० ते ११ फूट पाणी होते. गेल्या वर्षीसुद्धा नुकसानभरपाई मिळावी म्हणून अर्ज भरला होता. परंतु नुकसान भरपाई मिळाली नाही. सातबारा उतारा ही दिला होता. त्याचा १ रुपया सुध्दा आजतागायत मिळाला नाही. म्हणून यावर्षी नुकसानभरपाईचा अर्ज भरला नाही. नुकसानीचे पैसे मिळत नाहीत. म्हणून आम्ही यावर्षी स्थिर आहोत. शासनाने काहीतरी मदत द्यावी ही विनंती..
मोदी कुणालाच जगू देईना आणि काय करू देईना
सुनीता चौधरी या मजूर कामगार महिलेने मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले की, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून टोमॅटोला पान राहिले नाही. त्याच्यावर टीका पडलेला आहे. टोमॅटो लागवडीसाठी २ लाख रुपये खर्च आला असून त्याचा काय फायदा झाला नाही. सोयाबीन, उडीद खराब झाले आहे. भाजीपाल्याला भाव राहिला नाही. १० ते १५ दिवस झाले पाऊस चालू आहे. त्यामुळे रोजगाऱ्याने काय खायचे? तेल १५० रुपये झाले आहे. शेंगा १२० रुपये झाल्या आहेत. रोजगाऱ्याने बसून काय करायचे? मोदी कुणाला जगू देईना आणि कुणाला काय करू देईना. असे शेवटी मजूर महिलेने सांगितले.
शासनाने शेतमजुरांना ही अनुदान द्यावे यासाठी मागणी करणार -विजय रणदिवे
नदीकाठच्या शेती पिकांचे नुकसान झाले असून अतिवृष्टीमुळे शेतमजुरांवर घरी बसण्याची वेळ आली आहे.त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांना ही अनुदान द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी दिली.
पहिल्या वेळेस सीना नदीला पूर आला होता तेंव्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नदीकाठच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.तसेच जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे जास्त प्रमाणात नुकसान झाले असून पिकांचे पंचनामे करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.सोलापूर जिल्ह्यातील बार्शी,मोहोळ या तालुक्यात अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात अतिवृष्टी मुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतमजुरांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. साखर कारखान्याच्या थकीत एफआरपी संदर्भात बोलताना रणदिवे म्हणाले की,जवळ-जवळ जिल्ह्यात १५० कोटीच्या आसपास थकीत एफआरपी आहे.काही कारखान्यांनी एफआरपी ची रक्कम गाळप परवाना घेण्यासाठी आता दिली आहे.जिल्ह्यातील एक ते दोन साखर कारखान्यांनी १००% थकीत एफआरपी दिली म्हणून गाळप परवाना घेतला आहे. त्यासंदर्भात लवकरच निवेदन देणार आहे असे रणदिवे यांनी मॅक्स महाराष्ट्र शी बोलताना सांगितले.