Special Report : अंधश्रद्धेचे पीक, ब्रह्मदेवाच्या कोपाच्या भीतीनं केळीची लागवड टाळली
पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेचं पीक जोमात आहे. आता तर शेतीवरही या अंधश्रद्धेचा परिणाम होऊ लागला आहे. नांदेड जिल्ह्यातील एका गावात अशाच अंधश्रद्धेमधून केळीचं पीक घेतले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. आमचे प्रतिनिधी कुलदीप नंदूरकर यांचा ग्राऊंड रिपोर्ट
X
नांदेड जिल्ह्य़ातील अर्धापूरची केळी देश-विदेशात प्रसिद्ध आहे. मात्र याच तालुक्यातील येळेगाव या गावात केळीचं पीक घेणं अपशकून मानलं जातं आहे. येळेगाव येथील जमीन सुपीक आहे, सोबतच पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून देखील केवळ अंधश्रद्धेमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. केळीचं पीक घेतल्याने ब्रह्मदेवाचा प्रकोप होतो आणि जो पीक घेईल त्याच्या घरची गुरे-ढोरे मरतात आणि माणसे देखील मृत्यू पावतात, या भीतीपोटी अनेक वर्षे या गावाने केळीचे पिकच घेतले नाही.
गावकऱ्यांचे म्हणणे काय?
अर्धापुर तालुक्याची ओळख केळीचं पिकं घेणारा तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील येळेगाव येथील जमीन सुपीक आणि मुबलक पाणी उपलब्ध असल्याने हा तालुका आर्थिकदृष्ट्या सधन मानला जातो. पण या गावात केळीचं पिकं घेतलं की अपशकुन होतो अशी भावना गावकऱ्यांमध्ये आहे. यापूर्वी काहींनी केळीचं पिकं घेण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांना वाईट अनुभव आल्याचे येथील शेतकरी सांगतात. एवढेच नाही तर यात कुणाला शंका असेल तर गावात शेती घेऊन केळीची लागवड करुन दाखवावी असं आव्हान ही गावकऱ्यांनी दिलयं.
अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान
गावकऱ्यांच्या या भूमिकेला अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आव्हान दिले आहे. येळेगाव येथील चार ते पाच पिढ्यांपासून केळीचे पिकं घेतलं जात नाही, ही केवळ अंधश्रध्दा आहे, प्रकोपाची अफवा कोणीतरी स्वार्थापोटी पसरवली आहे, यात कसलंही तथ्य नाही, असे अंनिसने म्हटले आहे. एवढेच नाही तर "येळेगाव येथे केळीचे पीक घेऊन दाखवू, येथील गावकऱ्यांचे आव्हान आम्ही स्वीकारतो" असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे आणि अंनिसचे जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी म्हटले आहे.